सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में एक समसामयिक विषय पर आधारित अतिसुन्दर रचना पूर्वज। सुश्री प्रभा जी ने इस काव्याभिव्यक्ति में वरिष्ठतम पीढ़ी के माध्यम से अपने पूर्वजों का स्मरण किया है। जो निश्चित ही अभूतपूर्व है। मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 64 ☆
☆ पूर्वज ☆
ते कोण असतात? कुठून आलेले??
आपल्याला माहित नसते त्यांच्याबद्दल फारसे काही…..
किंवा सांगीवांगी ,
ऐकून असतो आपण,
त्यांच्या पराक्रमाच्या गाथा!
मूळगावातला तो भग्न पडका वाडा पाहून—-
दाटून आली मनात अपार कृतज्ञता,
किती पराक्रमी होते आपले पूर्वज!
वारसदारांपैकी एकच आनंदी चेह-याची बाई,
तग धरून त्या वाड्यात—-
आपले म्हातारपण सांभाळत!
तिने सांगितले अभिमानाने—
आपला धडा आहे इतिहासात,
कोणत्या लढाईत मिळाली होती….सात गावं इनाम आणि हा बुलंद वाडाही!
आपण इनामदार, देशमुख,
अमक्या तमक्याचे वंशज—-
असे बरेच सांगत राहिली ती……
मुले शहरात बंगला बांधून सुखसोयीत रहात असताना…..
ती इथे एकटी….
वाड्याच्या वैभवशाली खुणा सांगत—-
किती ऊंट किती हत्ती घोडे, किती जमीन….किती पायदळ!किती लढाया!!
हे सारे खरे असले तरी,
पूर्वज ठेऊन जातात, जमीनजुमला, घरे,वाडे…..
ते कुठे राहते टिकून काळाच्या प्रवाहात??
कुणी म्हणतही असेल तिला,
वाड्याची मालकीणबाई…
पण प्रत्येकाला जिंकायची असते आता….
आयुष्याची लढाई स्वतःच स्वतःसाठी…..
हेच सांगते ती ऐंशी वर्षाची म्हातारी,
चुलीवरचा चहा उकळत असताना !
लढण्याचं बळ देतात पूर्वज…..
हिच काय ती पूर्वपुण्याई !!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈