सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “सुखाची किल्ली…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
बरेचदा मनात विचार येतो, माणसाला नेमकं काय हवं असतं ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला जाणं म्हणजे ते समुद्रातील पाणबुडे वा गोताखोर लोकं समुद्राचा तळ ढुंढाळायचा प्रयत्न करतात, तसं काहीसं वाटलं. सुख, आनंद ह्या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलत जातात. तरीही ढोबळमानाने सुखी होण्यासाठी काही बेसिक गोष्टींना अग्रक्रमाने स्थान मिळतं.
ह्या बेसिक गोष्टींपैकी पहिलं स्थान आपलं आणि कुटूंबियांच आरोग्य.”सर सलामत तो पगडी पचास” ह्या म्हणीनुसार आपलं निरामय आरोग्य आपल्याला खूपसारं मनस्वास्थ्य देतं. आपल्या वा आजुबाजुच्या अनुभवाने आपल्या लक्षात येतं आपला प्रत्येक अवयव हा तितकाच महत्त्वाचा असतो. आपल्याला जेव्हा एखाद्या अवयवाला ईजा होते तेव्हा नेमकं आपल्या मनात हटकून येतं,दुसरा कुठलाही अवयव एकवेळ परवडला पण ह्या अवयवाचं दुखणं नको रे बाबा.
दुसरं स्थान आपलं मानसिक आरोग्याचं. काही कारणाने आपली मनस्थिती जर ताळ्यावर नसेल तर त्याक्षणी प्रकर्षाने जाणवतं. एकवेळ शारिरीक आजारपण असलं तर दिसतं तरी पण काळजी,विवंचना ह्याने हरवलेलं मनस्वास्थ्य मात्र दाखवताही येत नाही अन लपवताही येत नाही.
तिसरी अवघडलेली अवस्था म्हणजे आर्थिक विवंचना. ह्या स्थितीतील व्यक्तींना वाटतं आरोग्यावर पैशाने इलाज तरी करता येतो. फक्त पैसा,सुबत्ता हवी मग काळजी आसपास ही फिरकतही नाही.
वस्तुस्थिती अशी असते की आपल्याला ह्या कुठल्याही प्रकारची चिंता नसली वा व्यक्ती जवळ जबरीची सहनशीलता असली तरी हा भवसागर तारुन जायला मदतच होते.
म्हणूनच संतांनी म्हंटलच आहे “सदा सर्व सुखी असा कोण आहे ?” . त्यामुळे सुखी होण्याची किल्ली ही आपलीच आपल्याजवळ असते हे खरं
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈