सुश्री शीला पतकी
🌸 विविधा 🌸
☆ “शिक्षण हे वळण आहे दळण नाही…” भाग – १ ☆ सुश्री शीला पतकी ☆
शिक्षण हे वळण आहे दळण नाही हे वाक्य एका माजी शिक्षण संचालकांचे आहे ज्यानी शिक्षण क्षेत्रामध्ये विविध प्रयोग केले. माझ्या शिक्षकी पेशातल्या सुरुवातीच्या काळात या वाक्याने मी खूप प्रभावित झाले आणि मग त्यानी या वाक्याचे स्पष्टीकरणही खूप सुंदर दिले होते. पुस्तकं तीच असतात आशयही तोच असतो पण काळानुरूप त्याचे अर्थ बदलत असतात त्यानुसार आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांचा आवाका जाणून त्या मुलांना शिकवणे
त्यासाठी नवीन नवीन संदर्भ शोधून वाचणे.. वाचन वाढवणे शिक्षणामध्ये नवे नवे प्रयोग करणे म्हणजे वळण आहे. तोच भाग शिकवायचा अनेक वर्ष म्हणून पाटी टाकल्यासारखे दळण टाकत जाऊ नका हा मोलाचा संदेश मी शिक्षक होण्याच्या सुरुवातीच्या काळात मला मिळाला. आणि मला लक्षात आले की शिक्षक फक्त एखादा पाठ शिकवत नसतो त्याच्या अनुषंगाने कितीतरी गोष्टी तो शिकवत असतो शिक्षकाचे व्यक्तिमत्व हे खूप व्यापी आहे एखाद्या विद्यार्थ्यांच आयुष्य बदलून टाकण्याची त्याच्यात ताकद आहे आणि तो केवळ विद्यार्थ्यांचा नसतो तो पालकांना त्या मुलाबद्दल काहीतरी सांगतो समाजाला काहीतरी आदर्श निर्माण करून देतो समाजाप्रती सुद्धा त्याची कर्तव्य असतात ती पार पाडतो याचे खूप छान उदाहरण आजच्या दिवशी मला द्यावसं वाटतं आणि तीच गोष्ट मी आज सांगणार आहे
एका वृत्त पत्रामध्ये अलक नावाचे एक नवीन सदर सुरू झाले होते म्हणजे अति लघु कथा चारच ओळीची कथा असायची. त्यामध्ये एक सुंदर कथा लिहिली होती नाव होतं “गाडी गुरूजीची” मी ती कथा वाचून त्याच्या खाली असलेल्या नंबर वरच्या त्या माणसाला फोन केला आणि त्यांना विचारले आपण काय करता? त्यांनी सांगितले मी शिक्षक आहे आणि मी लिहिलेली कथा ही माझ्या अनुभवातून लिहिलीय. मी म्हणलं खरं तर ही दीर्घ कथा व्हावी अशी असताना तुम्ही थोडक्यात लिहिली आहेत ते म्हणाले हो मी आत्ताच लेखन चालू केल आहे मी खूप लहान आहे अजून अनुभव घेतोय… ते कुठेतरी गडचिरोली वगैरे त्या भागामध्ये विदर्भात होते त्यानी ती सांगितलेली कथा किंवा त्यांचा अनुभव विलक्षण भावणारा होता. आजपर्यंत माझ्या लक्षात राहणारा असा होता. त्यांनी असं सांगितलं की माझ्या शिक्षकी पेशाची सुरुवात एका दुर्गम भागातल्या नेमणूकीने झाली तीन-चार शिक्षक असलेली ती शाळा.. चार खोल्या.. चार शिक्षक.. एक मुख्याध्यापक… आणि आसपासच्या वाड्यावरून वस्त्या वरून विद्यार्थी शाळेमध्ये शिकायला येत असतात. जवळ असलेल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी म्हणजे शाळा असलेल्या गावापर्यंत जाण्यासाठी फक्त पायवाट होती कोणतंही वाहन त्या ठिकाणी जात नव्हतं काही शिक्षक सायकलवरून येत असत या नवीन तरुण शिक्षकाकडे मात्र एक गाडी होती ज्याला फटफटी असे म्हणत असत. ती घेऊन ते येत असत. शाळेच्या समोरील पटांगणात ते गाडी पार्क करायचे दिवसभराचे शिकवण झालं की संध्याकाळी पुन्हा त्या गाडीवरून आपल्या गावाकडे परतत असत.
एकदा त्यांच्या वर्गातल्या मुलाच्या पायाला मोठी जखम झाली होती आणि तीन चार दिवस तो मुलगा काही शाळेला आला नाही शिक्षक तरुण आणि उत्साही होते काही नवीन करण्याची समाजाशी जोडले जाण्याची हौस होती ते त्या मुलाच्या घरी गेले आणि त्यांनी पाहिलं की मुलाला खूप मोठी जखम झालेली होती पण त्या जखमेत तू भरला होता पाय सुजला होता मुलगा निपचित तापाने फणफणलेला होता मुलाची अवस्था बिकट होती वस्तीवरचे सगळे लोकं जे आदिवासी होते.. उत्पन्नाची फारशी साधन नाहीत त्यामुळे दारिद्र्य होतं. झोपडीत एका घोंगडीवर पोरगं पडलेलं शिक्षकाने आपल्या मुख्याध्यापकाकडे त्या मुलाला आपण तालुक्याच्या ठिकाणी नेऊन उपचार करू शकतो का? असा प्रश्न विचारला त्यांचा हेतू प्रामाणिक होता की आपल्या मुख्याध्यापकाची परवानगी घेऊन हे करावे मुख्याध्यापक म्हणाले, ” नाही त्या फंदात पडू नका अजून नवीन आहात त्या पोराला आणखीन काहीतरी वेगळंच झालं तर तुम्हाला जबाबदार धरतील आणि त्याबरोबर शाळेलाही जबाबदार धरतील आपलं काम शिकवायचं आहे तेवढं करा”. पण शिक्षकाला काही ते पटेना त्याने तालुक्याच्या दवाखान्यामध्ये चौकशी केली आणि दुसरे दिवशी शाळा संपताना त्या मुलाला आणि पालकाला गाडीवर घालून ते दवाखान्यात घेऊन आले तिथे डॉक्टरने सांगितले की परिस्थिती अतिशय बिकट आहे पायामध्ये खूप इन्फेक्शन झाले आहे ते शरीरात पसरत चालले आहे पालकांना त्याची कल्पना दिली. गुरुजींनी पालकांची खाण्यापिण्याची व्यवस्था औषध पाण्याची व्यवस्था करून दिली रोज सकाळ संध्याकाळ ते मुलाची चौकशी करायला जात असत डॉक्टरांनी औषध गोळ्या मलमपट्टी सलाईन इत्यादी गोष्टी चालू केल्या मुळेआणि या मुलांची प्रतिकारक्षमता खूपच चांगली असल्यामुळे औषधाचा परिणाम वेगाने होऊ लागला दोन दिवसांनी मुलाचा ताप उतरला पस काढून टाकल्यामुळे जखमेलाही आराम पडला चार-पाच दिवसानंतर मुलाची जखम भरायला सुरुवात झाली मग डॉक्टरांनी ड्रेसिंग करण्याची माहिती पालकांना दिली मुलगा बरा होऊन त्याला शिक्षकाने घरापर्यंत आणून सोडले सगळ्या वाडीला अतिशय आनंद झाला कारण मुलाचा सुजलेला पाय त्याच्या मधून वाहणारा पु अंगामध्ये असलेला ताप हे पाहून हा मुलगा टिकणार नाही अशी सर्व लोकांना खात्री झाली होती परंतु गुरुजींमुळे मुलगा वाचला हे त्यांच्या लक्षात आले गुरुजींबद्दल सगळ्या गावाला म्हणजे त्या वाडीला खूप अभिमान तर वाटला पण आदर वाटू लागला गुरुजींना भेटल्याबरोबर लोक वाकून नमस्कार करू लागले गुरुजींच्या गाडीमुळे आपल्या पोराचे प्राण वाचले ही तिथल्या लोकांची भावना होती कारण तालुक्यापर्यंत रुग्णाला नेण्याचे कोणते साधन नव्हते गुरुजींच्या गाडीमुळेच ते शक्य झाले ही त्यांची धारणा होती
पुढे चार आठ दिवस गेले गुरुजी संध्याकाळी शाळा सुटल्यावर गाडी वर बसायला गाडीजवळ आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की सीट वरती चार-पाच फुलं ठेवलेली आहेत. पाच-सहा दिवस हा प्रकार सुरू होता कुणीतरी रोज सीटवर फुले वाहून गेल्यासारखा जात होता गुरुजींना वाटले की कोणीतरी मुली फुल गोळा करून ठेवत असाव्यात आणि ते विसरून जात असतील.
– क्रमशः भाग पहिला
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈