मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 84 – इलाहींच्या आठवणी…. ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

(जन्म – 1 मार्च 1946 मृत्यु – 31 जनवरी 2021)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 84 ☆

☆ इलाहींच्या आठवणी…. ☆

एकतीस जानेवारीला सुप्रसिद्ध गजलकार इलाही जमादार आपल्यातून निघून गेले. आणि मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या…… तेवीस जानेवारीला मी त्यांना फोन केला होता तेव्हा त्यांच्या वहिनी ने फोन घेतला, मी म्हटलं, मी प्रभा सोनवणे, मला इलाहींशी बोलायचं आहे….त्यांनी इलाहींकडे फोन दिला, तेव्हा ते अडखळत म्हणाले, “आता निघायची वेळ झाली ……पुढे बोललेली दोन वाक्ये मला समजली नाहीत….मग त्यांच्या वहिनी ने फोन घेतला, त्या म्हणाल्या “आता त्यांना उठवून खुर्चीत बसवलं आहे, तब्बेत बरी आहे आता.”…..त्या नंतर सात दिवसांनी ते गेले!

मला इलाहींची पहिली भेट आठवते, १९९३ साली बालगंधर्व च्या कॅम्पस मधून चालले असताना अनिल तरळे या अभिनेत्याने माझी इलाहींशी ओळख करून दिली, मी इलाहीं च्या गजल वाचल्या होत्या, इलाही जमादार हे गजल क्षेत्रातील मोठं नाव होतं, मी त्यांच्यावरचा एक लेख ही त्या काळात वाचला होता, दारावरून माझ्या त्यांची वरात गेली मेंदीत रंगलेली बर्ची उरात गेली.. आता कशास त्याची पारायणे “इलाही’ माझीच भाग्यरेषा परक्या घरात गेली हा त्या लेखात उद्धृत केलेला शेर मला खुप आवडला होता, मी तसं त्यांना त्या भेटीत सांगितलं….कॅफेटेरियात आम्ही चहा घेतला, आणि इलाहींनी त्यांच्या अनेक गज़ला ऐकवल्या, मी खुपच भारावून गेले होते. त्यांनी मलाही कविता ऐकवायला सांगितलं तेव्हा मी पाठ असलेल्या दोन छोट्या कविता ऐकवल्या, त्यांनी छान दाद दिली.

एक छान ओळख करून दिल्याबद्दल अनिल तरळे चे आभार मानले, आणि म्हणाले, निघते आता, घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे तर ते म्हणाले “तुम्ही स्वयंपाक करत असाल असं वाटत नाही”, त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं मला समजलं नाही…..

इलाहींच्या अप्रतिम गज़ला ऐकून मला कविता करणं सोडून द्यावंसं वाटलं होतं त्या काळात!

त्यानंतर काही दिवसांनी मी अभिमानश्री हा श्रावण विशेषांक काढला, त्याच्या प्रकाशन समारंभात आयोजित केलेल्या कविसंमेलनात त्यांना आमंत्रित केलं होतं त्या संमेलनात त्यांनी त्यांची गजल सादर केली होती. एवढा मोठा गजलकार पण अत्यंत साधा माणूस!

मी त्या काळात काव्यशिल्प या संस्थेची सभासद होते.

इलाहींच्या प्रभावाने आम्ही काव्यशिल्प च्या काही कवींनी एक गजलप्रेमी संस्था सुरू केली. काही मुशायरे घेतले, इलाही अनेकदा माझ्या घरी आले आहेत.ते स्वतःच्या गज़ला ऐकवत आणि माझ्या कविता ऐकवायला सांगत, दाद देत.

गजल च्या बाबतीत ते मला म्हणाले होते, तुम्ही “आपकी नजरोने समझा…..” ही गज़ल गुणगुणत रहा त्या लयीत तुम्हाला गज़ल सुचेल! पण तसं झालं नाही!

क्षितीज च्या मैफिलीत सादर करण्यासाठी मी पहिली गज़ल लिहिली ती अगदी ढोबळमानाने, मी इलाहींकडून गज़ल शिकले नाही. पण त्यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या संस्थेमुळे गजलच्या वातावरणात राहिले, इलाहींच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या गजलसागर च्या अ.भा.म.गजलसंमेलनात माझ्या गजलला व्यासपीठ मिळालं त्यानंतर च्या अनेक गज़लसंमेलनात माझा सहभाग होता. “गजलसागर” चे गज़लनवाज भीमराव पांचाळे यांचा परिचय पुण्यात अल्पबचत भवन मध्ये त्यांच्या एका गजलमैफिलीच्या वेळी झाला होता, त्या मैफीलीचे सूत्रसंचालन अभिनेते प्रमोद पवार करत होते.

या अफाट गज़लक्षेत्रात माझी खसखशी एवढी नोंद घेतली गेली याला कुठेतरी कारणीभूत इलाही आहेत. निगर्वी, हसतमुख, मिश्किल नवोदितांना नेहमी प्रोत्साहन देणारे आणि नेहमी सहज छानशी टिप्पणी देणारे इलाहीजमादार आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या खुप स्वच्छ आणि सुंदर आठवणी आहेत.

लिहिल्या कविता, लिहिल्या गज़ला, गीते लिहिली
सरस्वती चा दास म्हणालो चुकले का हो?

?? असं म्हणणा-या या प्रतिभावंत गजलकाराला भावपूर्ण श्रद्धांजली, अभिवादन! ??

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈