श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 91 ☆
☆ दानत नाही ☆
ब्रह्मानंदी अजून टाळी वाजत नाही
श्रद्धेखेरिज मूर्ती त्याची पावत नाही
संपत नाही काही केल्या माझे मीपण
मला कळेना सहज ध्यान का लागत नाही
कृपादृष्टिची पखरण केली भगवंताने
तरिही कष्टी मोर मनाचा नाचत नाही
ओंकाराचा ध्वनी ऐकण्या आतुर असता
गोंगाटाचे ढोल नगारे थांबत नाही
हुंडीमधले दान मोजणे कुठे उरकते
याचकासही द्यावे काही दानत नाही
पाप धुण्याची प्रत्येकाला ओढ लागली
किती प्रदूषित गंगा झाली सांगत नाही
द्विभार्या ह्या जरी दडवल्या टोपीखाली
वेळप्रसंगी सांगायाला लाजत नाही
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈