सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १०) – राग व समयचक्र ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

मी काम करते त्या कॉलेजमधले माझे एक वयस्कर कलीग त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगतात. बेंगलोरजवळच्या एका खेडेगावी एक प्रसिद्धीपरान्मुख गायक होते. गुरूंवर नितांत श्रद्धा आणि त्यांनी सांगितल्याबरहुकूम सूरसाधना इतकंच त्यांनी आयुष्यभर केलं. ते अविवाहित असल्यानं कधी गावातलेच कुणीतरी त्यांना पोटाला दोन घास घालायचं. त्यांच्याकडं शिकणाऱ्या शिष्यांकडून मिळालेल्या तुटपुंज्या दक्षिणेतून बाहेर काहीतरी किरकोळ खाऊन ते पोट भरायचे. एकूण परिस्थिती अगदी हालाखीचीच होती.

एके ठिकाणी त्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण आलं. तिथं गेल्यावर कुणीतरी त्यांना काही अनवट राग गायला सांगितले, जे त्या वेळेनुसार गाण्यायोग्य नव्हते. मात्र काहीजणांना ते राग ऐकून शिकायचे होते कारण बाकी कुणाला ते येते नव्हते. मात्र ‘मी रागसमयाचा भंग करून गाणार नाही. तो माझ्या गुरूंचा अवमान होईल’ असं निक्षून सांगत ते बुजूर्ग गायक स्टेजवरून उठू लागले. तेव्हां काही लोकांनी त्यांना ‘जास्त पैसे देऊ, जेवण देऊ’ असं आमीष दाखवलं तर ते गायक म्हणाले कि, ‘टपरीवर दहा पैशात मिळणाऱ्या चहा-सामोशामधे मी खुश आहे. पैशाची हाव धरून मी असलं पापकृत्य कधीच करणार नाही.’

आजच्या काळानुसार ह्या गोष्टीचा विचार करताना असंख्य प्रश्नचिन्हं मनात उभी राहातात. अलीकडे खूपदा ‘प्रत्येक राग हा निश्चित समयीच गायला जावा’ ह्या परंपरागत प्रघाताविषयी  दुमत असणारे विचार ऐकू येतात आणि ‘थोडीफार लिबर्टी/ कॉन्सेप्च्युअल कॉन्सर्ट्स’ वगैरे लेबलखाली बरीच ‘लिबर्टी’ घेतलीही जाते. आजच्या प्रचंड गतिमान जीवनशैलीत फक्त सुट्टीच्या दिवशी लोकांना मैफिलीला जायला थोडासा वेळ असतो. पूर्वीसारखी चार, सहा तासांच्या मैफिलीची आणि मध्यरात्र, पहाट, सकाळ, दुपार अशी कोणत्याही वेळेची चैन आता परवडण्यासारखी नाही. त्यामुळं क्वचित काही अपवाद वगळता ठराविक वेळांमधेच बहुतांशी मैफिलींचं आयोजन होतं. मग साधारणत: फक्त संध्याकाळी सहा ते आठ ह्या वेळेतलेच राग कलाकाराला गायला/वाजवायला आणि श्रोत्यांना ऐकायला मिळणार का? बाकीचे राग मग कधी गायला/ऐकायला मिळणार? असे प्रश्न निर्माण होतात.

शिवाय दिवसांच्या वेगवेगळ्या प्रहरांमधे वातावरणात आणि माणसाच्या मनोवस्थेत खरंच काही बदल होतात का? त्यानुसार भावणारे राग वेगळे असण्यात खरंच काही तथ्य आहे का? असे सगळेच प्रश्न आजच्या काळाशी सुसंगत जरूर वाटतात, मात्र त्यामागचं कारण आज निसर्गावर अत्याचार केल्याने त्याच्यासोबतच्या जगण्याला वंचित झालेलं आणि बहुतांशी कालावधीसाठी ‘एअर कंडिशन्ड’ असणारं माणसाचं जगणं आहे हे निश्चित… ‘कंडिशन्ड’ मोडमधे निसर्गचक्रानुसार आपसूक बदलत जाणारे वातावरणातील सांगावे आणि त्यानुसार बदलत जाणाऱ्या जिवंत जाणिवा उमजणार कशा!? असं मनात आल्याशिवाय राहात नाही.

ज्या काळी मानवाचं जगणं हे निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाशीच जोडलं गेलेलं, निसर्गाशी अत्यंत जवळीक साधणारं, निसर्गाचा आदर राखणारं होतं त्या काळात एखादी वट, स्वरधून ही एका विशिष्ट वेळेला जास्त प्रभावी वाटते, काळजात जास्त खोलवर रुतते ह्या मानवाच्याच जाणिवेच्या आधारावर प्रत्येक राग गाण्याची वेळ (रागाचा गानसमय) निश्चित केली गेली. सोप्या भाषेत आपण असं म्हणू कि, ‘निसर्गातील बदलाचा मानवी मनावर होणारा परिणाम आणि नेमका तसाच परिणाम साधणारे/गडद करणारे स्वरसमूह’ ह्या परस्परसंबंधातील सूक्ष्म अभ्यासकांच्या मतानुसार ‘काही ठराविक सुरांचं कॉम्बिनेशन हे अमुक एखाद्या वेळी जास्त परिणामकारक ठरतं’ असा विचार पुढं आला आणि त्यावरून रागसंगीतात ‘समयचक्राचा विचार’ (टाईम थिअरी) हे शास्त्र होऊन गेलं.

आपल्या सर्वांच्याच परिचयाची ‘अष्टौप्रहर’ ही संकल्पना आपल्या संस्कृतीशी जोडली गेली आहे. ह्याच आठ प्रहरांचा विचार रागसंगीताबाबतही केला गेला आणि त्यातूनच ‘रागसमय’ संकल्पना मांडली गेली. दिवसाचे एकूण चोवीस तास आणि तीन तासांचा एक प्रहर, त्यामुळे अर्थातच एकूण प्रहर आठ झाले. सकाळी ७ ते १०, सकाळी १० ते दुपारी १, दुपारी एक ते दुपारी चार, दुपारी ४ ते संध्याकाळी ७ याप्रकारे दिवसाचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा व चवथा प्रहर मानला गेला आणि ह्याच पद्धतीने संध्याकाळी ७ ते रात्री १०, रात्री १० ते मध्यरात्री १, मध्यरात्री १ ते पहाटे ४ आणि पहाटे ४ ते सकाळी ७ याप्रकारे रात्रीचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा व चवथा प्रहर मानला गेला.

थोडक्यात दिवसाचे, दिवस आणि रात्र असे दोन भाग केले गेले (जे नैसर्गिकरीत्याच होतात) आणि त्या प्रत्येक भागाचे चार-चार प्रहर! आता ह्या प्रत्येक भागातील चार प्रहरांपैकी चवथा प्रहर हा ‘संधिप्रकाश’ म्हणून ओळखला जातो. संपूर्ण चोवीस तासांत संधिप्रकाश आपण दोनदा अनुभवतो. दिवस संपून रात्र सुरू होताना आणि रात्र संपून दिवस सुरू होताना… पहाट आणि संध्याकाळ! ही वेळा म्हणजे धड दिवसही नाही आणि रात्रही नाही… हा कालावधीत दिवस व रात्रीचा संधी(व्याकरणीय) होतो. त्यामुळे काहीजण ह्यावेळेत गायल्या जाणऱ्या रागांच्या वेळेचा उल्लेख करताना ‘दिवसाचा/रात्रीचा चवथा प्रहर’ असा करतात. मात्र बहुतांशी लोक एखाद्या रागगायनाची वेळ ‘सकाळचा/संध्याकाळचा संधिप्रकाश’ असे सांगतात व ह्या कालावधीत गायल्या जाणाऱ्या रागांचा ‘संधिप्रकाशी राग’ असाही उल्लेख केला जातो.

दुसरं एक मत असं आहे कि, प्रत्येक राग हा विशिष्ट वेळेतच गायला/वाजवला जावा ह्या नियमाला काहीही अर्थ नाही. उत्तमप्रकारे लावलेले सूर हे कोणत्याही वेळी परिणामकारकच असणार. एका जुन्या ग्रंथात असाही उल्लेख आहे कि, पूर्वीच्या काळी मोठमोठ्या राजांच्या प्रासादांत प्रत्येक प्रहरी गायनाचा/वाद्ये वाजवण्याचा प्रघात होता. मग ‘आता पुढच्या प्रहरी काय गावे/वाजवावे?’ ह्या सततच्या प्रश्नाचे सोपे उत्तर शोधण्यासाठी चतुर संगीत व्यावसायिकांनी एकेका वेळेला एकेक राग/थाट ठरवला आणि पुढे त्यानुसार ‘रागसमय’ निश्चित करण्याची प्रथा पडत गेली असावी.

ही मी माझ्या वाचनात आलेली गोष्ट सांगितली. मात्र संगीतातील ‘टाईम थिअरी’चा नीट अभ्यास केला तर त्यात एक सुसूत्रता, प्रहरानुसार स्वरसमूहांत कसे बदल होत जातात त्याचे काही विशिष्ट नियम स्पष्टपणे जाणवतात. त्यामुळे ते अभ्यांसांती मांडले गेले आहेत म्हणण्यालाच जास्त वाव आहे. फक्त वरती म्हटल्याप्रमाणे आत्ताच्या काळातलं जीवनमान पाहाता समय-मनोवस्था-सूर ह्यातला सूक्ष्म संबंध जाणवण्याइतके भाग्यवान आपण नाही. निसर्गावर कुरघोडी करताकरता आपण आपल्याच जाणिवा हरवून बसल्याचं हे मोठं उदाहरण आहे.

पंडिता किशोरीताई अमोणकरांसारख्या खऱ्या अर्थाने ‘जिनिअस’ व्यक्तीने एका मुलाखतीत म्हटल्याचं आठवतं कि, ‘भरतमुनींनी जे काही लिहिलं असेल ते सहज मनाला आलं म्हणून नक्कीच लिहिलं नसेल. त्यामागं कित्येक प्रयोग, केवढा अभ्यास केला गेला असेल. त्यामुळं मी ते मत मानते. सगळ्यांनीच ते मानावं असंही नाही. मात्र मानायचं नसेल तर ते मत चूक आहे हे कोणत्यातरी ‘कॉंक्रिट’ गोष्टीच्या आधारे अभ्यासांती आधी सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे. तरच मग ते डावलण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल.’ किशोरीताईंचा असल्याने हा विचार निश्चितच महत्वाचा, अनमोल आणि आपल्या विचारांना चालना देणारा आहे.

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 5 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments