सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ “तिनं काय करायचं?” ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
तिचा स्वभाव मुळातच थोडा अस्थिर. बहिणी ,भाऊ आणि आई यांच्या नजरेत आणि प्रेमात मोठं झालं हे शेवटचं अपत्य.
लग्न करुन दिलेला परिवार ही मोठाच. कोल्हापूर जवळचं खेडेगाव. ही घरची सर्वात मोठी सून. मिस्टरांचे नोकरी निमित्ताने मुंबईत वास्तव्य. त्यांचा स्वभाव ” संत माणूस “. आपलं काम, अणि योगी, ऋषी, संत, अध्यात्म यात सदैव मग्न.
लग्नानंतर ती पण मुंबईत गेली. आर्थिक परिस्थिती त्यावेळी 40 -43 वर्षापूर्वी सर्वांचीच जेमतेम. तिने मशीन वर शिलाई करुन, साड्या फॉल पिको करुन आर्थिक बाजू आपल्या परीने उचलून धरली. मुंबई सारख्या
मायापूरीत छोटेसे घर घेणे शक्य करुन दाखवले.पुढे तर एकावर एक 1 +2 इमले उभे केले.दोन मुले मोठी झाली.उच्च शिक्षित झाली.यथावकाश लग्ने झाली. दोघानाही 2-2 मुले झाली. तिचे मिस्टर 60 व्या वर्षी निवृत्त झाले. मुले, सुना, नोकरी करणा-या . नातवंडे आज्जीजवळ. आज्जी निगुतिनं सगळं करत होती. दोन्ही मुलांनी आपले संसार थाटले. हिचं स्वयंपाकघर मोठ्या सुनेनं ताब्यात घेतलं. धाकट्यानं जवळच घर घेतलं. आज्जिची विभागणी झाली. तिनं ही साठी ओलांडलीच की. शरीर आणि मन यांची सांगड घालताना तिची
घालमेल होऊ लागली आणि इथेच तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं. आता तिचा कामा पुरताच उपयोग राहिला. काम होत नाही तर सहवास ही नकोसा झाला होता.
त्यातच गावाकडे तिचे सासरे निवर्तले. खेडेगाव च्या पद्धतीप्रमाणे सासुबाईचे लेणे काढण्यात आले.हिला त्यांचे भुंडे हात बघवले नाहीत. पठ्ठीन आपल्या हातातल्या पाटल्या ( ज्या तिच्या आईन तिला लग्नात घातल्या होत्या) सासूच्या हातात चढवल्या.
🤦🏻♀️ हे कळताच नवरा, मुले, सुना तिच्यावर इतक्या नाराज झाल्या की तिच्याशी बोलणेच बंद केले. मोबाइल चालू ठेवायला ही पैसे देत नाहीत.
आता ना तिच्या हातात पैसा, ना कुणाचा शब्द!
आयुष्यभर तिने पार पाडलेल्या जबाबदा-या, खस्ता, कष्ट, पतीला दिलेली साथ, प्रेमाने एकत्र बांधून ठेवलेला परिवार, सुनाना वेळोवेळी केलेली मदत, नातवंडांचं प्रेम हे सगळं इतक्या सहजतेनं संपतं?
काय चुकलं तिचं?
काय करायचं तिनं?
ती साधी?
ती भोळी?
ती बावळट?
की ती खुळी?
मला तरी या प्रश्नांनी भंडावून सोडलय…..
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈