सौ राधिका भांडारकर
☆ “पैंजण…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
पैंजण या शब्दाच्या उच्चारातच एक मधुर छुमछुम जाणवते. या शब्दाबरोबर मनात जणू अमृतधाराच बरसतात.
पैंजण हा एक तीन अक्षरी अनुनासिक शब्द. पण तो ओठावर येता क्षणीच निसर्गातली संपूर्ण रसमय रुणझुण घेऊनच अवतरतो. पैंजण या शब्दात लाडीक भाव आहेत. लडिवाळपणा आहे, वात्सल्य आहे, गुलाबासारखा बाल पावलांचा स्पर्श आहे, एक मधुर ठेका आहे. पैंजण या शब्दात गुलकंदाचा रस आहे. आणि एक लाजरा बुजरा, हळुवार, गुदगुल्या करणारा, गोड शृंगारही आहे. त्या शृंगारात भक्ती आहे आणि कामातुरताही आहे.
मराठी भाषेत शब्दांचे भांडार अथांग आहे. त्यातलाच हा एक तीन अक्षरी शब्द, पैंजण. मधुर रसात घोळूनच तो ओठावर येतो. पैजण या शब्दात जसा नाद आहे तसाच त्यात अंतरातला लपलेला साजणही आहे. त्याला प्रीतीची ही रुणझुणाती चाहूल कळावी म्हणूनच हे पैंजण.
पैंजण हा एक स्त्रियांचा अलंकार. भारतीय स्त्री ही नखशिखांत अलंकारांनी मढलेली असते. तसे गोठ, पाटल्या, चपलाहार,ठुशी,वज्रटीक, बाजूबंद, एकदाणी, या काहीशा अहंकारी, रुबाबदार,प्रदर्शनीय अलंकारात तसे पाहिले तर पैंजण हा पायातला अगदीच चतुर्थ श्रेणीतला अलंकार म्हणावा लागेल. एकतर पायातला म्हणून चांदीचा. हलका, जरासा नाजूकच. चांदीच्या नक्षीदार साखळीत लटकवलेले चांदीचे छोटे किणकिणणारे नूपुर. पण पावलावर हे घुंगुरवाळे चढवले की त्या पावलांचं रूपच पालटतं. नुसतं रूपच नव्हे तर चालही बदलते. या चालीलाही एक खट्याळ, लडिवाळ, गोडवा प्राप्त होतो.अलौकिक सौंदर्य देतात हे पैंजण. आणि मग कुणा प्रेमिकाच्या तोंडून सहज उद्गार येतात,
” आपके पाव देखे, बहुत हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारिएगा, मैले हो जायेंगे”… क्या बात है!
पैंजण हा शब्द इतका गोजिरा आहे की तो लहान बाळाच्या पावलांशी एक निरागस नातं जोडतो. नुकतंच पावलं उचलायला लागलेलं बाळ पायात पैंजण घालून दुडदुड चालू लागतं तेव्हा ती हलकी छुमछुम इतकी कर्णमधुर वाटते की कितीही कामात गुंतलेली माय असो, ती नाजूक छुमछुम ऐकून धावत आपल्या बाळाला उचलून घेते आणि त्याचे वात्सल्याने असंख्य पापे घेते. या मायेच्या दृश्यात त्या पैंजणांची छम छम एका लडिवाळ भूमिकेत असते. त्यावेळी ती माय कौसल्या असते आणि ते बाळ पायी पैंजण घालून राजवाड्यात दुडदुडणार्या रामा सारखंच असतं.
पैंजण हा शब्द कधीकधी पार यमुना तिरी घेऊन जातो. नटखट कान्हा आणि बावरी राधा यांच्या प्रणयात पैंजणांची एक कोमल भूमिका आहे. प्रेमाचं ते पार्श्वसंगीतच म्हणा ना.
। पायी पैंजण पैंजण वाजती।
।ही राधा गौळण हरीला लाजती।।
एका अद्वैत प्रेमाचं आणि भक्तीचं दर्शनच जणू या राधेच्या पायातले पैंजण करून देतात. या शब्दाबरोबर राधा— कृष्णाची प्रणय रंगात दंग झालेली मूर्तीच डोळ्यासमोर येते. त्या रुणझुण नादाबरोबर कृष्णाच्या बासरीचे सूरही कानात घुमायला लागतात.
कधी कधी प्रेमाचे काही उडते भाव या पैंजणात जाणवतात.
“चाळ माझ्या पायात
पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात मोरा वाणी रे
काय तुझ्या मनात
सांग माझ्या कानात
गोड गोड गुपित तुझ्या मनी रे ..”
किती बोलतात हे पैंजण! किती भाव किती रस ते व्यक्त करतात!
वास्तविक पैंजण, नूपुर, चाळ, घुंगुर, हे सारेच एकधर्मीय पद आभूषणे. पदालंकार. त्यांचे संबंध पदन्यासाशी.त्यांचे नाद जरी वेगळे असले, त्यांच्या रुणझुणतेची, छन-छनीची पट्टी जरी वेगळी असली तरी नातं पदन्यासाशीच, पावलांच्या तालाशीच. पण तरीही त्यांची घराणी वेगळी आहेत. घुंगुर म्हटले की ते थेट आपल्याला मैफलित घेऊन जातात.
” राजसा जवळी जरा बसा” किंवा “पाडाला पिकलाय आंबा” नाहीतर,
“ठाडे रहियो ओ बाँके यार” अशा गाण्यांची आठवण करून देतात.त्यांचं सख्य ढोलकीशी किंवा सारंगीशी. पण पैंजण कसे अंगणातले वाटतात. प्राजक्ताच्या फुलासारखे ते हळुवार टपटपतात. हरित पर्णातून एखादी हलकी झुळूक यावी तसा त्यांचा नाद भासतो. पैंजण नादात एक स्निग्धता जाणवते, मार्दव आणि माधुर्याचा अनुभव येतो. पैंजण झुळझुळणाऱ्या नदीची आठवण देतात. किनाऱ्यावर हलकेच चुबकणाऱ्या लाटेसारखे ते असतात. पैंजणात तांडव नसते, क्रोध नसतो, थयथयाट नसतो, वादळ नसते. पैंजणांची रुणझुण केतकीच्या बनात नेते. अलगद हळुवार मोरपिसासारखी ती कानाशी हुळहुळते.
भराभर डोंगर चढून जाणारी, नाभीच्या खाली गुडघ्यापर्यंत घट्ट वस्त्र लपेटलेली एखादी आदिवासी शिसवी कांती असलेली कातकरीण दिसली की माझी नजर तिच्या भेगाळलेल्या पावलांवर जाते आणि तशातही त्या रापलेल्या,तुकतुकीत, काळ्याभोर पावलांवरचे छुम छुमणारे पैंजण कसे एखाद्या प्रेमळ सखी सारखे मला भासतात. पायातलं ते बंधन न वाटता प्रेमाने गोंजारणारं ते साधन वाटतं. शिवाय पैंजणाला धनवान, श्रीमंत, गरीब, गळीत असा भेदभाव नसतो. ते कुणाचीही पावलं खुलवतात.
हे सगळं लिहीत असताना मी माझ्या पावलांकडे सहजच पाहिलं, आता तिथे थंडीपासून रक्षण करणारे लोकरीचे मोजे होते. आणि मग सहज मनात आलं, खरंच पैंजण म्हणजे मूर्तिमंत बालपण. पैंजण म्हणजे हिरवाईचे तारुण्य. एक सुरेल छन छना छन, सप्तसूरातला लटका शृंगारच जणू!
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈