श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
☆ रंजना जी यांचे साहित्य # 56 – जीवनाच्या रंगमंची ☆
जीवनाच्या रंगमंची
सुख दुःखाची आरास।
समन्वय साधुनिया
नाट्य येईल भरास।
बालपण प्रवेशात
स्वर्ग सुखाचे आगर।
बाप विधाता भासतो
माय मायेचा सागर।
स्वार्थ रंगी रंगलेली
सारी स्वप्नवत नाती।
तारुण्यास मोहवीते
स्वप्न परी ती सांगाती।
आलो भानावर जरा
खाच खळगे पाहून ।
माय पित्याच्या भोवती
लाखो संकटे दारूण।
इथे पिकल्या पानांना
सोडू पाहे जरी खोड।
रंगविती पिलांसाठी
वसंताचे स्वप्न गोड।
जीवनाच्या रंगमंची
खेळ रंगे जगण्याचा।
दुःख उरी दाबुनिया
अभिनय हासण्याचा।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
Mast kavita.