सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १५) – ‘लोकसंगीत’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆

विविध प्रसंगी आपल्या मनातील विविध अशा विशिष्ट भावना प्रकट करण्याची, व्यक्त होण्याची मानवाची सहज ओढ त्यानं आपली बोली भाषा आणि सहजस्फूर्त सूर-लयीच्या आधारानं भागवली आणि आज ज्याला आपण लोकसंगीत म्हणतो त्याची निर्मिती झाली. सामान्य लोकांच्या जीवनातून सहजपणे ज्याची निर्मिती होत गेली ते लोकसंगीत! लोकसंगीत हा शब्दच आपल्याला सांगतो कि हे लोकांचे संगीत आहे… त्यामुळं त्याची मालकी कुण्या एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण समाजाची आहे, त्याच्या निर्मितीचे श्रेय हे संपूर्ण समाजाचं आहे. हे संगीत सर्वसामान्य लोकांच्या जीवनातून सहजी, उत्स्फूर्तपणे उपजलं आणि तितक्याच सहजी ते त्यांच्या ओठी खेळत, विकसित होत राहिलं.

मुळातच मानवाच्या जगण्याशी संगीत किती सहजी बांधलं गेलं आहे ह्याचा विचार केला तर स्वस्थ मन:स्थितीत सहजपणे गुणगुणणं, विविध भावना आवाजांतून व्यक्त करत असताना त्या भावनेनुसार आवाजात होणारे चढ-उतार, अत्यानंदानं गिरक्या घेणं, नाचणं, एखादी धून कानांवर आल्यावर स्वयंप्रेरणेनं पायानं धरला गेलेला ठेका किंवा टाळ्या वाजवत साधलेली लय, आनंदानं किंवा संतापानंही व्यक्त होताना सहजपणे विशिष्टप्रकारे केलेले हातवारे, आनंदानं उड्या मारणं किंवा संतापानं दाणदाण पाय आपटणं, डोळ्यांच्या, पापण्यांच्या, अंगप्रत्यंगांच्या विशिष्ट हालचालींतून शब्दांशिवायही भावना व्यक्त करणं अशा कितीतरी उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या क्रिया आठवतील.

ह्या सर्व क्रिया ‘सूर, ताल, लय’ ह्या संगीतातील मूलतत्वांपैकी कुठल्या ना कुठल्या तत्वाशी आपसूक जोडल्या गेलेल्या आणि म्हणूनच ‘संगीत’कलेशी नातं सांगणाऱ्या आहेत, असं  म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढं शब्दसंपदा प्राप्त झाल्यावर बुद्धिमान व कल्पक मानवाच्या जगण्यातल्या अंगभूत संगीताला छान आकार प्राप्त होत गेला.

माणसाच्या दैनंदिन जीवनात उठल्यापासून झोपेतोवर संगीतच कसे सामावलेले आहे ह्याचा विचार करताना लक्षात येईल कि, पूर्वीच्या काळी पहाटे घरोघरी स्त्रिया जात्यावर धान्य दळताना ओव्या म्हणायच्या. ह्या ओव्यांतून त्यांची सुख-दु:खं, आशा-निराशा, स्वप्नं, काळजी अशा विविध भावना आपसूक व्यक्त होत असत आणि अवजड जातं ओढताना त्यांना होणारे श्रमही हलके होत असत. अतीव शारिरिक कष्ट करताना होणारे श्रम हलके करण्याचं श्रमगीत हे एक उत्तम साधन आहे. शेतकरी गीतं, कोळीगीतं इ. श्रमगीतांचेच प्रकार!

पूर्वीच्या काळी लोकांनी नदीवर स्नान करताना सूर्याला अर्घ्य देताना म्हटलेले ओंकार, श्लोक, पूजेच्यावेळी घंटानाद करत म्हटलेली आरती, जेवणापूर्वी म्हणायचे श्लोक, दिवसभर कामकाजाच्या वेळेस श्रम हलके करण्यासाठी गुणगुणणं किंवा गाणी गाणं, मुलांनी शाळेत एका लयीत म्हटलेले पाढे, ठेक्यात म्हटलेल्या कविता, संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी म्हटलेली शुभंकरोती आणि एकूणच लयदार परवचा, ‘त्याच्या’ आळवणीत गायलेलं भजन, लहान मुलाचं रडं थांबवण्यासाठी टाळ्या-टिचक्या वाजवण्यापासून, ‘अलेलेले’ अशा लयदार उद्गारांपासून ते खुळखुळ्याचा घेतलेला आधार व त्यांना निजवताना गायली गेलेली अंगाई अशा कितीतरी गोष्टींत संगीतच तर सामावलेलं आहे.

मानवप्राण्याच्या सामुहिक जीवनाला जेव्हां सुरुवात झाली तेव्हांपासून लोकसंगीत अस्तित्वात आलं. लोकसंगीत हे समूहाचे, समूहाकडूनच निर्मिले गेलेले आणि समूहासाठीच सादर केले जाणारे संगीत आहे. ह्यातील सामूहिक हे तत्व अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच त्याचे निर्मितीश्रेयही व्यक्तिगत नाही तर सामूहिक आहे. हे संगीत फक्त कोण्या एका व्यक्तीसाठी, ठराविक वर्गासाठी नव्हे तर प्रत्येकच व्यक्तीसाठी म्हणजे संपूर्ण समूहासाठी आनंददायक, अर्थवाही असते. ह्यातील शब्द व स्वररचना अगदी सहजस्फूर्त साधी-सोपी असल्याने संपूर्ण समूह, सगळे लोक त्याच्याशी जोडले जाऊ शकतात.

वर उल्लेखिलेल्या मानवाच्या भावाभिव्यक्तीतील ‘उपजत’ संगीतातूनच त्याच्या जगण्यातीत विविध प्रसंगांनुसार, त्या-त्या कालमानातील जीवनपद्धतीनुसार, त्या-त्या मातीतील संस्कृती व समाजव्यवस्थेनुसार, चालीरितींनुसार, विकसनशीलतेतून उदयास आलेल्या विविध संकल्पनांनुसार लोकसंगीताचे विविध प्रकार उदयास आले. जगण्यातल्या विविध प्रसंगी मनात निर्माण होणाऱ्या विविध भावनांशी जोडलं गेलेलं संगीत म्हटल्यावर मानवाच्या जगण्याचं, संस्कृतीचं प्रतिबिंब त्यात असणं अगदीच साहजिक आहे. खरंतर, संस्कृतीचा फार मोठा भाग हा संगीतानं व्यापलेला आहे हे लक्षात येईल.

माणसाच्या जीवनातील जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक प्रसंगी त्यानं आपल्या भावाभिव्यक्तीसाठी घेतलेल्या संगीताच्या आधारातून जन्मलेले लोकसंगीताचे विविध वैशिष्ट्यपूर्ण प्रकार तर अक्षरश: अनंत आहेत. ह्याची कारणमीमांसा करायला गेलं तर जाणवतं कि, मनात निर्माण होणारी कोणतीही भावना नेमकेपणी व्यक्त करण्यासठी संगीत हे सहजस्फूर्त व अत्यंत प्रभावी माध्यम आहे हे लक्षात आल्यावर बुद्धिमान मानवाने प्रसंग व त्यानुरूप भावनांचं नेमकं वर्णन करू शकणाऱ्या साध्या-सोप्या बोली भाषेतील शब्द आणि उत्स्फूर्त संगीतधून ह्यांची घातलेली ही सुरेख सांगड आहे. मानवाच्या अनुभूतीतून निर्माण होणारं हे संगीत असल्यानंच लोकसंगीत ‘सजीव अभिव्यक्ती’ असल्याचं मानलं जातं आणि ही अभिव्यक्ती जितकी सजीव तितकं दर्जेदार तिने त्या-त्या देशाचं प्रतिष्ठित संगीत साकार केलं आहे.

क्रमशः ….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
म म गद्रे'

लोकसंगीत हा जनमानसाच्या जीवनात अंतर्भुत झालेला एक अत्यंत प्रभावी अनुभव आहे आणि संगीत ही सर्वसाधारण माणसाच्या जीवनातील एक आनंद निर्माण करणारी , प्रेरणादायक आणि आवश्यक अनुभूती आहे