श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 74 ☆ अंधाराचे चित्र ☆
अंधाराचे चित्र काढणे अवघड नाही
रंग एकला दुजा कुणाची लुडबुड नाही
मिसळुन गेले काळ्या रंगा तुझ्यात पाणी
ओठी त्याच्या फक्त तुझी रे दंगल गाणी
झुळझुळ टपटप अशी करत ते बडबड नाही
अंधाराचे चित्र काढणे अवघड नाही
केस रेशमी छान ब्रशाचे आहे काळे
काळ्या रंगा तुझेच त्यावर आहे जाळे
शांत पहुडला कोरा कागद फडफड नाही
अंधाराचे चित्र काढणे अवघड नाही
सूर्यावरती मात करोनी जमले ढग हे
शेतावरती तुटून पडले काळे ठग हे
कुणास येथे ऐकू आली गडगड नाही
अंधाराचे चित्र काढणे अवघड नाही
प्रवास आहे अखेरचा हा अंधारातुन
मार्ग शोधने अवघड नसते बिलकुल त्यातुन
ओझे नाही खांद्यावरती कावड नाही
अंधाराचे चित्र काढणे अवघड नाही
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈