सुश्री प्रभा सोनवणे

? आत्मकथन ?

☆ लेखांक# 6 – मी प्रभा… डेक्कन जिमखान्यावर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

१९६५ साली आम्ही भांडारकर रोडवर चित्रशाळेच्या क्वार्टर्समध्ये रहायला गेलो.  तेव्हा मी बालशिक्षण मंदिर या शाळेत चौथ्या इयत्तेत प्रवेश घेतला. आम्हाला शिकवायला खारकरबाई होत्या, त्या नऊवारी साडी नेसत. आमचा चौथी अ चा वर्ग तिस-या मजल्यावर होता. शाळेसमोर पी.वाय. सी.ग्राउंड. घरापासून शाळा अगदी जवळ होती. मी आणि माझी धाकटी बहीण व एक चुलत भाऊ बालशिक्षण मंदिरमधे, तर मोठा भाऊ विद्या महामंडळमधे.  नंतर या शाळेचं नाव “आपटे प्रशाला” झालं ! 

आमच्या घराजवळ साने डेअरी,– समोर निलगिरी बंगल्याचे बांधकाम चालले होते. सध्या चित्रशाळेच्या त्या जागेवर मोठे काॅम्लेक्स झाले आहे. आम्ही ज्यांच्या जागेत तीन वर्षे राहिलो, त्यांना तिथे फ्लॅट मिळाला. बालशिक्षणमध्ये चौथी पास झाल्यावर मी डे.जि. भावे हायस्कूल- आत्ताचे विमलाबाई गरवारेमध्ये जाऊ लागले. राजा किल्लेदार, दिलीप मैदर्गी आणि मी बरोबरच  शाळेत जायचो, तिथे रहाणारी मालती पांडे ही माझी जवळची मैत्रीण.  पण तिची शाळा सकाळी असायची. 

आमच्या आजूबाजूला सगळे बंगलेच होते.  जवळच मर्ढेकर बंगला होता, मोडक बंगला होता. 

रसिक नावाचा एक सुंदर बंगला होता आणि त्याच्या समोर पवार क्वार्टर्सची बिल्डींग. ती वास्तू आजही तेव्हा होती तशीच आहे.

आपटे रोडवर “कमल” बंगल्यात माझी मावशी रहायची, आणि युनिव्हर्सिटी रोडवर रेंजहिल काॅर्नरला दुस-या एका मावशींचा टोलेजंग बंगला आहे. आम्ही त्यांच्याकडे अधूनमधून जात असू.  जंगली महाराज रोडवर शशीविहार बंगला आमच्या एका नातेवाईकांचा होता, तिथे ही आम्ही जायचो. तसंच सदाशिव पेठेत वैद्यवाड्यात अभिनेते मास्टर छोटू – यशवंत दत्तचे वडील रहायचे.  त्यांच्याकडे आणि जवळच असलेल्या “विद्याभवन” या आमच्या काकींच्या वडलांच्या मालकीच्या वास्तूत, आणि लोकमान्यनगरला आत्याकडे– असे आम्ही या सर्व नातेवाईकांकडे नेहमी जात असू.

ही सर्व ठिकाणं त्या काळात वारंवार पायाखालून गेलेली. तसेच आई आम्हाला संभाजी पार्क आणि कमला नेहरू पार्कमध्ये खेळायला आणि भेळ खायला नेत असे. कमला नेहरू पार्कमध्ये “सांगू कशी मी” या सिनेमाचं शूटिंग पहिल्याचं आठवतंय– पंजाबी ड्रेस घातलेली जयश्री गडकर अजूनही आठवतेय! 

गावाकडे मोठी शेतीवाडी असल्यामुळे, वडील फळांचा ट्रक मंडईत आला की पुण्यात येत.  गावाकडे आमच्या संत्री, मोसंबी व सिताफळाच्या बागा होत्या. इतर पिकेही घेतली जात. ट्रक ट्रान्स्पोर्टचा व्यवसायही होता. 

पुण्यात आले की वडील सिनेमा, सर्कस पहायला घेऊन जात. दोस्ती, बैजूबावरा,साधी माणसं  हे त्या काळात पाहिलेले सिनेमा अजून आठवतात ! वडलांबरोबर गुडलक, किंवा संतोष भुवनमध्ये जायचो जेवायला ! कावरेचं आईसक्रीमही ठरलेलं !

याच काळात शेजारच्या मर्ढेकर बंगल्यात रहात असलेल्या धुमाळ मामांशी ओळख झाली.  ते आमच्या नात्यातलेच पण अगदी सख्खे मामा वाटायचे.  त्यांनी आमचे खूप लाड केले, शाळेला जायला उशीर झाला की ते मला सायकलवरून शाळेत सोडत. तेव्हा ते बी.एम.सी.सी .ला शिकत होते. बारामतीची बरीच मुलं मर्ढेकर बंगल्यात रहात होती. विजय धुमाळ हे आमचे मामा होते, ही खूपच भाग्याची गोष्ट !

पुण्यातले ते दिवस खूपच सुंदर  होते ! आम्ही चित्रशाळेच्या बैठ्या चाळीत तीन वर्षे राहिलोय ! नंतर आमच्या तालुक्याच्या ठिकाणी शिरूर-घोडनदीला गेलो !

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

धन्यवाद हेमंतजी,मंजुषा मॅडमआणि संपादक मंडळ