श्री सुजित कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #83 ☆
☆ पाऊस म्हटलं की….! ☆
पाऊस म्हटलं की
आपण कधीतरी ऐकलेली
एखादी प्रेम कविता
सहज मनात येते..
कारण…,
आपण शहरात राहणारी माणसं…
आपल्याला त्याच्या आणि तिच्या
पलिकडे पाऊस आहे
असं कधी वाटतंच नाही..
पाऊस म्हटलं की…
आपण हरवून जातो
त्याच्या,तिच्या आठवणींमध्ये
पण हा पाऊस…
जितका त्याचा आणि तिचा आहे ना..,
तितकाच,शेतक-याचा ही आहे..
कदाचित जरा जास्तच…!
पण ह्या पावसातही एक
फरक असतो बरं का…
पाऊस जरा जास्त झाला ना
तर त्याला, तिला
काही फारसा फरक पडत नाही..
पण माझा शेतकरी मात्र
घाबरून जातो,रडकुंडीला येतो
पण तरीही…
डोळ्यांच्या आड पडणारा पाऊस
त्याच्या पापण्यांचा बांध सोडून
त्याच्या गालावर कधी ओघळत नाही
कारण…,
पाऊस म्हटलं की त्यालाही
आठवत असते त्यानं…
कधीतरी ऐकलेली एखादी
शेतीमाती वरची कविता…!
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈