श्री शेखर किसनराव पालखे
☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 4 ☆
☆ कविता – लाडक्या (न पाहिलेल्या) लेकीस!! ☆
तुझ्या आठवांचा बहर
जरासा ओसरेस्तोवर
तू पुन्हा उभी ठाकतेस
माझ्या मनाच्या गाभाऱ्यात
आणि खुणावत राहतेस
माझा अप्रिय भुतकाळ
किती बरं वर्ष झाली?..
तुझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा
शोधता शोधता हा म्हातारा
हरवून बसलाय स्वतःला..
आताशा तू स्वप्नं रंगवत असशील तुझ्या
उज्ज्वल भविष्याची -(माझ्याशिवाय)
मी मात्र अडकून पडलोय
माझ्याबरोबरच्या तुझ्या भूतकाळात
तू जवळ असल्याचे काही मोजके क्षण
अन तू दूर गेल्यानंतचे सगळेच क्षण
मी कसा जगत आलोय
याचंच नवल वाटतंय आता
बाकी काही नाही पण
या लादलेल्या एकांतवासात
मी मलाच सापडत नाही ..
अन तुही…….
© शेखर किसनराव पालखे
पुणे
07-04-2020
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
एक भावस्पर्श कविता.??
अच्छी रचना