सुश्री अरुणा मुल्हेरकर
☆ सूर संगत ☆ सूर संगीत 6 – राग~तिलक कामोद ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆
मागील भागांत देस रागाचे विवेचन केल्यानंतर, त्याच रागाचे सख्खे भावंड म्हणता येईल अशा तिलककामोद रागाविषयी विवरण करणे क्रमप्राप्तच आहे. एकाच खमाज नामक जनकाची ही दोन अपत्ये! दोन भावंडांच्या जीन्स एकच असल्या तरी हा सुरेश आणि हा रमेश हे दोघे स्वतंत्र अस्तित्व असलेले भाऊ आपण सहज ओळखू शकतो नाही का? त्यांच्या स्वरूपांत साम्य असूनही वेगळेपण असते. स्वभावही वेगळे असतात. देस व तिलककामोद यांच्यांतही असेच वेगळेपण आहे.
दोघांचे स्वर एकच! सा रे ग म प ध नी, अरोहांत नी कोमल! तिलककामोद मात्र जरा अवखळ,खेळकर स्वभावाचा! त्याची चाल सरळ नसून जरा वक्र वळणावळणाची आहे असे म्हणावे लागेल.
सा रे ग सा, रे म प ध म प सां—आरोह
सां—प ध म ग, सा रे ग सा नी(कोमल,मंद्र)~ अवरोह. या आरोह~अवरोहावरून हे लक्षांत येते. टप्प्याटप्प्यावर रांगणारे जणू हे बालकच आहे. तिलककामोदची ही वक्र चाल फारच कर्णमधूर वाटते. त्यामुळे हा राग अतिशय लोकप्रिय आहे. कुशल कलावंत अवरोही रचनेत गंधारावरून षडजावर येतांना रिषभाला हलकेच स्पर्ष करून तो कणस्वरूपाने दाखवितात व गायन/वादनांत रंजकता आणतात. अंतर्याचा उठाव ‘ प ध म प सां ‘ या स्वरांनी घेऊन तिलककामोद आपले स्वतंत्र अस्तित्व श्रोत्यांच्या निदर्शनास आणतो.” प(मंद्र)नी(मंद्र) सा रे ग सा, रे म ग, सा रे ग सा नी(कोमल,मंद्र)” हे राग निदर्शक स्वर आहेत. मंद्र सप्तकाचा उत्तरार्ध व मध्य सप्तकाचा पुर्वार्ध हे या रागाचे विस्तारक्षेत्र आहे. या रागाचे वादी व संवादी स्वर अनुक्रमे रिषभ व पंचम आहेत. जरी अवरोहांत देसप्रमाणेच याही रागांत निषाद कोमल असला तरी उत्तरभारतीय कलावंत कोमल निषाद न वापरतां शुद्ध निषाद घेऊनच हा राग पेश करतात.शास्रानुसार हा राग रात्रीच्या दुसर्या प्रहरी प्रस्तूत करावयाचा असतो.
तिलककामोद म्हटला की सर्वांच्या पटकन् लक्षांत येणारे गीत म्हणजे उंबरठा या चित्रपटांतील ” गगन सदन तेजोमय ” ही प्रार्थना!
लता दिदींचे सूर, र्हुदयनाथ मंगेशकरांची स्वररचना आणि कविवर्य वसंत बापट यांचे शब्द! ह्या तिघांचे रसायन असे काही जमून आलेले आहे की हे गाणे ऐकतांना मन मोहरून येते. स्व.श्री सुधीर फडके यांचेही तिलककामोद रागावर फार प्रेम! रूपास भाळलो मी,विठ्ठला तू वेडा कुंभार,दिसलीस तू फुलले ऋतू, आकाशी झेप घेरे पांखरा, ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर ही बाबूजींनी स्वरबद्ध केलेली आणि गायिलेली गाणी
तिलककामोद रागावरच आधारित आहेत.
ठुमरी, दादरा, कजरी हे उपशास्रीय गायनाचे प्रकार या रागांत आहेतच! अबके सावन घर आजा ही पारंपारिक ठुमरी अनेकांनी गायली नि आजही गायली जाते. सावनकी रितु आयी री सजनिया प्रीतम घर नही आये ही शोभा गुर्टू यांनी गायिलेली ठुमरी ऐकतांना ब्रम्हानंदी टाळी लागते.
उपशास्रीय व सुगम गायनांत या रागाचा दिलखुलास विहार असला तरी हे विसरून चालणार नाही की ख्याल गायनांतही हा राग प्रचलित आहे.चौताल,धमार या विलंबित तालांत
अनेक बंदिशी आढळतात. ” हर हर हर करत फिरत ना डरत गोपियनके साथ “ही चौतालातील बंदीश, ” चलोरी होरी खेलन सजनी दे तारी “हा धमार प्रचलित आहे.
वर नमूद केलेल्या रचनांवरून असे म्हणतां येईल की भक्ति,शृंगार, प्रीति सर्वच भावनाविष्कार करण्यास ह्या रागाचे चलन सक्षम आहे. ह्यांत एकप्रकारचा मांगल्यभाव आहे. इथे उल्हासाची उधळण नाही परंतु निराशाही नाही.चांगल्या गोष्टी तशाच टिकून राहिल्या आहेत असा तिलककामोदाचा भाव आहे.
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈