सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “पसारा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

मध्यंतरी काँलनीत शेजारी एक नवीन बि-हाड आलं.अतिशय आटोपशीर, मोजकं सामान आलं.नेहमीच्या उत्सुकतेने आपल्या नेहमीच्या कुवतीनुसार मनात आलं अजून मागून बाकीचे सामान येणार असेल.पण नंतर कळलं त्या कुटुंबात मोजकं आणि आटोपशीर सामान आहे. कळल्यावर ,बघितल्यावर खूप जास्त कौतुक वाटलं,आणि थोडी स्वतःच्या हव्यास म्हणा सोस म्हणा त्याची लाजचं वाटली.

मग कुठे जरा डोळे उघडून माझी स्वतःची स्वारी आवरासावरीकडे वळली. भसाभसा कपाट उपसली. आधी नंबर लावला कपड्यांच्या कपाटाचा. ते साड्यांचं,ड्रेसेस चं कलेक्शन बघितल्यावर क्षणभरासाठी का होईना स्वतःची स्वतःलाच लाज वाटली. किती हव्यासासारखे जमवितो आपण. मनात आल जवळपास थ्रीफोर्थ आयुष्य निघून गेलं.उर्वरित आता जे काही दिवस असतील ते नोकरीतील निवृत्तीनंतर घरीच राहण्याचे. त्यामुळे आपण ह्या सगळ्याचा विनीयोग कसा करणार ?

त्याक्षणी प्रकर्षांने जाणवून गेलं प्रत्येक व्यक्तीने पसारा हा घालावा पण त्याचा त्याला आवरता येईल इतपतच घालावा. मनात आल हा पसारा मला आवडतोय म्हणून मी मांडून ठेवला हे खरयं पण हा पसारा आपल्यापश्चात घरच्यांना आवरतांना नाकी नऊ आणेल हे पण नक्की. म्हणजेच आपण दुस-याचा त्रास कमी करण्याऐवजी वाढवतोयच की.

खरंच  ज्या माणसाला कुठेतरी थांबायचं, आवरत घ्यायचं,आटोपत़ घ्यायचं हे नीट वेळेवर उमगलं तो शहाणा,सुज्ञ माणूस समजावा. पूर्वी जी वानप्रस्थाश्रम नावाची संकल्पना होती ती किती यथार्थ होती नाही कां ?

जी गोष्ट कपड्यांची तीच वस्तु वा भांडी ह्यांचीपण. थोडक्यात काय तर प्रश्न हा किती संग्रह, साठवणूक करतो आणि तो संग्रह वा साठवणूक खरंच आपल्या पुढील पिढीसाठी फायद्याची वा आवश्यक असणार आहे ह्याचा पण आपल्याला  गांभीर्याने विचार करावाच लागणार आहे.दिवसेंदिवस हा काळ धावपळीचा दगदगीचा येतोय तेव्हा जातांना तरी पुढील पिढीच्या समस्या वाढवून जाऊ नये ही मला प्रकर्षाने जाणीव झाली.

आता आपला हा पसारा आवरता घेऊन नवीन पिढीला त्यांच्या मनाने पसारा घालायला वाव द्यावा हा नवीन विचार ह्या वर्षात सुचला हा प्लसपाँईंटच म्हणावा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments