श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 101 ☆
☆ उदासवाणे ☆
मुठीत होते उदासवाणे जीवन धरले
मूठ उघडता पक्षी सारे हवेत उडले
नाचावेसे मला वाटले आनंदाने
आनंदाश्रू फक्त नाचले मला न जमले
रावण होता पराक्रमी तरि तुटून पडलो
अन् सीतेला वाचवताना पंखच तुटले
फिनिक्स पक्षी होणे नाही नशिबी माझ्या
राखेमधुनी उठणे होते त्याला जमले
सुख दुःखाच्या झाडावरती घरटे होते
फांदी हलता मनात माझ्या वादळ उठले
म्हणून घेतो मीच स्वतःला इथे कविश्वर
कबीर लिहितो तसे कुठे मज दोहे सुचले
मला स्वतःचा निषेध करता आला नाही
कुठे बरोबर कोठे चुकलो नाही कळले
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈