श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 71☆
☆ नालस्तीची भिती … ☆
तुझे आरशा स्वप्न भंगते
कुठे कुणाला जरा भावते
सूर्य चंद्र अन् नकोत तारे
मज जगण्याची भिती वाटते
कडकडून ते मला भेटले
नजरबंदिने पंख छाटले
जागेवरती फडफड माझी
उडण्याचीही भिती वाटते
डोळे खिडक्या त्यावर पडदे
गुडघ्यांचे या पडले मुडदे
थरथर करते काठीसुद्धा
उठता बसता भिती वाटते
शुभ्र कापूस डोक्यावरती
त्याची सांगू काय मी कीर्ति
प्रेमाने मी तेल चोळतो
सोबत सुटता भिती वाटते ?
दार मृत्युचे तिथे उभा मी
कसा कुणाच्या येऊ कामी
आत घेइना कोणी मजला
नालस्तीची भिती वाटते
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈