श्री शेखर किसनराव पालखे
☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 6 ☆
☆ कविता ☆
आपण समजतो तेवढी सोपी नसते कविता
भावनांचा उद्रेक होतो तेव्हा जन्म घेते कविता
तुम्ही नाहीयेत तिचे जन्मदाते बाबांनो
उलट तिच्यामुळे तुमचा होतो जन्म कवी म्हणून मित्रांनो
कविता म्हणजे असतं एखाद्याचं जिवंतपणे जळणं
कविता म्हणजे काळजातला खंजीर स्वतः ओढून मरणं
कविता असते बाणासारखी रुतणारी
छातीत घुसून पाठीतून आरपार निघणारी
कविता म्हणजे पायातला न दिसणारा काटा
कविता म्हणजे भावनांना हजार लाख वाटा
कविता म्हणजे असतो काळजावरचा घाव
कविता म्हणजे असतो एक मोडुन पडलेला डाव
© शेखर किसनराव पालखे
पुणे
17/05/20
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈