मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #27 – वासनांचे कोपरे ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक  सामयिक कविता  “वासनांचे कोपरे”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 27 ☆

 

☆ वासनांचे कोपरे ☆

 

केवढे हे कौर्य घडते रोज येथे बाप रे

मी मुलीचा बाप आहे येत नाही झोप रे

 

पावसाळा गाळ सारा घेउनी गेला जरी

स्वच्छ नाही होत यांच्या वासनांचे कोपरे

 

जाळण्या कचऱ्यास बंदी जाळती नारीस हे

वृत्तपत्रे छापतांना अक्षरांना कापरे

 

फलक हे निर्जीव त्यांच्या चेहऱ्यावर वेदना

झुंडशाहीला कुठे या कायद्याचा चाप रे

 

घोषणा अन् मागण्यांचे हे निखारे चालले

राजभवनाच्या पुढे हे घेत नाही झेप रे

 

येउद्या शिवराज्य येथे वा शरीयत कायदा

शीर वा हे हात तोडा थांबवा हे पाप रे

 

या सुया देतात जखमा आणि फिरती मोकळ्या

जन्मभर नाही मिळाला या कळ्यांना लेप रे

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८