मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #5 – उडताही नाही आले ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है ।  साप्ताहिक स्तम्भ  अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक कवि  हृदय की कल्पना और कल्पना की सीमाओं में बंधी कविता “उडताही नाही आले”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 5  ☆

? उडताही नाही आले ?

 

बाहेर मला घरट्याच्या पडताही नाही आले

पंखाना धाक असा की उडताही नाही आले

 

हे बांध घातले त्यांनी हुंदके अडवले होते डोळ्यात झरे असतांना रडताही नाही आले

या काळ्या बुरख्या मागे मी किती दडवले अश्रू पुरुषांची मक्तेदारी नडताही नाही आले

 

धर्माचे छप्पर होते जातींच्या विशाल भिंती

मज सागरात प्रीतीच्या बुडताही नाही आले

 

या गोर्‍या वर्णाचीही मज भिती वाटते आता त्या अंधाराच्या मागे दडताही नाही आले

वरदान मला सृजनाचे नाकार कितीही वेड्या खुडण्याचे धाडस केले खुडताही नाही आले

 

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]