सुश्री प्रभा सोनवणे
☆ गज़ल ☆
मी कशासाठी लिहावे नेमका अंदाज नाही
वाहवा नवखीच आहे तो तुझा आवाज नाही
बंड माझे कोंडले होते जरी मी अंतरी या
व्यक्त होण्या आज येथे कोणतीही लाज नाही
मी मला वाटेवरी या भेटले आहे नव्याने
पेटवा आता कितीही रान मी नाराज नाही
येत आहे जाग आता झोपले होते कधीची
सूर्य येथे कोणताही जाहला हमराज नाही
मैत्र त्यांचे दो घडीचे पाठ फिरली की कुटाळी
बुडबुडे ते हो जरासे, सागराची गाज नाही
मज न पर्वा लाभला नाही किनारा ओळखीचा
भीत होते काल मी, ते भय तुफानी आज नाही
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈