मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 93 ☆ आठवण – ७ एप्रिल २०२१ ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 93☆

☆ आठवण – ७ एप्रिल २०२१ ☆ 

आज अभिनेता जितेंद्र चा जन्मदिवस! मी शाळेत असताना जितेंद्र चे खुप सिनेमे पाहिले. शिरूर मध्ये असताना जितेंद्र चं वेड लागलं ! मला आठवतंय, बूँद जो बन गयी मोती, गीत गाया पत्थरों ने, गुनाहों का देवता, अनमोल मोती, औलाद, फर्ज, विश्वास, जिगरी दोस्त…..हे सगळे शिरूर ला तंबूत पाहिलेले सिनेमा.

एकदा मी आणि माझी मैत्रीण ज्योती धनक सतरा कमानी पुलापर्यंत फिरायला गेलो होतो. मी फूल है बहारों का, बाग है नजारों का और चाँद होता है सितारों का…. मेरा तू.. . तू ही तू….  हे गाणं गुणगुणत होते. ज्योती नी विचारलं “जितेंद्र आवडतो का तुला?” मी म्हटलं, हो…” जितेंद्र आणि शशी कपूर…. “त्यावर ज्योती म्हणाली, “शशी कपूर चं लग्न झालंय, जितेंद्र करेल तुझ्याशी लग्न.”

जितेंद्र माझ्याशी लग्न करेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं, कारण गुड्डी मधल्या जया भादुरी इतकी अतिभावनिक मी कधीच नव्हते. पण ज्योती धनक नी चेष्टेने का होईना , म्हटलेलं ते वाक्य तेव्हा लई भारी वाटलं होतं, त्या नंतर मी जितेंद्र चा प्रत्येक सिनेमा पाहिला.

पन्नास वर्षां पूर्वीची ही आठवण !… जुन्या आठवणी येताहेत कारण आत्मचरित्र लिहायला घेतलं आहे… ज्योती धनक ला आठवतंय का हे पडताळून पहायला आवडेल मला, तसा योग येवो!

*********

आणि तो योग आला व्हाटस् अॅप मुळे जुन्या मित्र मैत्रिणींचे मोबाईल नंबर मिळवणं सोपं झालंय!

एका मित्राने ज्योती धनक चा नंबर दिला. मी तिला फोन केला, आणि विचारलं “तुला आठवतोय का हा जितेंद्रचा किस्सा?”

ती म्हणाली, “म्हणजे काय, मला सगळं आठवलं ”

ज्योती खुप छान बोलली, खुप आपुलकीने, आयुष्यात घडून गेलेल्या घटना परत येत नाहीत पण त्याच्या साक्षीदार असलेल्या मित्र मैत्रिणींमुळे ते क्षण आठवणीत का होईना परत जिवंत करता येतात.

आणि हेच आयुष्यातलं काव्य आहे.

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈