सुश्री शीला पतकी
🌸 विविधा 🌸
☆ “शिक्षण हे वळण आहे दळण नाही…” भाग – २ ☆ सुश्री शीला पतकी ☆
(पाच-सहा दिवस हा प्रकार सुरू होता कुणीतरी रोज सीटवर फुले वाहून गेल्यासारखा जात होता गुरुजींना वाटले की कोणीतरी मुली फुल गोळा करून ठेवत असाव्यात आणि ते विसरून जात असतील.)
त्यानंतर एके दिवशी वर्गात शिकवत असताना त्यांनी पाहिले तर कोणीतरी एक व्यक्ती त्यांच्या गाडीच्या आसपास घुटमळताना त्यांना दिसली त्यांना वाटले कुणीतरी सीट ला ब्लेड वगैरे मारते की काय या विचाराने ते पटकन वर्गात बाहेर आले आणि ते ओरडले कोण आहे तिकडे त्याबरोबर ती व्यक्ती पळून गेली गुरुजींनी दोन-चार दिवस सलग लक्ष ठेवले पुन्हा चार दिवसांनी त्यांना कुणीतरी व्यक्ती गाडी पुढे घोटाळाताना दिसत होती आता मात्र गुरुजी सावध झाले ते शाळेच्या पाठीमागून गाडीपर्यंत गेले आणि त्या व्यक्तीचा हात त्यांनी पकडला आणि विचारले काय करत आहात? तो माणूस खूप घाबरला होता तो गावातलाच एक मध्यम वयाचा माणूस होता तो म्हणाला काही नाही हो गुरुजी तुमच्या गाडीची पूजा करतो आणि एवढी फुल वाहतो गुरुजींना काही प्रकार कळेना ते म्हणाले कशासाठी करता येईल सगळं? गुरुजींच्या मनात काही वेगळे शंका आली… माणूस नम्रपणे हात जोडून म्हणाला गुरुजी आमच्या सगळ्या वस्तीवरच्या लोकांची भावना आहे की गुरुजी ची गाडी ही आपल्याला प्राण वाचवायला मदत करणारी गाडी आहे इथे एखादा माणूस मरायला लागला तरी त्याला दवाखान्यात न्यायचं साधन नाही पण तुमच्या गाडीने आमच्यात असा विश्वास निर्माण झाला आहे की कमीत कमी गुरुजी ची गाडी आम्हाला दवाखान्यापर्यंत पोहोचवेल आणि काहीतरी दवा पाणी होऊन आम्ही वाचू नाहीतर इथली माणसं दवा पाण्या बिगर तडफडून मारत्यात हो आणि तो झटकन खाली वाकला आणि त्याने गुरुजींचे पाय धरले गुरुजींचे डोळे पाण्याने भरले गुरुजींनी त्या माणसाला उठवले त्या माणसाचे हात हातात घेतले त्याला घट्ट मिठी मारली म्हणाले नाही हो नका….. इतका मोठा मीही नाही आणि माझी गाडीही जमेल तेवढी मदत मी आपल्या गावाला करत जाईन अहो ते माझे कर्तव्यच होते माझ्या मुलाला वाचवणं हे माझं कामच आहे ना? गुरुजींमुळं आसपासच्या वाड्या वस्त्यावरची माणसं आपल्या मुलांना शाळेत पाठवायला लागली कारण त्यांचा गुरुजींवर विश्वास होता गुरुजी आपल्या मुलासाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी करतील ही आशा त्यांच्याकडे होती. हे सगळं पाहिल्यावर मुख्याध्यापकांनाही खूप लाजल्यासारखे झाले ते आपल्या शिक्षकाला म्हणाले, ” सर तुम्ही करता हे काम चांगले आहे पण हल्ली असं करताना काही चूक झाली तर खूप त्रास होतो म्हणून मी तुम्हाला बोललो मला क्षमा करा”! गुरुजीं सारख्या शिक्षकामुळे ती शाळा उत्तम चालू लागली पालकांचा शाळेवरचा विश्वास वाढला गुरुजींनी तेथे नवनवीन उपक्रम राबवायला सुरुवात केली. आसपासच्या लोकांसाठी काम करायला सुरुवात केली तालुक्यापासून गावाला रस्ता व्हावा म्हणून प्रयत्न केले गुरुजी ही सर्व कथा मला फोनवरून सांगत होते आणि माझे डोळे अक्षरशः वाहत होते मी म्हणलं सर तुमच्यासारखे शिक्षक हे आमची उद्याची आशा आहे 75 वर्षात फक्त आम्ही शाळेच्या दारापर्यंत विद्यार्थी आणू शकतो खऱ्या अर्थाने त्यांना सुशिक्षित करण्याची क्रिया अद्याप सुरू झालेली नाही आणि यापूर्वी आपल्याला पालकांना शिक्षित करणे गरजेचे आहे शहरातल्या हाय फाय शाळा ग्रामीण भागातल्या काही शाळांना मिळणारी मदत हे वाचून समाजाची एक धारणा होते की शिक्षकांना काय कमी सरकार सर्व देतं पण शाळेमध्ये विद्यार्थी यावा म्हणून जे प्रयत्न सरकार करते ते खरोखर गरजेचे आहेत दुपारच्या डब्यासाठी शाळेत पाठवणारे पालक आहेत कारण खरोखर त्यांच्याकडे अन्न नाही अशा दुर्गम भागातल्या वसाहती मधून शिकवणारे शिक्षक खरोखर आदरणीय आणि सन्माननीय आहेत शिक्षक हा केवळ एक अभ्यासक्रम शिकवीत नसतो एक पिढी घडवत नसतो एक मूल घडवत नसतो तर तो समाजालाही प्रेरणा देतो दिशा देतो खऱ्या अर्थानं समाज पुढे जाण्यासाठी एक सक्षम नवी पिढी तयार करतो हे करत असताना आपण शिक्षणाचा अर्थ फार मर्यादित घेतो मराठी हिंदी गणित विज्ञान हे विषय नाही त्याच्या पलीकडे जाऊन काही आदर्श निर्माण करतो! जो शिक्षक हे आदर्श त्याच्या वागण्यातून असतात त्याच्या कृतीतून असतात समाजाप्रती केलेल्या त्याच्या कार्यातून असतात विद्यार्थ्यांना विविध पद्धतीने शिकवताना वापरलेल्या युक्त्यातून असतात म्हणून पाचवी ते दहावी शिकवणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहतात री युनियन शाळेतली होतात कारण ते संस्कार आणि तिथे काम करणारा शिक्षक खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्याला त्याच्या जीवनाला एक आकार देत असतो या साऱ्यासाठी शिक्षकाला न कळत एक आचारसंहिता वापरावीच लागते शिक्षक कुठे दिसावा? तर तो ग्रंथालयात दिसावा चर्चासत्रांमध्ये दिसावा व्याख्यानाला दिसावा नाटकांना दिसावा सभांना दिसावा भेळेच्या गाडीवर, पानपट्टीच्या दुकानात.. हॉटेलच्या बाकड्यावर शिक्षकांना समाज पाहू शकत नाही म्हणून शिक्षकाच्या वर्तनाला हे बांध आहेत आचारसंहित आहे ती जर त्याने सांभाळली नाही तर ते शिक्षक आदरास पात्र राहत नाही अशी जीवन प्रणाली जगणारे असंख्य शिक्षक आहेत जे खूप सुंदर काम करतायेत पण दुर्दैवाने ते लिहीत नाहीत त्यांच्या कामाचा प्रोपोगंडा होत नाही बोलवाला होत नाही त्यामुळे जनमानसामध्ये शिक्षकांबद्दलची प्रतिमा खूप चांगली नाही किंबहुना खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेने त्याचा टीचर करून टाकल्यामुळे ती टीचर तो टीचर या नावांची संबोधन त्यांच्या मागे लागली. शिक्षण विकत घेण्याची गोष्ट आहे असे लोकांना वाटू लागले आणि तिथेच समाज बिघडला आईचं प्रेम आणि शिक्षकाने पाठीवर हात ठेवून शिकवलेलं ज्ञान हे विकत घेता येत नसतं तुम्ही सिल्याबस चा काही भाग शिकवण्या लावून विकत घेऊ शकता पण हे नाही आणि मुळात शिक्षकाकडे खूप पैसा नाही त्यामुळे पैसे वाल्यांना सध्या समाजामध्ये मानसन्मान मिळतात खरंतर सर्वात सन्मानाचे आणि आदराचे स्थान हे समाजामध्ये शिक्षकालाच असले पाहिजे तरच तो समाज पुढे जाईल विकसित होईल ज्ञान विकत घेऊन तुम्ही खूप पैसे कमवाल पुढे जाल पण शिक्षकांनी जीवनाची जी आदर्श वाट दाखवलेली असेल त्यावर चालणारा मुलगा जेवढा सुखी समाधानी होईल तेवढे कोणीच होणार नाही त्याच्या हातून नेहमी उत्तम काम घडत राहील असा सुंदर समाज घडवण्याचे कार्य ज्या शिक्षकांच्या हातून घडते त्या शिक्षकाला द्यावयाचा सन्मान म्हणून शिक्षक दिन हा साजरा केला जातो फक्त… त्या दिवशीआपण या सन्मानास पात्र कसे राहू या या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे खेड्यापाड्यातल्या अनेक शिक्षकांना धडपडून काम करताना मी जेव्हा पाहते तेव्हा त्या गाडीवाल्या तरूण शिक्षकाची मला नेहमीच आठवण येते आजच्या या शिक्षक दिनी अशा सर्व शिक्षकांना मनापासून शुभेच्छा!
– समाप्त –
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈