श्री सुनील शिरवाडकर
विविधा
☆ “बहिणाई…” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
जो असतो परंतु दिसत नाही तो देव..
आणि जे दिसतं परंतु कधीच नसतं ते भेव”
ह्या ओळी लिहिलेल्या आहेत कवयित्री बहिणाई चौधरी यांनी. बहिणाईंच्या कितीतरी गाण्यांमधुन त्यांची देवावरील निस्सीम भक्ती समजते. पण त्यांचा देव केवळ दगडाच्या मुर्तीत नव्हता. त्यांचा देव निसर्गात.. शेतामध्ये.. पिकांमध्ये होता. शेतात आपण लावलेली रोपे हळूहळू मोठी होऊ लागतात.. त्याची पाने वाऱ्यावर डोलू लागतात. आणि बहिणाई बोलू लागतात..
टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनी
…. जमिनीची मशागत करताना त्यांनी उघड्या डोळ्यांनी अनेक क्षण टिपले. त्या पाखरांवर.. जनावरांवर माया करतात. पाऊस म्हणजे तर त्यांचा जीवाभावाचा सोबती.
आला पाऊस पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परीमय
माझं मन गेलं भरी
आला पाऊस पाऊस
आता सरीवर सरी
शेतं शिवारं भिजले
नदी नाले गेले भरी
घरी दारी.. कामात.. विश्रांतीत.. सुखात.. दुःखात त्यांनी जे जे अनुभवले, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात उमटले.
कवियत्री इंदिरा संत म्हणतात..
… बहिणाईंच्या कविता वाचताना पार्श्वसंगीता सारखी माझ्या मनात एक कल्पना नेहमी उभी असते.
आपण झुळझुळ वाहणाऱ्या निर्मळ प्रवाहाच्या काठाशी बसलो आहोत. आणि तळातील रंगीबेरंगी रेती, दगडगोटे आणि प्रवाहाचे तरंग यात अगदी गुंतुन जात आहोत.
… आणि खरंच.. बहिणाईंच्या कविता वाचताना आपण त्यात अगदीच गुंतुन जातो.. गुंगून जातो.
बहिणाईंच्या कविता आपल्याला माहीत असतातच.. पण त्यांच्या नेहमीच्या बोलण्यात देखील उपमा.. अलंकाराची रेलचेल असायची.
… आसु नाही ती सासु कशाची?
आसरा नाही तो सासरा कशाचा?
आता सध्या जे करोनाचे संकट जगावर आले आहे.. तसेच शंभर वर्षांपूर्वी प्लेगचे आले होते. बहिणाईंनी ते दिवस बघितलेले… त्या लिहितात…….
पिलोक पिलोक, आल्या पिलोकाच्या गाठी
उजाडलं गाव, खया-मयामधी भेटी
पिलोक पिलोक, आली नशिबात ताटी
उचललं रोगी
त्यानं गाठली करंटी
करंटी म्हणजे क्वारंटाईन. तेव्हा सरकार शंका आली की उचलून क्वारंटाईन मध्ये टाकत असत. (खरंतर आजही ते तेवढंच गरजेचं आहे).
ध्या करोना मुळे आपण सर्वच जण सक्तीच्या सुटीवर आहोत. आणि म्हणूनच काही जुनी पुस्तके.. काव्यसंग्रह बाहेर निघताहेत. बहिणाईंच्या कविता वाचताना आपण नकळतपणे शंभर वर्षापुर्वीच्या काळात जातो.
माझ्यासमोर जो बहिणाईंचा काव्यसंग्रह आहे.. त्याला प्रस्तावना आहे आचार्य अत्रे यांची. पहिल्या आव्रुत्तीची एक आणि दुसऱ्या आवृत्तीची एक. त्या वाचल्यानंतर बहिणाईंच्या काव्यातील गोडी अधिकच जाणवते.
…. यात कवी सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईबद्दल लिहिलेले दोन दीर्घ लेख आहेत
…. कवियत्री इंदिरा संत.. पद्मा लोकुर यांनी बहिणाईंच्या काव्याचे केलेले रसग्रहण आहे.
…. थोर विदुषी प्रा. मालती किर्लोस्कर यांनी लिहीलेला लेख आहे.
बहिणाईंवर लघुपट बनवणारे चित्रपट महर्षी वसंतराव जोगळेकर. त्यांना हा लघुपट बनवताना उमजलेल्या बहिणाई.. त्यांनी एका लेखातून आपल्या समोर उभ्या केल्या आहेत.
आणि या सर्वांपेक्षा जास्त मनाचा ठाव घेते ती एक कविता. बहिणाईंवरच केलेली. त्याचे कवी आहेत.. बा. भ. बोरकर.
त्यांच्याच शब्दात या लेखाचा समारोप करतो. बहिणाई चौधरींना ते म्हणतात..
देव तुझ्या ओटीपोटी
देव तुझ्या कंठी ओटी!
दशांगुळे उरलेला
देव तुझ्या दाही बोटी!
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈