सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 77 ☆
☆ आलेख – सहजीवन ☆
आमचं लग्न झालं तेव्हा मी वीस वर्षांची आणि हे बावीस वर्षाचे होते. वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय-म्हशींचे गोठे आणि गावाला शेती होती.ह्यांचा जन्म पुण्यातला,पदवीधर असूनही विचारसरणी सनातन- “न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति” अशी मनुवादी! खुप जुन्या वळणाचं सासर, एकत्र कुटुंब, सणवार, कुळधर्म, कुळाचार, रांधा,वाढा उष्टी काढा हेच आयुष्य असायला हवं होतं, पण मी त्यात रमले नाही.
बाहेर जायला विरोध होता, कविता करणं, ते सादर करायला बाहेर जाणं एकूणच उंबरठा ओलांडून बाहेर काही करणं निषिध्द !
प्रतिकुल परिस्थितीत बाहेर पडले,कुणीही प्रोत्साहन दिलं नाही तरी लग्नानंतर चौदा वर्षांनी एम.ए.ला अॅडमिशन घेतलं ….पुढे पीएचडी चं रजिस्ट्रेशन केलं…पूर्ण करू शकले नाही. स्वतःच्या अपयशाचं खापर मी इतर कोणावर फोडत नाही. नवरा डाॅमिनेटिंग नेचरचा आहे पण माझी जिद्द ही कमी पडली.
पण आज या वयात माझा नवरा आजारपणात माझी जी काळजी घेतो त्याला तोड नाही…..
चाकोरीबाहेरचे अनुभव घेतले, चारभिंती बाहेर पडले खुप प्रतिकुल परिस्थितीत थोडं मुक्त होता आलं याचं आज समाधान आहे.
आणि पतंगासारखं काही काळ आकाशात उंच उडता आलं हा आनंद, पतंगांचा मांजा कुणी पुरूष बाप, भाऊ, नवरा नसताना नियतीने ती दोर कवितेच्या रूपाने पाठवली. जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया ।
ते पदवीधर मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं पण तो प्रश्न कधी आला नाही आमच्यात! प्रोत्साहन दिले नाही तरी शिक्षणाला विरोधही झाला नाही फारसा!
एका विशिष्ट वयानंतर “अभिमान” ची संकल्पना नाहीशी होते, कधीच पतंगाची दोर न बनलेल्या जोडीदाराविषयीही कृतज्ञताच वाटू लागते!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
धन्यवाद सर, आपकी बहुत आभारी हूँ ?
आभार ताई उत्कृष्ट रचनाओं के लिए