सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “जागतिक ग्राहक दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
(15 मार्च- निमित्ताने)
आपल्या रोजच्या जीवनात अनेक व्यवहारिक गोष्टींना सामोरे जावे लागते. तो व्यवहार बघतांना कधी आपला आर्थिक संबंध येतो तर कधीकधी परिचयातून व्यवहारात भावनिकता पण येते. कधी आपण ग्राहक असतो तर कधी विक्रेता. अर्थातच प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या व्यवहारात ग्राहकाची भुमिका निभावतेच.
आपल्याला आपल्या मुलभूत हक्काच्या गोष्टी आपसूकच मिळाल्या तर आपण नशीबवान ह्या सदरात मोडतो असं समजावं परंतु जर आपल्याला आपल्या हक्काच्या मुलभूत, जीवनावश्यक, अर्थातच नियमांना धरून जर पुरवठा झाला नाही तर प्रत्येकाने त्यासाठी लढायची,आपले हक्क मिळवायची तयारी ही ठेवलीच पाहिजे. कारण अन्याय करणाऱ्या इतकाच तो सहन करणाराही दोषी असतो हे विसरून चालणार नाही.
त्यामुळे आपल्याला आपल्याच हक्काच्या गोष्टी मिळतांना वा गरजेनुसार गोष्टी विकत घेतांना आपली कुठे फसगत तर होत नाही नां ह्याकडे अत्यंत डोळसपणे,जागरुकतेने प्रत्येकाने बघण्याचीच खरी गरज आहे म्हणून “जागो ग्राहक जागो” ह्या घोषवाक्याची आज 15 मार्च ह्या आंतरराष्ट्रीय ग्राहक दिनाच्या दिवशी हटकून आठवण ही येतेच.
15 मार्च हा दिवस “आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन”म्हणून ओळखल्या जातो.15 मार्च 1962 साली अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी ह्यांनी ग्राहकांसाठीच्या हक्कांची सनद त्यांच्या भाषणात मांडली.ते हक्क पुढीलप्रमाणे आहेत.
1 सुरक्षेचा हक्क,2 माहिती मिळविण्याचा हक्क,3 निवड करण्याचा हक्क,4 मत मांडण्याचा हक्क,5 तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क,6 ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा हक्क.
दुर्दैवाने आपल्याकडील ग्राहकच अनभिज्ञ राहून ह्या विषयाची माहिती करून घेण्याच्या बाबतीत उदासीन असतो.कितीही जाहीरातीत “जागो ग्राहक जागो”हे घसा फोडून सांगितल्या गेले तरी शेवटी “पालथ्या घड्यावर पाणी”असो.
अनेकदा खरेदी करतांना किंवा सेवेच्या बाबतीत त्याचा वापर करतांना ग्राहकांचे अनेक गोष्टींकडे असलेले दुर्लक्ष, माहितीचा अभाव हे विक्रेत्यांच्या पथ्थ्यावर पडते.ग्राहक ह्या नात्यानं मिळालेल्या अधिकारांचा वापर आपण अतिशय जागरूकतेनं केला तर हे अधिकारच आपल्याला जागरूक ग्राहक म्हणून तयार करतील. सरकार कडूनही ग्राहकांच्या जनजागृती साठी वेळोवेळी आवश्यक ती माहिती पुरविली जाते.उदा.फसवणूक झाली तर तक्रार कोठे करावी, फसवणूक करणाऱ्या संबंधित व्यक्तीला आपण धडा कसा शिकवू शकतो,त्यानंतर नुकसानभरपाई कशी मिळवू शकतो ह्याची माहिती ग्राहक सेवेअंतर्गत आपल्याला मिळते.ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, वस्तुचे गुणवत्ता प्रमाण आणि दर्जा तपासून घेण्याचा अधिकार आहे.ग्याहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच,ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्य करते.
ग्राहक आणि विक्रेते ह्यांच नातं खरतरं पोळपाट आणि लाटण्यासारखं असतं.दोन्हीही व्यवस्थित असल्यासच पोळी नीट लाटली जाणार बघा.
आमच्या बँकींग सेक्टर मध्ये तर “ग्राहक देवो भवः “हे वाक्य जणू आमचे ब्रीदवाक्य समजल्या जातं.सध्या तर बँकींग सेक्टर मधील वाढत्या स्पर्धेमुळे आणि कोरोनाने आलेल्या आर्थिक गंडांतरामुळे आम्हाला एक एक ग्राहक जोडून ठेवावा लागतो.सध्याच्या बँकींग सेक्टर वरील विश्वास नाहीसा होण्याच्या काळात आपल्या ग्राहकांचा विश्वास ढळू न देण्याचं आव्हानात्मक काम आम्हाला जिकरीनं करावं लागतं.
तर अशा ह्या ” जागतिक ग्राहक दिनी” ग्राहकांच्या हक्कांची,सुरक्षेची,अधिकारांची पायमल्ली कधीच होऊ नये हीच मनोकामना.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈