श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 100 ☆
☆ पक्व जांभळे ☆
दाटुन आले मनात माझ्या
इवले इवले शब्द कोवळे
गंध कागदावरी उतरला
आज साजरे करू सोहळे
या वृक्षाचे रूप देखणे
सांडत होता विपुल चांदणे
देठ कोवळे मला भासती
मऊ मुलायम जसे सापळे
या पानांच्या ओंजळीतुनी
अलगद आले निसटुन खाली
अन् मातीतच विलीन होती
ठेवुन मस्तक तिथे मोकळे
बांधावती वेल पसरली
अडवे तिडवे पाय पसरुनी
त्या वेलीच्या कुशीत शिरले
वजनदार हे कसे भोपळे
तारुण्याने झाड लगडले
मस्तीतच ते डुलू लागले
नव्या पिढीचे कौतुक भारी
रस्त्यावरती पक्व जांभळे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈