सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “वाणी…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल येतांना एक दृश्य बघितले. काही मुलांचे दोन गट आपापसात जोरजोराने वादविवाद करीत होते. नेहमीप्रमाणेच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी,परस्परांवर शाब्दिक चिखलफेक दणक्यात सुरू होती. अर्थातच दोन परस्परांविरोधी गट म्हंटल्यावर आचारविचारांत फरक हा असणारच ,हे आपण नक्कीच समजू शकू,परंतु फक्त मीच योग्य, माझेच बरोबर ही भुमिका कुठेतरी विचारात पाडू लागली.

त्यांचे आरोपप्रत्यारोप बघून,ऐकून एक मात्र नक्कीच लक्षात आलं,संत ,महात्मे,गुरू हे वाणी,वाचा हे दुधारी शस्त्र आहे असं सांगतात, ते। किती अचूक असतं ह्याचा प्रत्यय ते भांडण, वादविवाद ऐकतांना आला. खरंच शब्द हे खूप जपून वापरावेत. एकवेळ मारलेला मार विसरता येतो म्हणतात परंतु शाब्दिक जखमा ह्या कायमचे व्रण ठेऊन जातात.

जर वाणीवर वा वाचेवर आपली स्वतःची कमांड ठेवायची असेल तर त्याची सुरवात आपल्या मेंदूपासून करावी लागते. जर डोकं हे कायम शांत,स्थिर ठेवायची वा मेंदू कधीही बिथरु न देण्याची किमया साधल्या गेली तर आपोआप आपल्या वाचेवर,मनावर,ह्याचा पगडा बसतो आणि मग आपल्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हा खूप तोलूनमापून, विचारपूर्वक बाहेर पडतो.ही सगळी शक्ती संयमामध्ये एकवटलेली असते. स्वतःचे लगाम स्वतःच्या पूर्ण कंट्रोल मध्ये असले की अर्धी लढाई आपण तेथेच जिंकलेलो असतो.

ह्या सगळ्यामुळे खरंच जाणवतं की माझ्या वर त्या शांत शिवशंभुचीच कृपा मला शक्यतोवर कधीच,कुणाचाच, कशाचाच राग येत नाही आणि त्यामुळेच मेंदू कायम शांत राहून आपल्याकडून काही उणेदुणे दुखविणारे शब्द बाहेर पडतील ही भिती मला नसतेच. माझ्या एका मैत्रीणीने मला छान प्रश्न विचारला, आपला काही दोष नसतांना कुणी तुझ्या वर दोषारोप केले,तुझ्यावर ताशेरे ओढले तर तुला खरंच राग नाही येणार. मी उत्तरले, राग नाही येणार, वाईट मात्र वाटेल पण लगेच माझ्या लक्षात येईल आपली पात्रता,योग्यता आपणच ठरवायची,आपलं मनं हे आपल्याशी कायम खरं बोलत असतं.एकदा हे नीट समजून घेतलं तर पुढील सगळं सोप्पं होत जातं. वामनराव पै म्हणतात तसं “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.

ह्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरी राजकारणातील व्यक्तींकडून झाडल्या की तो कळस गाठतो. त्यांची घटके घटकेला बदलणारी मैत्री वा वैर,त्यांची ह्या बोटावरुन ह्या बोटावर बदलणा-या थुंकीसारखे विचार,मतं ह्याने तर आश्चर्यचकीतच व्हायला होतं.सरड्याहूनही फास्ट  घडोघडी रंग बदलण्याची क्षमता ही खास राजकारणाच्या आखाड्यात बघायला मिळते.असो

काल बघितलेले भांडण हे मित्रांचे पेल्यातच जिरणारं भांडण असतं हे ही खरच त्यामुळे आपल्या क्षणिक रागामुळे आणि त्यानंतर सुटलेल्या वाचेमुळे मैत्र गमावल्या जायला नको.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments