सुश्री अश्विनी अभ्यंकर
विविधा
☆ – युरेका, युरेका ! – ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆
बरेच जण जमले होते. काही चुकचुकले, काही हळहळले. काही भावनावेगाने कोलमडले. काहींनी सांत्वन केले. काहींनी दिलासा दिला. काहींनी बजावले ‘जीव घुटमळेल’. सरते शेवटी आत्म्याच्या सद्गतीसाठी प्रार्थना करून सर्व पांगले.
‘जीव घुटमळेल’? खरंच? स्वतःच्या निष्प्राण पिंजऱ्याकडे पाहताना काय वाटत असेल त्याला? किंवा काहीच वाटत नसेल!
… तरीपण, एक चर्चाच करायची ठरवली तर? मागे सुटलेल्यांसाठी ओढ वाटत असेल का त्याला? का दुभंगलेल्या संबंधातून मिळालेल्या सुटकेमुळे, सुटकेचा निश्वास? आजूबाजूला पाहता जास्त करून निःश्वासंच सुटत असतील, असं वाटतं. अर्धवट राहिलेली स्वप्नं, परिस्थितीची घुसमट, लादलेली नाती, अपयश, केलेल्या चुका, आणि बरंच काही.
पाप-पुण्याच्या सिद्धांतानुसार गणित मांडायची भीती वाटत असेल का? तर मग काही नक्कीच बिचकत असतील. इथली मोह-माया आटोक्यातली वाटू शकते. पलीकडचं तर सगळंच अपरिचित. अज्ञाताची भीती. मग त्या वेळी आपल्या जुन्या आवरणाचा लोभ वाटू शकतो.
आता जरा मागे उरलेल्यांकडे पाहूया. जसा गेलेल्याला अज्ञाताचा प्रवास, त्याचप्रमाणे मागे राहिलेल्यांसाठी काही कमी खडतर प्रवास नसतो. सोडून गेलेल्याशिवायचं आयुष्य आता प्रत्येकाचं वेगळं. नवे पाश, नवीन समीकरणं. काहींचा आधार सुटतो तर काहींची सुटका होते. म्हणजे जाणारा सुटतो का रहाणारा? अजून एक वेगळा प्रकार पण असू शकतो. या दोघांपेक्षा वेगळा. म्हणजे इथे असताना सर्वसाधारणपणे आनंदात जगलेला. छान नातेसंबंध जपलेला, यश उपभोगलेला, सुखाने आयुष्य व्यतीत केलेला. त्याला काय वाटेल? इथला सुखाचा प्रवास संपला म्हणून मागे बघून घुटमळला असेल? का आणखी आनंदाच्या उत्सुकतेपोटी पुढे पाहिलं असेल? आनंदाने निरोप घेतला असेल का? का इथल्या प्रेमाची कास सोडवत नसेल? अडखळेल का तो?
… गंमतच आहे ही. म्हणजे एकाला तिथल्या अंधाराची भीती वाटू शकते आणि त्याचवेळी, दुसऱ्याला तिथल्या सुखाची गरज नसते.
आता पुढचा प्रश्न. ही चर्चा तर संपतच नाहीये! तर प्रश्न असा की, आपण यात कुठल्या प्रकारात मोडतो? ते कळणार कसं? कारण स्वतःलाच फसवायची चांगली कला अवगत झालेली आहे आपल्याला. ‘होत्या’च्या आणि ‘नव्हत्या’च्या त्या उंबरठ्याशी गेल्याशिवाय काही आपल्याला कळायचं नाही. पण, नंतर कळून तरी काय उपयोग? कोणाला सांगणार … ‘युरेका! मला कळलं’…. म्हणजे तिथेसुद्धा ‘स्व’चा शोध काही संपतच नाही म्हणायचा.
बरं. आता इतक्या विवेचनानंतर आणखी एक कल्पना. आता ही शेवटची! हे सगळं – आत्मा, जीव, त्यांचे पाश, मोह, इच्छा-आकांक्षा, या सगळ्यांचा परस्पर संबंध असं काही नसेलच तर? म्हणजे …
… ‘ युरेका ’ पण आपल्या नशिबात नसेल तर?
© सुश्री अश्विनी अभ्यंकर
(ता. क. : हा निव्वळ कल्पनाविलास आहे. कुठल्याही प्रकारचा तत्त्वज्ञानाचा उहापोह वगैरे नाही.)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈