सौ. सुजाता काळे
☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 44 ☆
मातीतच राहतो मी….
आताच आलो होतो
पाय वळवून गावाकडे मी,
रंगीत शहराची तालीम
लगेचच फिरवू कसा मी.
भरकटलो वर्षानुवर्षे
आताच वळलो होतो,
शेताच्या मातीत आता
बीज बनून रूजलो मी.
धावलो स्वप्नांच्यामागे
क्षणाची उसंत नव्हती
आताच कुठेसा रोजच
हृदयाशी बोलतो मी.
कोंदटलेल्या श्वासात
मज बांधून घेतले होते.
आता कुठेसा गावात
प्राणवायू शोषतो मी.
हिरवळ गर्द हिरवी
चहुकडे पसरलेली
रोखून ठेवी गावात
शहरी कसा येऊ मी.
हा बांध शेतावरचा
ओलांडू न देई मजला
खुणेनंच सांगतो नाते
मातीशी जोडतो मी.
आता नको ते मजला
वाळू, सिमेंट, घमेले
डोक्यावरील ओझे
मातीत सोडतो मी.
मातीत परिश्रम करूनि
पेरतो मी रक्त-घाम
माझाच बनून आता
मातीतच राहतो मी.
पंचगनी, महाराष्ट्र, मोबाईल 9975577684
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
मातीशी नात घट्ट करणारी कविता.