सुश्री त्रिशला शहा
विविधा
☆ ‘थालीपीठ’ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये सर्वांच्या आवडीचा, खमंग,चटकदार आणि प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात अगदी मानाने विराजमान झालेला पदार्थ म्हणजे ‘थालीपीठ’. इतकचं काय तर हाँटेल,टपरी,अगदी पंचतारांकित हाँटेल मध्ये सुध्दा हे थालीपीठ स्पेशल डिश म्हणून आपल्यासमोर येते.नुसत नाव जरी घेतल तरी तोंडाला पाणी सुटणारा हा पदार्थ.थालीपीठ कुणाला आवडत नाही असा माणूसच विरळा.अगदी राजेशाही थाटापासून ते झोपडीपर्यंत आणि आयत्या वेळी पटकन करुन खाण्याजोगा हा पदार्थ. संध्याकाळच्या वेळी संपुर्ण स्वैपाकाचा कंटाळा आला तर ” चला,चार थालीपीठ लावते ” असे म्हणून वेळ मारुन नेणारा ग्रुहिणींचा पक्का दोस्त.
पण तरीसुध्दा ही इतकीच महती नाही बरं का या थालीपिठाची कारण साग्रसंगीत, व्यवस्थित डावं,उजवं सोबत घेऊन पानात येणारा हा खमंग, चविष्ट पदार्थ आहे.त्यामुळेच तो सर्वांच्या आवडीचा आहे.
मंडळी,अहो पुराणातही या थालीपीठाचा उल्लेख आढळतो बरं का.यमुनेच्या तीरावर क्रुष्णाच्या सवंगड्यांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करुन केलेल्या काल्यामध्ये या थालीपीठाचाही समावेश होता.क्रुष्णासह सारे सवंगडी याचा आस्वाद घेत होते तेव्हा क्रुष्णाच्या पानात आलेला पेंद्याच्या घरचा थालीपीठाचा तुकडा अगदी आवडीने,चवीने क्रुष्णाने खाल्ला होता म्हणे.
पु. ल. देशपांडे यांच्या ‘ असा मी असामी ‘ या पुस्तकात पु. ल.म्हणतात ” संसारातील रोजच्या कटकटींना कंटाळून कधी कधी संसार सोडून जावेसे वाटते पण त्याच दिवशी सौ. ने कांद्याचे थालीपीठ केलेले असते. “पहा मंडळी, एका मोडणाऱ्या संसाराला वाचवायचं काम हे थालीपीठ करतं अस म्हणता येईल. तर, ‘जाऊबाई जोरात’ या नाटकामध्ये महिलांच्या बसमध्ये दरोडेखोर येतात आणि सामानाची झडती घेताना त्याच्या हाती एक डबा लागतो तेव्हा त्यातील पदार्थाच्या वासाने तो मोहून जातो आणि यात काय आहे असे एका महिलेला विचारतो. तेव्हा त्यात थालीपीठ आहे असे सांगितल्यावर म्हणजे काय असे तो विचारतो त्यावेळी त्या थालीपीठाच्या रेसिपीचे वर्णन त्या नायिकेने (निर्मिती सावंत) इतके अफलातून केले आहे कि बस्.
म्हणजे पुराणापासून चालत आलेल हा पदार्थ आजही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अढळ स्थान मिळवून आहे.
आता हे थालीपीठ बनते कसे? तर ज्वारी,बाजरी,गहू,चणाडाळ, तांदूळ या धान्याच्या एकत्रीकरण केलेल्या पीठापासून.अगदी खास पध्दतीने करायचे असेल तर ही धान्ये भाजून घेऊन त्याचे पीठ करुन त्यात कांदा,मिरची,कोथिंबीर, हळद,हिंग,तीळ,जीरे,मीठ असे सर्व साहित्य घालून मळून पोळपाटावर पातळ फडक्यावर भाकरीसारखे थापून तव्यावर तेल सोडून खमंगपणे दोन्ही बाजू भाजून घेतल्या जातात.अशा पध्दतीने थालीपीठ बनवताना आपल्या आवडीनुसार यात काही भाज्यासुध्दा घातल्या जातात.
घरी, प्रवासात, डबापार्टी, भिशीपार्टी, डोहाळजेवण असा कुठेही चालणारा आणि चवीने खाल्ला जाणारा हा पदार्थ. पंजाबी,चायनीज,गुजराती,बंगाली, इटालियन अशा विविध पदार्थांची कितीही रेलचेल असली तरी लोणी,दही,लसणाची चटणी,लोणचं असं सार सोबत घेऊन ताटात येणारे हे थालीपीठ म्हणजे सर्वांची आवडती महाराष्ट्रीयन परिपुर्ण थाळीच. महाराष्ट्रात श्रावणात,नागपंचमीच्या आदल्या दिवशी असे थालीपीठ बनविण्याची पध्दत आहे.ग्रामीण भागात याला ‘ धपाटे ‘असेही म्हणतात.म्हणजे तसं तर धपाटे हा थालीपीठाचा जुळा भाऊ म्हटलं तरी वावग ठरणार नाही. म्हणजे सणावारीसुध्दा थालीपीठ बनविण्याची पध्दत आहे.अगदी नवरात्रीच्या नवू दिवसांच्या उपवासातही बदल म्हणून शाबूदाणा,वरी,बटाटा यापासून थालीपीठ बनविले जाते.
मंडळी,भारतीय खाद्यसंस्कृती अनेकविध पदार्थांनी परिपुर्ण तर आहेच पण या थालीपीठाचीसुध्दा चांगलीच महती आहे म्हणूनच अलिकडे गावागावातील प्रत्येक खाऊगल्लीमध्ये भेळ,आईस्क्रीम, पिझ्झा,बर्गरच्या जोडीला दही,खर्डा थालीपीठाच्याडिशने मानाचे स्थान मिळवले आहे.
© सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈