सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत (भाग – ५) – सप्तक कथा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
सप्तक हे नावच त्याची ‘सात’ ह्या संख्येशी बांधिलकी सांगते! संगीतातही ‘सात’ स्वर आहेत, त्या सात स्वरांचा समूह म्हणजे ‘सप्तक’! आपल्याला माहीत असलेले ‘सा, रे, ग, म, प, ध, नि’ हे सुरांच्या नावाचे ‘शॉर्ट फॉर्म्स’ म्हणायला हरकत नाही आणि गाताना अर्थाचच तेच सोयीचे पडतात. ह्या सात स्वरांची पूर्ण नावं आहेत, सा – षड्ज, रे – रिषभ, ग – गंधार, म – मध्यम, प – पंचम, ध – धैवत, नि – निषाद!
गंमत अशी कि हे सात स्वर कसे अस्तित्वात आले ह्याविषयी अनेक सुरम्य कहाण्या वेगवेगळ्या जुन्या ग्रंथांमधे सापडतात. ‘संगीत दर्पण’ ह्या प्राचीन ग्रंथाचे लेखक दामोदर पंडित ह्यांच्यामते काही प्राणी व पक्ष्यांचा आवाजातून ह्या स्वरांची निर्मिती झाली आहे. मोराची केका ‘षड्ज’ जननी, चातकाचा आवाज ‘रिषभ’ जनक, बकऱ्याच्या आवाजात ‘गंधार’ सापडला, ज्ञानोबारायांना शकुन सांगणाऱ्या काऊ(कावळा) ची कावकाव ही ‘मध्यम’निर्माती ठरली, कोकिळ पक्ष्याचं मधुर कुहूकुहू ‘पंचमाचं’ उत्पत्तीस्थान ठरलं, बेडकाच्या ‘डरावडराव’मधून ‘धैवत’ जन्मला आणि हत्तीच्या चित्कारातून ‘निषाद’ उत्पन्न झाला.
ह्याचा सोपा अर्थ लावायचा झाला तर असं म्हणता येईल कि, पूर्वी सगळ्याच अर्थाने ‘प्रदूषण’ विरहित अशा निसर्गाच्या सान्निध्यातच जगणाऱ्या माणसाच्या जाणिवा अत्यंत तरल असाव्या. त्यामुळं निसर्गातून ऐकू येणाऱ्या वेगवेगळ्या आवाजांतल्या ‘फ़्रिक्वेन्सी’ मधला सूक्ष्म फरकही त्याच्या कानांना सहजी जाणवत असावा. हळूहळू कोणत्या सुरापेक्षा कोणता सूर चढा आहे हे जाणवलं तसे हे सात सूर अस्तित्वात आले असतील. अर्थातच नंतर शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्या सर्वच गोष्टींवर काळानुसार अनेक प्रयोग, बदल होत राहिले.
एका फारसी संगीतज्ञाच्या नोंदणीनुसार, प्राचीन मुस्लीम संत हजरत मूसा हे पहाडी भागांतून फिरत असताना आकाशवाणी झाली कि, ‘हे मूसा हकीकी, तू तुझ्या हातातल्या दंडाने तुझ्या समोरच्या दगडावर प्रहार कर!’ त्याबरहुकूम हजरत मूसांनी हातातल्या दंडाचा(छोटी काठी) समोरच्या दगडावर जोरात प्रहार केला तेव्हां त्या दगडाचे सात तुकडे झाले आणि त्या प्रत्येक तुकड्यातून पाण्याची धार/झरा/निर्झर वाहू लागली. मात्र पाण्याच्या त्या प्रत्येक धारेचा ‘आवाज’ वेगवेगळा होता, म्हणजे त्यातून ऐकू येणारा ‘सूर’ वेगळा होता. हजरत मूसांच्या तरल जाणिवांना तो ‘आवाजां’ मधला फरक उमजला आणि कानाला जाणवणाऱ्या त्या प्रत्येक ‘फ्रिक्वेन्सीनुसार’ त्यांनी एकेक सूर निर्माण केला आणि ते सूर चढत्या पट्टीत योजत ‘सप्तक’ निर्मिले असेल.
आणखी एका फारसीच संगीतज्ञांच्या मतानुसार पहाडी भागांत ‘मूसीकार’ नावाचा जो पक्षी सापडतो, त्याची चोच खूप लांब असते. बासरीला जशी सात भोकं असतात तशी त्याच्या चोचीलाही सात भोकं असतात. हा पक्षी आवाज करतो तेव्हां त्या सात भोकांमधून वेगवेगळा ‘आवाज’ येतो. त्या वेगवेगळ्या सात आवाजांतूनच सात सुरांची निर्मिती झाली आहे.
ह्या सगळ्या प्रचलित कथांचा विचार केला असता वाटते कि, तेव्हां भले तंत्रज्ञान अस्तित्वात नसेल, पण तरीही कानांवर पडणाऱ्या आवाजाशी सूर जुळवून पाहाणे वगैरे बाबींमधे नकळत का होईना, प्रयोगात्मक, संशोधनात्मक दृष्टिकोन सामावलेला आहे. मात्र मुळात माणसाचं संगीताशी नातं कसं जोडलं गेलं असावं? तर फ्राईड ह्या एका पाश्चात्य विचारवंताच्या मते, संगीत ही माणसाकडून झालेली सहजनिर्मिती आहे! ते म्हणतात कि, माणूस आधी बोलायला शिकला, मग चालणं-फिरणं शिकला आणि हळूहळू तो जास्त क्रियाशील झाला तशी त्याच्याकडून आपोआप संगीताची निर्मिती झाली.
फ्राईड ह्यांच्या विधानावर विचार करत असताना मनात आलं कि, ‘खरंच आहे, आपण स्वत:कडे आणि आपल्या आजूबाजूलाही जाणीवपूर्वक पाहिलं तरी लक्षात येतं कि एखादवेळी आपसूक ‘गुणगुणावंसं’ वाटणं हीच संगीतनिर्मितीची पहिली पायरी असावी. असं ‘गुणगुणणं’ ही सहजप्रक्रियाच आहे, त्यासाठी संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं असणं हे आवश्यक नाहीच. माणसाच्या मनात कोणताही एखादा भाव प्रचंड प्रमाणात निर्माण झाला कि त्याच्या व्यक्ततेपायी ‘गुणगुणण्यातून’ त्याच्याकडून सूरनिर्मिती, संगीतनिर्मिती होत राहिली असेल आणि हळूहळू त्याला एक छान आकार प्राप्त होत ‘संगीतशास्त्र’ निर्माण होण्याएवढी मानवाने प्रगती केली.
खरंतर संपूर्ण सात सूर एकाचवेळी अस्तित्वात आले असं नाही. आपल्याकडचे मंत्र म्हणून पाहिले कि लक्षात येते कि, ते दोन किंवा तीन स्वरांतच बांधलेले आहेत. काही स्त्रोत्रांमधे मग चार सूर दिसून येतात. ह्याचा अर्थ हळूहळू सूरसंख्या वाढत गेली. सप्तकाची एक जन्मकथा अशी वाचल्याची स्मरते कि, वैदिक काळात जे सामगायन होत असे ते सुरुवातीला तीन अणि नंतर चार सुरांत होऊ लागले. सार्वजनिक ठिकाणी सामुदायिक पद्धतीने हे गायन होत असताना गाणाऱ्यांचे पुरुषगायक व स्त्रीगायक असे दोन गट असायचे. पुरुषगायकांनी गायलेली वेदऋचांची चाल(स्वररचना) पाठोपाठ स्त्रीगायक गात असत. मात्र नैसर्गिकरीत्या सर्वसाधारणपणे स्त्रियांचा आवाज उंच पट्टीचा असतो, त्यामुळे त्यांना पुरुषांच्या पट्टीत गाणे कठीण जायचे. मग तीच स्वरसंगती स्त्रिया त्यांच्या पट्टीत गात असत तेव्हां ते सूर अस्तित्वात असणाऱ्या सुरांपेक्षा भिन्न स्थानांवर असल्याचे लक्षात येत गेले आणि अणखी सूर अस्तित्वात आले. दुसऱ्या भागात आपण गणितीय पद्धतीने स्वरांमधील अंतरे पाहिली आहेत. तर, ‘सा ते म’ आणि ‘प ते वरचा सा’ ह्या स्वरांमधील अंतरे पाहिली तर ती अगदी समान असल्याचे दिसून येते. ती कदाचित ह्या सामगायनाची देणगी असावी, अशी सप्तकाच्या जन्माची ‘वन ऑफ द थिअरी’ म्हणता येईल.
© आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
आसावरी केळकर यांच्या सुरांची निर्मित-प्रक्रिया नेमकी कशी झाली असेल हे सांगू पहाणाऱ्या अनेक दंतकथा आणि दृष्टीकोन यांच्या विवेचनातून त्या सर्वांमधलं ‘नैसर्गिक प्रेरणा’हे समान सूत्र अलगद गवसतं.अतिशय परिपूर्ण विश्लेषण..!
आसावरी,
खूप अभ्यासपूर्ण माहिती तुमच्याकडून वाचकांना मिळत आहे ..धन्यवाद