श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “वहीचे एक पान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

काही शब्द लक्षात राहतात. ते कायम एकमेकांच्या सोबतच असतात. किंवा त्याच पध्दतीने ते म्हटले, वाचले, किंवा लिहिले जातात. जसे दिल, दोस्ती, दुनियादारी. किंवा अन्न, वस्त्र, निवारा. सत्यम, शिवम, सुंदरम्. तन, मन, धन. तसेच वही म्हटले की पुस्तक, आणि शाळा हे शब्द आपोआप डोळ्यासमोर येतात.

आपल्या शाळेतील ती पाच सहा वर्षे म्हणजे माझ्या आयुष्यातील लक्षात राहण्याचा वेधक आणि वेचक काळ.

पुस्तक हे आपल्याला शिकवते. ते आपलं जरी असलं तरी आपण शिकण्यासाठी दुसऱ्याने मेहनत घेऊन ते तयार केलेलं असतं.

पण वही ही आपली असते. या वहित दोन प्रकार असतात. एक प्रत्यक्षात असते. आणि दुसरी असते पण दिसत नाही.               

आपण काय शिकलो हे  वहीत उतरवतो. शाळेच्या वह्या यात प्रश्नोत्तराच्या, गणिताच्या, निबंधाच्या या पुढल्या वर्षी जवळपास रद्दीतच जात असत. 

पण अदृश्य वही जी अद्याप माझ्या स्मरणात आहे. आणि त्यातले अक्षर अन् अक्षर, शब्द, आणि ओळ आजही मी न अडखळता वाचु शकतो. किंवा आज तो माझा विरंगुळा आहे. माझा आनंद आहे. आणि बऱ्याच प्रमाणात माझी संपत्ती. अशी वही म्हणजे मित्रपरिवाराची वही. हि वही रद्दीत जाणे शक्यच नाही. उलट जसजशी ती जुनी होते, तसतसे तिचे मुल्य वाढत जाते. ती जीर्ण होईल पण टाकाऊ होणार नाही हा विश्वास आहे.

कोणतीही गोष्ट उतरवण्यासाठी ती अगोदर मनात असणे गरजेचे असते. मनात असलेल्या गोष्टीत आपलेपणाचा ओलावा असतो. तर नसलेल्या गोष्टी उतरवायचा प्रयत्न केल्यास त्यात कोरडेपणा असतो. आणि अशी माझी मित्रपरिवाराची वही ज्यात फक्त आपलेपणा आणि ओलावा असल्याने कायम ताजी टवटवीत जाणवते.                    

हि वही चाळतांना एक वेगळाच चाळा मनाला लागतो. हाच चाळा म्हणजे आपण सोबत एकत्र घालवलेले दिवस आठवणे.  

माझ्या या अदृश्य वहित प्रश्न नाहीत, तर आठवणींची साठवण आहे. गणिते नाहीत, तर पडलेली गणिते सोडवण्याची पद्धत आहे. शुद्धलेखनाच्या चुका नाहीत, तर चुकू नये म्हणून मैत्रीचा सल्ला आणि विश्वास देणारे आहेत. धीर देणारे आणि मदत करणारे हात आहेत. थोडक्यात जिथे उत्तर, सल्ला, विश्वास, आणि हात असतो त्यालाच आपण साथ म्हणतो. म्हणून यात आठवणींची साठवण आहे.

हे दिवस आठवले की अनेक गमती,जमती. राग, रुसवे. कट्टी, बट्टी. पास, नापास. हुशार, मठ्ठ. अभ्यास, मस्ती. अशा शब्दांच्या जोड्या तोंडातून बाहेर पडतात.

आपल्यासारखी पायी, किंवा क्वचित सायकलवर एकत्र शाळेत जायची मजा हि आजच्या स्कुलबस मध्ये कदाचित नसावी.

बऱ्याचदा मला काय मिळाले? किंवा मी काय मिळवले? असा प्रश्न पडतो. हाच प्रश्न उलट विचारला मी काय आणि कोणामुळे मिळवले? तर त्याचं उत्तर एकच आहे. ते उत्तर म्हणजे शाळा.

शाळा म्हणजे अनेक खोल्या असणारी भव्य इमारत नव्हे. तर माणूस घडवणारे मंदिर असते. यात शिक्षक नावाचा पुजारी असतो. विद्यार्थी नावाचा भक्त. आचार, विचार, आणि संस्कार यांचा प्रसाद,तर सदाचार आणि प्रामाणिक पणा यांचे तिर्थ असते. बुद्धी, शक्ती, विश्वास, आणि सामर्थ्य देणाऱ्या देवतांची पुजा होते.

असे हे माझ्या वहिचे एक पान आहे जे भगिरथ शाळा आणि १९८१ च्या १० वीच्या वर्गमित्र आणि शिक्षकांमुळेच लक्षात आहे, आणि राहिलं…

(१० वी चा वर्गमित्र ::: शाळेतील मित्रांचे झालेले गेट टुगेदर या नंतर २०२२ मध्ये लिहीलेले…) 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments