सुश्री अरूणा मुल्हेरकर
☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ६) – राग बिहाग ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
” तेरे सूर और मेरे गीत दोनो मिलकर बनेगी प्रीत” गूंज उठी शहनाई या चित्रपटांतील श्री वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले,१९५०चा उत्तरार्ध व १९६०च्या दशकाची सुरवात या कालावधीत अत्यंत लोकप्रिय झालेले हे गीत म्हणजेच राग बिहाग! “बीती ना बिताये रैना हेही परिचय सिनेमांतील गाणे बिहागचेच उदाहरण म्हणून घेता येईल. बाल गंधर्वांच्या नाट्य संगीताने भारावलेला मराठी रसिकवर्ग म्हणेल की संगीत स्वयंवरांतील रुख्मिणीच्या तोंडचे “मम आत्मा गमला”हे पद म्हणजेच बिहाग किंवा सुवर्णतुला नाटकांतील अंगणी पारिजात फुलला हे सत्यभामेचे गीत म्हणजे बिहाग! कितीही वेळा ही गाणी ऐकली तरी प्रत्येकवेळी नवीनच वाटावी अशी ही कर्णमधूर स्वररचना!
“कोमल मध्यम तीवर सब चढत री ध त्याग
ग नि वादी संवादी ते जानत राग बिहाग”
राग चंद्रिकासार या पुस्तकांत बिहाग रागाचे असे वर्णन केलेले आढळते.
या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे ती म्हणजे हे वर्णन पलुस्करी पद्धतीने केले आहे. शास्त्रीय संगीतात भातखंडे आणि पलुस्कर या दोन सांगितिक भाषा ग्राह्य आहेत.ज्याला भातखंडे तीव्र म म्हणतात त्याला पलुस्कर कोमल म अशी संज्ञा देतात तर भातखंड्यांच्या शुद्ध स्वरांना पलुस्कर तीव्र स्वर म्हणतात.
बिलावल थाटजन्य असा हा राग, ओडव~ संपूर्ण जातीचा.(आरोहांत पांच स्वर आणि अवरोहांत सात स्वर) शास्त्रानुसार रात्रीच्या दुसर्या प्रहरी गायचा हा राग. सा ग म प नी सां/ सां नी धप म ग रेसा असे आरोह ~ अवरोह असलेल्या या रागांत तीव्र मध्यम अतिशय अल्प प्रमाणात घेतला जातो तसेच अवरोही स्वररचनेत रिषभ व धैवत अतिशय दुर्बल स्वरूपांत वावरतांना दिसतात. अल्प तीव्र मध्यमाचा उपयोग अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने केला जातो. विशेषतः अवरोहांत पंचम लावताना व पंचमावरून खाली येतांना तीव्र मध्यम घेण्याची प्रथा आहे. जसे “सां नी ध म(तीव्र)प म(तीव्र) ग म ग” —— राग ओळखण्याची ही महत्वाची खूण आहे. युवतीने तिच्या लांबसडक केसांत एखादेच मोहक गुलाबाचे फूल खोचावे व आकर्षकता वाढवावी तसा बिहागमधील हा तीव्र मध्यम राग आकर्षक करतो. या रागाची प्रकृती एकंदरीत गंभीर परंतु लोभस! त्याचा लालित्यपूर्ण स्वरविलास आनंददायी आणि नैराश्य दूर करणारा आहे. “लट उलझी सुलझा जा बालम” ही बंदीश ऐकली की त्यातल्या सुरांचा हळुवारपणा जाणवतो. बिहागच्या स्वरांचा प्रेमळ स्पर्ष अनुभविण्यास मिळतो, तो किशोरी अमोणकर, अश्विनी भिडे यांनी गायिलेल्या “बाजे री मोरी पायल झनन” या विलंबित तीनताल बंदिशितून.
अंतर्याचे गमपनीसां हे सूर ऐकले की सासरी निघालेल्या भावविवश मुलीचा चेहेरा नजरेसमोर येतो नि मग आठवण येते ती कविवर्य भा.रा.तांबे यांच्या “नववधू प्रिया मी बावरते” या कवितेची.
कवी राजा बढे यांनी बिहागाच्या स्वभावाचे वर्णन कसे केले आहे बघा……. ते म्हणतात,
“लाविलेस तू पिसे मुळी न बोलता
राहू दे असेच मुके मुळी न बोलता
ओठ हे अबोलके तरीही बोलती मुके
बोललो कितीतरी मुळी न बोलता”
बिहागचं देखणं रूप म्हणजेच मारूबिहाग. ह्यांत तीव्र मध्यम म्हणजे ह्याचा प्राण स्वर! “रसिया हो न जावो” ही बडा ख्याल बंदीश आणि ” जागू मै सारी रैना” ही मध्यलय बंदीश अनेक मैफिलींतून गाईली जाते व दोन्ही फार लोकप्रिय आहेत.
उपशास्त्रीय व सुगम संगीत या प्रकारात मारूबिहागला अधिक मानाचे स्थान आहे.सजणा का धरिला परदेस हे ,हे बंध रेशमाचे या नाटकातील पद ,मारूबिहागातील, बकूळ पंडीत यांनी अजरामर करून ठेवले आहे.
छाया बिहाग, चांदनी बिहाग, नट बिहाग, पट बिहाग, हेम बिहाग, मंजरी बिहाग असे बिहागचे बरेच प्रकार आहेत. एकूणच बिहागचा पसारा विस्तीर्ण आहे.
क्रमशः….
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈