सौ.ज्योत्स्ना तानवडे
विविधा
☆ “दिन दिन दिवाळी !! बलिप्रतिपदा !!” 🪔 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
शुभ दीपावली ! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष कसे ? तर महापराक्रमी राजा विक्रमादित्याच्या नावाने होणारी कालगणना आजपासून सुरू होते. आजपासून हे विक्रम संवत्सर सुरू होते. शालिवाहन शकानुसार चैत्री पाडवा हा वर्षारंभ मानला जातो. तर बलिप्रतिपदेपासून नवे व्यापारी वर्ष सुरू होते. दिवाळी पाडव्याला व्यापारी वही पूजनाची प्रथा महत्त्वाची असते.
या दिवशी सर्व वर्षातील व्यापाराचा आढावा घ्यायचा असतो. याच पद्धतीने आपण प्रत्येकाने आपल्या जीवनाचा ही आढावा घेतला पाहिजे. जुन्या वर्षातल्या राहिलेल्या गोष्टी, नवीन वर्षात करायच्या गोष्टी यासाठीचे नियोजन, जुने राग-द्वेष, भांडणं विसरून पुन्हा नव्याने स्नेहबंध जुळवणे, श्रद्धा उत्साह वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे.
बलिराजाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात. विरोचन पुत्र बली धर्मप्रिय, लोकप्रिय राजा होता. श्री विष्णूंनी त्याच्यासाठी वामन अवतार घेतल्याची कथा आपल्याला माहीत आहेच. हा बलिराजा उदार होता. त्याच्या गुणांचे स्मरण आपल्याला वाईट माणसातही असणारे चांगले गुण पाहण्याची दृष्टी देते.
कनक आणि कांता यामुळे माणूस असूर बनतो. म्हणूनच श्रीविष्णूंनी या दोघांकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आगेमागे जोडून तीन दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार लक्ष्मीपूजनाला कनक म्हणजे लक्ष्मीला पूजण्याची पूज्य दृष्टी; तर भाऊबीजेला समस्त स्त्री वर्गाकडे आई किंवा बहिणीच्या मायेने पाहण्याची दृष्टी देणारे दोन दिवस येतात. थोडक्यात म्हणजे अज्ञान, मोह, लालसा, सत्ता यांच्या अंधारातून ज्ञान, श्रद्धा, सद्भावना यांच्या प्रकाशात जाण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.
आजचा दिवस हा संकल्पासाठी एकदम शुभ आहे. हा पाडवा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक दिवस आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात आजपासून करावी असे संकेत आहेत. त्यामुळे त्या कामाला आपोआप पावित्र्य, नैतिकता प्राप्त होते. ते काम उत्तम रीतीने, चांगलेच करण्याचा आपला प्रयत्न होतो. चांगल्याचे फळ शेवटी चांगले मिळते असा विश्वास मनात दृढ असला की फलश्रुती चांगलीच होते.
काही ठिकाणी या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा भोग अर्पण केला जातो. त्याची डोंगराच्या स्वरूपात मांडणी केली जाते म्हणून याला ‘अन्नकूट ‘ असेही म्हणतात.
हा दिवस पती-पत्नीच्या नात्यातील पावित्र्य जपणारा आहे. पत्नी आपल्या स्नेहज्योतींनी पतीला ओवाळते तर पती तिला प्रेमाची भेट देतो अशी संकल्पना आहे. आयुष्यातील रोजची धावपळ, रूक्ष व्यवहार, वैचारिक मतभेद यामुळे या नाजुक नात्याला अपरिहार्यपणे धक्के बसतात. नात्यात नाराजी, दुरावा येतो. या सणाच्या निमित्ताने तो दूर करून पुन्हा मनोमिलनाची जवळीक साधत आनंदाची वाटचाल सुरू करायला हा सण उत्तम पर्वणी असतो.
आनंदाची, उत्साहाची हसतखेळत बरसात करणारा हा दीपोत्सव. या सणाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्याला चैतन्याने उजळून टाकावे, नात्यांना नवीन झळाळी देत ती आणखी घट्ट करावीत, उद्योग व्यवसायात उत्तम यश मिळावे आणि सर्वांची आनंदाची, समृद्धीची, उत्तम आरोग्याची वाटचाल व्हावी अशा भरभरून हार्दिक शुभेच्छा.
शुभ दीपावली.
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈