सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ “दिन दिन दिवाळी !! लक्ष्मी पूजन !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

 ॐ महालक्ष्मी च विद्महे

 विष्णुपत्नीच धीमही

 तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् !!

आज दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस. आज समृद्धीची, संपन्नतेची पूजा केली जाते‌. यावेळी निसर्ग सुद्धा सर्वांगाने बहरून आलेला असतो. पावसामुळे धरणी हिरवीगार आणि शरद ऋतूचे आल्हाददायक वातावरण असते. शेतामध्ये धनधान्याचा हंगाम असतो. त्यामुळे आनंदाचे, चैतन्याचे वातावरण असते आणि हाच आनंद दिवाळीत ओसंडून वाहत असतो.

दारापुढे सुंदर रांगोळ्या, दाराला पाना फुलांचे तोरण, दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा, तेवत्या पणत्या, प्रकाशमान आकाश कंदील अशा थाटामध्ये प्रत्येक घर उजळून निघालेले असते. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असते. मोठ्या उत्साहामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. दारिद्र्याचा अंधार दूर सारून समृद्धीचा दीप चेतवावा हा संदेश यावेळी सर्वार्थानं प्रकट होतो.

घरामध्ये, व्यवसायात समृद्धी रहावी, दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लक्ष्मीची पूजा करायची. त्याच बरोबरीने कुबेराची पूजा केली जाते. कुबेर हा देवांच्या संपत्तीचा राखणदार समजला जातो. तो संपत्ती संग्राहक, धनाधिपती, पैसा कसा राखावा हे शिकवणारा, स्वतःला संपत्तीचा मोह नसणारा, अतिशय निरोगी आहे असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. तेव्हा धनधान्य प्राप्त झाल्यावर मनुष्याला अहंकाराची बाधा होऊ नये यासाठी कुबेराचे स्मरण करायचे.

 ‘लक्ष्मी’ला चंचल म्हणतात. पण लक्ष्मी चंचल नसते. लक्ष्मीवान माणसाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्यामुळे मानव देवही बनू शकतो आणि दानवही बनू शकतो. लक्ष्मीला भोग प्राप्तीचे साधन समजणाऱ्या माणसांचा ऱ्हास हा ठरलेलाच असतो. लक्ष्मीची पूजा करून तिचा योग्य सन्मान करणार्‍याची भरभराट तर होतेच. पण इतरांनाही तो सहाय्यभूत होतो. म्हणूनच दैन्य जाणवेल इतके कमी पण नको आणि बुद्धीचा तोल ढळेल इतके जास्त पण नको, इतकेच धन देवाने द्यावे अशी त्याची प्रार्थना करायला हवी.

लक्ष्मीचा वापर कोण, कशासाठी करतो यावर तिचे फळ अवलंबून असते. विपरीत मार्गाने वापरली जाते ती ‘अलक्ष्मी’, स्वार्थात वापरतात ते वित्त, दुसऱ्यासाठी वापरली जाते ती ‘लक्ष्मी ‘आणि देवकार्यासाठी वापरली जाते तिला ‘महालक्ष्मी ‘ म्हणतात. उदारहस्ते सांस्कृतिक कार्यात, सत्कार्यात लक्ष्मी खर्च करणाऱ्याच्या घरी ती पिढ्यानपिढ्या वास करते. म्हणूनच म्हणतात, ‘लक्ष्मी ही एक महान शक्ती असल्याने ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे, तरच तिचा सुयोग्य वापर होतो.

लक्ष्मी प्रमाणातच मिळाली पाहिजे. कारण लक्ष्मीच्या नाण्याला दोन बाजू असतात. तिचा वापर स्वार्थासाठी करायचा का परमार्थासाठी हे आपणच ठरवतो. तेव्हा या वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थकी लावणारी शक्ती मानून तिचे पूजन करायचे. बुद्धीचा समतोल राहू दे अशी प्रार्थना करायची.

एक गोष्ट महत्त्वाची आहे गैर मार्गाने आलेली लक्ष्मी कधीही स्थिर राहत नसते. तिच्यापासून शाश्वत सुख मिळत नाही तर प्रामाणिकपणे मिळवलेली लक्ष्मी शाश्‍वत सुखासमाधानाने आपली झोळी भरते. म्हणूनच असे सांगितले जाते की, “जो दुसऱ्याचे ओरबाडून खातो त्याला विकृती म्हणतात, जो आपले स्वतःचे खातो त्याला प्रकृती म्हणतात आणि जो आपल्यातले इतरांना खाऊ घालतो त्याला संस्कृती म्हणतात”. हेच या लक्ष्मीपूजनाचे सार आहे. लक्ष्मीमातेने सर्वांवर भरभरून कृपा करावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करूयात.

शुभ दीपावली.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments