सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “निसर्ग चक्र…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
गुरुवारी संध्याकाळी अमरावती भागात प्रचंड वादळवारं,पाऊस झाला. सुरू झालेला वादळवारा,गडगडाट ह्यांच्या मा-याने मला उगीचच अस्वस्थ व्हायला झालं.जबराट वा-यानं झाडं,वृक्ष जणू गदगद हलू लागली,काही ठिकाणी ती उन्मळून पण पडायच्या बेतात आली. ह्याबरोबरच असंख्य पक्षी हे त्या झाडांवरील निवारा सोडून दुसरीकडे सैरावैरा आश्रय शोधायला भिरभीरु लागली. जवळच गोशाळा असल्याने तेथील पशूधन देखील हंबरायला लागलं.जवळच्या झोपड्यां मधील लोक पक्क्या इमारतींच्या आश्रयाला आले. तेवढ्यात वीज म्हणजेच इलेक्ट्रिसीटी पण गुल झाली. सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं .हे सगळं खिडकीतून न्याहाळतांना मनं काळजीनं बेचैन झालं.काही वेळी अपरिचितां वर पण अशी आपत्ती कोसळली तरी आपल्याला काळजी ही आपोआपच वाटायला लागते.ह्यालाच माणुसकीचे बंध म्हणत असावेतं. अशा कातरवेळी एक अनामिक हूरहूर दाटून आली.क्षणभरासाठी का होईना देवावरचा
नशीबावरचा विश्वास डळमळला.पंचभूतांपैकी जल आणि वायू तत्वराशीच्या शक्तीचा पून्हा एकदा प्रत्यय आला. अशा संकटकाळी प्रकर्षाने जाणवतं खरचं सगळं इथल्या इथेच सोडून द्यावं लागतं. क्षणभरासाठी का होईना मोह,माया ह्यांचा विसरपडून आपली धुंदी खाडकन उतरते.
काही तासं गेले. काही तासांपूर्वीचे औदासिन्य, नैराश्य अजून मनावर तसचं होतं.त्यामुळे नेहमीसारखं कामाला लागतांना उत्साही वाटत नव्हतं,मरगळ अजूनही मनावर आपली चादर पसरवूनच होती.पण कामाला न लागता पण भागणार नाही ही सत्यता स्विकारुन कामाला उठले, दार उघडून गँलरीत आले आणि काय आश्चर्य, सभोवतालचे दृश्य बघून आत्मविश्वास परत आला,सुळकन नेहमीसारखी उभारी मनात शिरली.मरगळ, नैराश्य, औदासिन्य तर कुठल्या कुठे धूम पळून गेलं. एका चिमणीने आपलं बांधलेलं घरटं परत डागडुजी केल्यागत ठीक केलं,जणू काही विनातक्रार.
पक्ष्यांनी स्वतःसाठी दुसऱ्या झाडांचा आश्रय शोधला,ते सगळे पक्षी चोचीत बारीकसारीक काडीकचरा जमा करून आणित होते.त्यांनी परत नवीन घरटं बांधायला सुरवात देखील केली होती,त्याच तडफेने त्याच जोमाने.
विशेष म्हणजे दूरवरील त्या झोपड्यांमधील लोक पण स्थानिक लोकांच्या मदतीने डागडुजी करायला लागले ते पण न कंटाळता,न रडता.
खरचं आतापर्यंत बघितल्या पैकी सगळ्यात सुंदर दिवसाची ती सुरवात भासली मला.सगळ्यात प्रसन्न सकाळ ती हीच असं प्रकर्षाने जाणवलं.खरचं त्या परमेश्वराची लीला अगाध आहे.परत लढण्याचं,संकटातून परत जोमाने बाहेर पडून कामाला लागण्याचं बळ तोच आपल्याला पुरवितो ह्याची पक्की खात्री पटली आणि माझ्याही नकळत माझे हात आकाशाकडे बघत आपोआप नतमस्तक होऊन जोडल्या गेलेत.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈