श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 67 ☆
☆ अर्थव्यवस्था (हज़ल) ☆
रोज सकाळी हवा उतारा उठल्या नंतर
इलाज नाही दारुत पुरता फसल्या नंतर
नशा शोधली अशी कशी ही अरे माणसा
तरंगताना दिसतो दारुत बुडल्या नंतर
अपशब्दांची उधळण होते तोंडामधुनी
असेच घडते त्यांच्या सोबत बसल्या नंतर
बैठक आता कशी थांबवू तुम्हीच सांगा
ग्लास दारुचा ओठांना ह्या भिडल्या नंतर
हातामधला ग्लास डोलतो चढते त्याला
मी तर मानव डोलणार ना चढल्या नंतर
दया करावी धर्म सांगती सारे येथे
पामरास या उचलुन घ्यावे पडल्या नंतर
देशाची ह्या अर्थव्यवस्था माझ्यावरती
देश चालणे कठीणच दारु सुटल्या नंतर
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈