सुश्री आसावरी केळकर वाईकर

☆ सूर संगत (भाग – ८) – पाऊलखुणा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेत असताना आपलं भान हरपतं, भवताल विसरलं जातं, वाऱ्याच्या लहरीवर तरंगत जात असल्यासारखं मन हलकं होऊन जात अक्षरश: एका भारलेल्या अवस्थेत आपण जातो. निर्गुण-निराकारत्वाची खूण पटवणाऱ्या, ‘त्याच्या’ अस्तित्वाची साक्ष देणाऱ्या, त्या सर्वोच्च शक्तीनं वेढलेल्या अवस्थेतले क्षण हे खरंतर जाणिवेच्या पलीकडले असेच म्हणावे लागतील. मात्र ही अवस्था लोप पावल्यानंतरही तिचा प्रभाव टिकून राहातो, ते क्षण मनात रेंगाळत राहातात. ह्या रेंगाळत्या क्षणांमधेच आपण खरोखरी काही चैतन्यदायी, निखळ आनंद देणारे क्षण अनुभवले हे जाणवतं… मनावर उमटलेल्या त्या अनुभूतीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसतात! अशाच प्रकारच्या एकाच वेळी तेजस्वी आणि हळव्याही पाऊलखुणा भैरवी कायमच मनावर उमटवत राहाते असं मला वाटतं.

मागच्या लेखात भैरवीला शब्दमर्यादेत मुडपून कसंबसं बसवलं असं माझं मलाच वाटत राहिलं. मन भरलं नाही, ते पुरेसं कागदावर उतरलंच नाही असं अधुरेपण जाणवत राहिलं. किंबहुना, भैरवीविषयी लिहिल्यावरही तिच्या पाऊलखुणा अजून मनात रेंगाळत राहिल्या आहेत म्हणायला हरकत नाही. बारा सुरांपैकी सगळे कोमल सूर भैरवीत आहेत म्हणूनच कि काय आपल्या मनालाही तीच कोमल अवस्था प्राप्त होत कुणी एखादा शब्द आपल्याशी बोललं तरी त्या ध्वनिलहरींच्या हलक्याशा धक्क्यानंही जिभेवर पिठीसाखर विरघळावी तितक्या सहजी आपलं अस्तित्वच विरघळून जाईलसं वाटत राहातं. म्हणूनच अशा अनुभवानंतर प्रत्येकच संवेदनशील व्यक्ती नि:शब्द होत मनावरचा भैरवीच्या रुतल्या पाऊलखुणांचा रेंगाळ ओलसर डोळ्यांनी जपत राहाते.

निरीक्षण केलं तर लक्षात येईल कि, कुठल्याही उत्तम रंगलेल्या मैफिलीतील भैरवीनंतर वातावरणात एक आल्हाददायक शांतता भरून राहिलेली असते, प्रत्येक श्रोत्याच्या मनात भैरवी आणखी ठळकपणे पाऊलखुणा उमटवत जात असते. श्रोते त्या परमानंदावस्थेत नुसते एकमेकांकडे पाहताना डोळ्यांतूनच ‘अहाहा… क्या बात है!’ असं गायकाविषयीचं कौतुक एकमेकांपर्यंत पोहोचवत असतात. त्या भारलेल्या अवस्थेला आपल्या शब्दानं धक्का लागू नये ह्याची काळजीच जणू प्रत्येकजण घेत असतो. भैरवीनं श्रोत्याला आनंदात न्हाऊ-माखू घालण्याचं कसब गायक-वादक कलाकाराचं हे वादातीत! त्यानं संगीतसाधनेतून कमावलेली शक्तीच इतक्या सगळ्या श्रोत्यांचं बोट धरून त्यांना वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याची किमया घडवून आणू शकते. मात्र भैरवीच्या बाबतीत थोडंसं झुकतं माप त्या सुरांना जातं असं माझं वैयक्तिक मत!

मागच्या भागात आपण भैरवीवर आधारित काही मराठी रचनांचा उल्लेख केला होता. हिंदी रचनांविषयी बोलायचं झाल्यासही अक्षरश:  लांबलचक यादी तयार होईल. पण पटकन आठवते ती रचना म्हणजे भारतरत्न पं. भीमसेन जोशीजी, पं. बालमुरलीकृष्णनजी, लताबाई ह्यांचे सूर आणि दर्शनासोबत भारतातील इतरही प्रांतांमधील अनेक गुणी व्यक्तींचं दर्शन घडवणारी, अनेक भाषांत सजलेली पूर्वी दूरदर्शनवर लागणारी ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ ही संपन्न रचना! मागच्या लेखात उल्लेखिल्याप्रमाणे कोणतीही मैफिल ‘भैरवी’ने संपन्न करण्याची प्रथा उत्तर भारतीय संगीत पद्धतीत रूढ आहे. ही रचना मात्र भैरवीमुळे जास्त संपन्न झालीये असं मनात येतं. ह्या संपन्नतेचं लक्षण म्हणजे ही रचना पाहाताना डोळे पाणावतातच, देशभक्ती उरात दाटून येतेच, अनेकविध प्रांतांमधील आपल्या देशबांधवांविषयी आस्था, एकात्मतेची भावना मनात जागतेच, सगळ्याच अर्थांनी दुजाभावाच्या कल्पना लोप पावत एक उदात्त, संपन्न जाणीव मनात जागतेच जागते. कितीही वेळा ही रचना ऐकली तरी प्रत्येकवेळी अशीच अनुभूती येते! पुन्हा म्हणेन, मनात जागणारी ही अनोखी जाणीव ‘भैरवी’नं गडद केली आहे!

हिंदी चित्रपट संगीतातल्याही किती रचना सांगाव्या! लताबाईंचं ‘माता सरस्वती शारदा’ अंगावर रोमांच उभं करतं, ‘बाबूल मोरा नैहर छूटो जाए’ हळवंहळवं करून टाकतं, ‘दिल का खिलौना हाए टूट गया’, ‘मीठे बोल बोले’, ‘फुल गेंदवा ना मारो’, ‘कैसे समझाऊ बडे नासमझ हो’ अशा कितीतरी रचना मनात रुंजी घालू लागतात. ‘कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियों, अब तुम्हारे हवालें वतन साथियों’ ह्या ओळी ऐकताना काळजाला घरं पडतात, अंतऱ्यात मात्र वेगळे सूर वेगळा नूर घेऊन येत उरांत अभिमान जागवतात आणि पुन्हा ध्रुवपदाशी आल्यावर भैरवी काळजाचं पाणीपाणी करते. बेगम अख्तर, शोभा गुर्टू  ‘हमरी अटरिया पे आजा रे सावरिया’ गातात तेव्हां त्यातली विरहवेदना जीव जाळत जाते.

खरंतर अशा अजून कितीतरी रचना आहेत ज्या मुख्यत्वे भैरवीची आठवण करून देतात, मात्र इतर स्वरांच्या वापरामुळे वेगळ्या ढंगानं पुढं जातात. मग तिथे भैरवीतल्या सुरांमध्ये एखाद- दुसऱ्या सुराचा फरक केल्यावर जे राग निर्माण होतात त्यांची आठवण जास्त गडद होत जाते. म्हणूनच अशा कित्येक रचनांचा उल्लेख मुद्दाम टाळतेय. सुगम रचनांबाबत हेच महत्त्वाचं आहे. रागनियम हा भागच तिथे लागू नसल्याने एखाद्या रचनेवर धडमकन एखाद्या रागाचं लेबल लावायला मन धजावत नाही, ते संयुक्तिकही नाही. एक मात्र खरं की, कोणताही संगीतप्रकार असो, त्यातली भैरवीची प्रत्येक सुरावट ही काळजावर पाऊलखुणा उमटवत जाते हे नि:संशय!

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments