श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक सामयिक एवं सार्थक कविता “पोत माझा”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 12 ☆
फक्त दिसतो मी मवाल्यासारखा
पोत माझा हा फुलांच्यासारखा
गंध व्हावे अन् फिरावे वाटता
धुंद वारा हा दिवाण्यासारखा
सहज येथे गायिला मल्हार मी
नाचला मग मेघ वेड्यासारखा
सागराची गाज माझ्यावर अशी
आणि दिसला तू किनाऱ्यासारखा
पेटलेला कोळसाही वागतो
ऊब देते त्या मिठीच्यासारखा
मोरपंखी पैठणी तू नेसता
पदर वाटे हा पिसाऱ्यासारखा
जीवनाचा सपक वाटे सार हा
जीवनी तू या मसाल्यासारखा
गोड कोठे बोलणे शिकलास हे
गायकीच्या तू घराण्यासारखा
तख्त ना हे ताज येथे राहिले
ना अशोका तू नवाबासारखा
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८