image_print

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #89 ?

☆ एस टी….! ☆

परवा माणसांनी गच्च

भरलेली एसटी पाहिलीआणि ..

सहज वाटून गेलं…

किती सहन करत असेल ना

ही एसटी…

ऐकून घेत असेल

एसटी मध्ये असणाऱ्या

प्रत्येकाचं सुख: दुःख

तर कधी…

उघड्या डोळ्यांनी

पहात असेल..

कुणाच्यातरी डोळ्यातून

ओघळणारे चार दोन थेंब..

तर कधी

गुदमरून जात असेल

 ह्या असंख्य माणसांच्या गर्दीत..

तिलाही वाटत असेल खंत..

हे सगळं ऐकत असून,

पहात असून आपण

काहीच करू शकत नाही ह्याची…

पण मला तिला सांगायचंय..

की तुला ठाऊक नाही

तुझा हात सोडून खाली

उतरल्यावर ही असंख्य माणसं

तुझे आभार मानत असतील..

कारण…गावी गेल्यावर ..

आईला पाहून जितका आनंद होतो ना..

तितकाच आनंद ह्या माणसांना

गावी जाताना तुला पाहिल्यावर होतो..

त्यांना ठाऊक असतं…

एसटी मध्ये बसल्यावर

आपलं ऐकणारी..

आपल्याकडे पाहणारी..

आपलं कुणीही नसताना

आपल्याला सुखरूप घरी पोहचवणारी..

आणि..

चार दोन क्षण डोळे मिटल्यावर

मायेच्या प्रेमानं कुशीत घेणारी..

जर कोणी असेल

 तर ती तू आहेस…

आणि म्हणूनच

ही माणसं तुला एसटी

म्हणत नाहीत तर

लाल परी म्हणतात…

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments