विविधा
☆ “ढवळी…” ☆ सौ. अमृता मनोज केळकर ☆
“कोजागरी पौर्णिमेच्या रात्रीचा जन्म आहे म्हणून अमृता इतकी गोरी आहे!” हे माझ्या आईचं लोकांनी विचारलेल्या “इतकी कशी गोरी हो तुमची पोर?” या प्रश्नाला ठरलेलं उत्तर होतं.😅 लहानपणी काहीही वाटत नव्हतं. पण जसजशी समज येत गेली तसतशी गोऱ्या रंगाच्या तोट्यांची कल्पना यायला लागली.😐
जरा मोठी झाल्यावर तर फारच भयानक अनुभव यायला लागले… एका बाईनं चक्क मला विचारलं “तुला कोड आहे का गं?” मला तर त्या वयात कोड म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. 😂 आणि हो, हे विचारणारी ती एकटीच नव्हती… अनेकांनी अनेकदा मला हाच प्रश्न विचारलेला आहे…🤣 अगदी लहान असताना माझ्या अंगी असलेल्या रेसिस्टपणाचं हे फळ आहे असं मला नेहमी वाटत आलंय. ते कारण म्हणजे माझे बाबा मला माझ्या लहानपणीचा एक किस्सा सांगतात… बाबांना भेटायला त्यांचा एक पोलिस मित्र येणार होता. नेहमीप्रमाणे आईने मला बाबांच्या कडेवर पार्सल केलेलं त्यामुळे ते आणि त्यांच्या कडेवर मी असे आम्ही दोघे त्यांच्या मित्राला भेटायला गेलो. त्यावेळेस मी दोन वर्षांची असेन… मला बघून बाबांच्या मित्राला आनंद झाला… “प्रमोद किती गोड आहे रे तुझी पोर!” असं म्हणून त्या सावळ्या माणसाने माझ्या गालाला स्पर्श केला. मला ते आवडलं नसावं कदाचित म्हणून मी माझ्या हाताने माझा गाल पुसला आणि बाबांना म्हंटले, “बाबा त्याला सांगा हात नको लावू त्याचा रंग लागेल…” बाबा हसून बेजार झाले… तो इन्स्पेक्टर अगदी ओशाळला… “प्रमोद अरे माझ्यासमोर मान वर करायची हिम्मत होत नाही लोकांची आणि तुझ्या पोरीने पार लाजच काढली माझी एका वाक्यात…”😂
शाळेत गेल्यावर तर आणखी वेगळी तऱ्हा… मी कधीच बॅकबेंचर नव्हते. अगदी पहिल्या बेंचवर बसायला आवडायचं म्हणून वर्गात सगळ्यात आधी येऊन बसायचे. मी बसायचे तिथे नेमकी वर्गाच्या दारातून उन्हाची तिरीप माझ्या चेहऱ्यावर पडायची. एकदा शिकवता शिकवता मध्येच बाईंनी मला उठून मागच्या बेंचवर जाऊन बसायला सांगितलं… मला कळलं नाही की काय झालं… बाई म्हणाल्या, “तुझा चेहरा आणि घारे डोळे मांजरीसारखे चमकतात उन्हात ते बघून शिकवण्यात लक्ष लागत नाहीय.”🤣 काय बोलणार यापुढे? बिच्चारी मी बसले गपचुप मागच्या बेंचवर!😅
अजून एक अनुभव आला तो लग्न ठरल्यावर. लग्न ठरलं की ब्युटी पार्लर हा पर्याय अपरिहार्य असतो हे माझ्या मनावर ठसविण्यात माझी मोठी बहीण यशस्वी झाली होती. त्यामुळे पैसे देऊन भुवया बिघडवून घ्यायला मी पार्लर मध्ये गेलेली असताना माझ्या सोबतच एक बाई तिच्या आठ – नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन आलेली होती. तिने पार्लर मधल्या काकुंना विचारलं “मी चेहऱ्याचा काळपटपणा जाण्यासाठी कोणत्या ब्रँडचं क्रीम वापरू?” काकू म्हणाल्या, ” हर्बल क्रीम वापरा एखादं” बाई म्हणाली”मी फेअर अँड लव्हली वापरू का?” काकू म्हणाल्या, “अजिबात नको! चांगलं नाहीये ते स्किन साठी.” हा सुखसंवाद चाललेला असताना त्या बाईचा मुलगा एकाएकी माझ्याकडे बोट दाखवून तिला म्हणाला, “आई तू कोणतंही क्रीम लावलंस तरी या ताईसारखी गोरी नाही होणार!” हा घरचा आहेर मिळाल्यावर बाई पेटलीच एकदम… माझ्यावरच घसरली… “काही कामधंदे नसतील त्या ताईला… आम्ही उन्हा तान्हात काम करून रापतो!” माझं हसू मी दाबून ठेवण्याच्या नादात तिला प्रत्युत्तर द्यायचं राहूनच गेलं…🤣 तात्पर्य: मुलांना पार्लर मध्ये आणू नये ती खूप खरं बोलतात.😬
माझ्या लग्नात पण “कशी दिसतेय जोडी, अगदी ब्लॅक अँड व्हाईट!” असं चिडवणारी भावंड मागल्याजन्मीचं उट्टं काढायला आलेली पितरं असावीत असा विचार मनात येऊन गेला…😅 नवऱ्याचे मित्र देखील कमी नव्हते त्यात – “पार्लरचा खर्च वाचवलास लेका!” असं म्हणणारे!
एकदा आईसोबत पुण्यात तिच्या एका मैत्रिणीकडे जायचं होतं. एक रात्र मुक्काम करावा लागणार होता. गप्पा, जेवणं वगैरे उरकल्यावर मी माझं अंथरूण आईच्या बेडशेजारी जमिनीवर अंथरलं. झोपून गेले. रात्री तहान लागली म्हणून पाणी प्यायला उठले तर लक्षात आलं की आईची मैत्रीण पण उठून बसली आहे आणि आपल्याकडे विस्मयाने एकटक पाहत आहे! माझी घाबरगुंडी उडाली! हे काय आता… या बाईला वेड – बीड लागलं आहे की काय? पाणी न पिता तशीच गपचुप झोपून गेले. सकाळी उठल्यावर घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने तिला विचारलं का बघत होतीस रात्री अमृताकडे? तर ती म्हणाली, “अगो नीलांबरी, तुझ्या मुलीचा चेहरा रात्री चमकत होता. खूप तेज दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर! रुक्मिणीस्वयंवरात जसं वर्णन आहे अगदी तसंच!” मग मी “नाही हो, तो बाहेरचा प्रकाश शोकेसच्या काचेवर पडून माझ्या तोंडावर रिफ्लेक्ट होत होता.” असं सांगून समजावण्याचा निष्फळ प्रयत्न केला. दुपारपर्यंत माझ्या चेहऱ्यावरचं ‘ तेज ‘ पहायला त्यांच्या आणखी काही अध्यात्मिक मैत्रिणी जमल्या. आई मात्र माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती…😂
आमच्याकडे सैरंध्री नावाची एक आजी धुणी- भांडी करायला येत होती. माझी आणि तिची चांगली गट्टी होती… खूप प्रेमळ होती ती… सैरंध्री लांबूनच मला पहायची. मी दिसले नाही अंगणात तर लगेच आजीला विचारायची “तुमची ढवळी कुठाय वैनी?” तिने केलेलं माझं ‘ ढवळी ‘ हे नामकरण मला अजिबात आवडत नव्हतं. मी आईला विचारलं, आई ढवळी म्हणजे काय गं? आई म्हणाली, “खूप गोरी”…
ढवळी! खरंच कितीतरी रंग आणि अंतरंग पहायला मिळाले या एका गोऱ्या रंगामुळे! कधी अगदी डांबरट तर अगदी साधीभोळी रंगाने कितीही सावळी असली तरी मनाने अगदी शुभ्र, निर्मळ. काय भुललासी वरलिया रंगा… या अभंगासारखी अभंग! त्यामुळे परमेश्वराच्या कृपेने कधीही गोऱ्या रंगाबद्दल अहं मनात डोकावला नाही. तसंच मिळालेल्या वर्णाबाबत कधी वैषम्य सुद्धा वाटलं नाही. कधीकधी सैरंध्रीची हाक आठवते… “ढवळे, चुलिपाशी जाऊ नको बाय अंगाला काळं लागेल गो!” मी मोठी झाल्यावर मला कळलं की सैरंध्रीची नात साथीच्या रोगात वारली होती. ती माझ्याइतक्याच वयाची होती. मला बघून डोळ्यांत पाणी यायचं तिच्या! अनेक वेळा वाटलं असेल तिला मला उचलून कडेवर घ्यावंसं माझ्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवावा असं… पण परत नाही अडकली ती त्या मायेच्या स्पर्शात… आता वाटतं चुलिपाशी जाऊन अंग राखेने माखून घेतलं असतं तर कदाचित सैरंध्रीने मला उचलून घेतलं असतं… माझा ढवळा रंग तिला नक्की लागला असता…
✍️ सौ. अमृता मनोज केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈