सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

“त्या तीन कविता…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आपल्याला वाचनाची गोडी असली की आपण वेळ मिळेल तेव्हा,वाचायला जे मिळेल ते अधाशासारखं वाचीत असतो.वाचतावाचता काही साहित्य मात्र मेंदूच्या कप्प्यात, ह्रदयाच्या गाभाऱ्यात अलवार जाऊन विराजमान होतं आणि कायमस्वरूपी ठाणच मांडून बसतं. वाचतांना एक गोष्ट लक्षात आली लेखन करतांना पद्यरचना जरा तरी लिहावयास सुलभ कारण आपल्याला जे सांगायचं असतं त्यासाठी भरपूर लेखन आपण करु शकतो पण त्यामानाने गद्यलेखन मात्र जरा अवघड, किचकट कारण अत्यंत कमी शब्दांत आपल्याला सगळं सार उलगडून सांगावं लागतं. त्यामुळेच कविता,चारोळ्या करणाऱ्या मंडळींच जरा जास्त कौतुक वाटतं.

अशाच तीन कविता माझ्या डोक्यात फिट बसल्यात, मनात घर करून बसल्यात. त्या तीन कविता म्हणजे प्रणय पत्रिका, चाफा बोलेना आणि गाई पाण्यावर…..

दरवेळी ह्या कविता वाचतांना, ऐकतांना नव्यानेच ऐकल्यागत एक वेगळीच ओढ,उर्मी जाणवते. मग अजून अभ्यास करता लक्षात आलं की ह्या तिनही कवितांचा रचयिता ही एकच व्यक्ती आहे.आज ह्या कवीचा जन्मदिन.  त्यांना विनम्र अभिवादन.

कवी “बी” म्हणजेच कवी नारायण मुरलीधर गुप्ते ह्यांनी प्रणय, कौटुंबिक, ऐतिहासिक व सामाजिक विषयांवर कविता केल्या आहेत.  मी मागेच कवी बी ह्यांच्या विषयीचा समग्र लेख त्यांच्या दोन  कवितांबद्दल लिहीला होताच. आज त्यांच्या प्रणय पत्रिका ह्या कवितेबद्दल विचार करू.

त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका‘ ही वर्‍हाडात चिखलदरा येथे दिनांक १४ सप्टेंबर १८९१ रोजी लिहिली गेली. त्यावेळी ते सुमारे १९ वर्षांचे असावेत. अवघं एकोणवीस वर्षांचे वय,त्यावेळेचा काळ आणि विषय प्रणय पत्रिका म्हणजे एक धाडसचं. अजूनही ह्या विषयाच्या उल्लेखाने भु्वया ह्या उंचावल्या जातात. त्याकाळी हा विषय हाती घेणं म्हणजे एक दिव्यच. ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ पत्रात प्रसिद्ध झाली.

अनेक दिवस झाले तरी प्रियकराची क्षेमकुशल सांगणारी खबरबात असलेले पत्र  आले नाही म्हणून जरा बावरलेल्या,चिंताग्रस्त  प्रेयसीने आपल्या प्रियकराला लिहिलेले पत्र म्हणजे ‘प्रणय पत्रिका’..काय नसतं ह्या भावनेत, एक उत्कटता,काळजी,प्रेम ,घालमेल ह्या सगळ्याचा अविष्कार.

किति तरि दिन झाले ! भेट नाही पदांची,

करमत मज नाही; वेळ वाटे युगाची.।।

ह्या ओळींवरुन बरेच दिवस भेट न झाल्याने होणारी तगमग,ओढ जाणवते.भेट न झाल्याने क्षण न क्षण हा हळूहळू युगासारखा भासू लागतो.

    तरल मन नराचे राहते ऐकते मी

    विसर बघुनि पावे अन्य पात्रास नामी.

    ह्या तरल भावनेचा,मानसिकता गुंतवणूकीचा

विसर तर पडला नसेल ना ह्या भितीने मनात घर केल्या गेल्यावर ह्या ओळी सुचतात.

     कमलिनि भ्रमराला नित्य कोशात ठेवी

      अविरत म्हणुनी तो पंकज प्रेम दावी.

 

     विसर पडुनि गेला काय माझाही नाथा ?

     म्हणुनिच धरिले हे वाटते मौन आता

त्या भ्रमराला नित्य सहवासात म्हणजे कोषात ठेवल्याने हे प्रेम वाढीस लागतं .तुझं हे मौन प्रेमाचा विसर पडल्याचं द्योतक तर नाही ही भिती वारंवार जाणवते.

ह्यात एक दुसराही गहन अर्थ लपलायं तो म्हणजे प्रेयसीचा उद्वेग, वैताग, तडफड हा प्रेमाचा एक अविष्कार तर तेवढीच तीव्रता तिचा प्राणप्रिय सखा आपल्या मौनाद्वारे मनातल्या मनात दाबून टाकतो.

“चाफा बोलेना,चाफा चालेना” ही कविता आम्हाला अकरावी,बारावीत मराठी अभ्यासक्रमात होती.खरतरं  घटना एकचं, पण निरनिराळ्या व्यक्ती ह्या घटनेकडे वेगवेगळ्या अँगलने बघतात.हे बघितल्यावर अचंबित व्हायला होतं.”चाफा”ही कविता खरतरं पूर्णतः सहजासहजी कोणाला नीटशी कळत नाही. बरेचदा वाटतं हे प्रेमगीतं असावं,तर कधीतरी अचानकच वाटायचं हे त्यापलीकडेही काहीतरी कळण्यासंदर्भात वेगळं किंवा त्यापलीकडचं पण असावं. ही आपल्यातील आपल्यावरच आपलेपणाने रुसलेली एक काव्य प्रतीभाच आहे असही कधीकधी भासून जात़ं.

तसेच “गायी पाण्यावर” ही कविता तर बापलेकीच्या नात्याचा एक सर्वोत्तम दाखलाच जणू. कळायला लागल्यानंतर बाबा ही कविता गुणगुणायचे तेव्हा बापलेकीच्या अलवार नात्यानं भडभडून यायचं.अजूनही ह्यातील ओळी कानी पडल्या तरी मन आपोआपच कातर,हळवं हे होतचं.

या तिन्ही कवितांवर लिहावे तेवढे थोडेच  आहे.कवी बी म्हटले की या तीन कविता प्रामुख्याने डोळ्यासमोर  येतात. लिहावेसे वाटले म्हणून  ‘प्रणय पत्रिके’ विषयी थोडे लिहून थांबते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments