श्री शेखर किसनराव पालखे
☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 10 ☆
☆ खरंतर जाऊच नये ☆
कोणत्याही कवितेच्या वाटेला
पडू नये तिच्या उगमाच्या फंदात
उसवून टाकेल ती तुम्हाला
तिच्या जन्मदात्यासकट
ते जे काही आहे ते रहावं गुपितच
जे असू शकतं अक्षरशः काहीही
अगदी एखादं जन्मानंदाचं
परम निधान किंवा
मरणजाणिवेचा अथांग खोल
असा डोह देखील…
होऊ नये पंचनामा त्याच्या भावनांचा-
भोगू द्यावं तिचं प्रवाहीपण
त्याचं त्याला एकट्यानं…
आपण व्हावं मूक साक्षीदार
किनाऱ्यावरूनच…
हो-उगाच बुडून जायची भीती नको-
अन जळत्या जिवाचा
चटका देखील नको…
सामाजिक विलगीकरण-
चांगली कल्पना आहे ही…
फक्त येऊ नये कोडगेपण सवयीनं-
दुरूनच का होईना ठेवावी
त्याच्या जाणिवांची जाणीव
एवढसंच केलं तरी
जगतील दोघेही आनंदानं
शेवटापर्यन्त–
त्यांच्या आणि आपल्याही.
© शेखर किसनराव पालखे
पुणे
09/06/20
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈