सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत (भाग-१७) – ‘नामी शक्कल’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
चेन्नईत आल्यावर जेमतेम महिन्याभरात एक गोष्ट पहिल्यांदा पाहिली तेव्हां मला मोठा धक्का बसला होता. संध्याकाळी सहाच्या आसपासची वेळ असावी. घरापासून थोड्या दूर अंतरावर असणाऱ्या मंडईत मी भाजी आणण्यासाठी निघाले होते. अचानक ढोल-ताश्यांचा जोरजोरात आवाज येऊ लागला आणि त्या रस्त्यावरच्याच एका गल्लीतून एक मिरवणूक बाहेर येताना दिसली. पुढं लोक पायघड्या पडतील अशी भरपूर फुलं उधळत होते, पाठोपाठ आपल्याकडच्या ढोलक, ताशा, गोलाकार पण छोट्या आकाराचे ढोल अशी वाद्यं वाजवणारे लोक होते आणि त्या लोकांसोबत, आगे-मागे असलेले लोक बेभान होऊन नाचत होते, मधेच फटाक्यांची माळ ही वाजली. ह्या पुढच्या लवाजम्यापाठोपाठ एक सुंदर सजवलेली चंदेरी रथसदृश गाडीही येऊ लागली. त्या सगळ्याच प्रकाराकडं मी कुतुहलानं पाहात होतेच, मात्र तो सजलेला रथ पाहाताक्षणी वाटलं कि, थोडं पुढं जाऊन कोणत्या देवाची मिरवणूक आहे पाहावं.
ती मिरवणूक बऱ्यापैकी टप्प्यात आली तसा माझा चेहरा उत्साहानं, आनंदानं ओसंडून वाहात असावा. कारण माझ्याकडं विचित्र नजरेनं पाहात गर्दीत माझ्या शेजारी असणारा एक मध्यमवयीन माणूस हातवारे करून मला काहीतरी सांगू लागला. तेव्हां तामिळ अजिबातच समजत नव्हतं. मात्र त्याच्या हातवाऱ्यांवरून तो मला ‘पुढं जाऊ नको’ असं सांगत असावा. दोन क्षण थांबून मी पाहिलं तर मिरवणुकीत सगळे पुरुष लोकच होते आणि म्हणून तो माणूस मला एकटीला पुढं जाऊ नको असं म्हणत असेल असं वाटलं. मग मी त्याला हिंदीत ‘भगवान का दर्शन करना है’ असं सांगत हात जोडून देवाला नमस्कार करतात तसा नमस्कारही करून दाखवला. पण त्याला ते काही कळलं नसावं. तो आणखी मोठ्या आवाजात मला परत तामिळमधे काहीतरी सांगू लागला. मग मी त्याला ‘गॉड गॉड… नमस्कारम् नमस्कारम्’ असं म्हणून परत ती नमस्काराची ऍक्शन केली. तोवर अगदी जवळ आलेल्या मिरवणुकीला लोक आपोआप बाजूला होत वाट करून देत होते आणि मी मात्र किमान डोकावायला तरी मिळावं म्हणून जंगजंग पछाडत होते. बाजूच्या माणसानं परत काहीतरी सांगितलं आणि मी परत ‘गॉड, गॉड’ म्हणत किंचित रथाच्या दिशेनं पुढे जाताना त्या माणसानं कपाळावर हात मारून घेतल्याचं तेवढं मला दिसलं.
मी त्या रथापासून साधारण चार फूट अंतरावर असेन तेवढ्यात त्या रथासोबत चालणारा एक माणूस मी पुढं येताना पाहून वस्सकन् माझ्यावर खेकसला. तसंही कानाला सवय होईपर्यंत ह्या भाषेतलं साधं बोलणं ऐकलं तरी माझ्या काळजात धडकी भरायचीच, ते वसकणं तर अजून जोरदार होतं म्हणून मी जामच घाबरले. आपसूक दोन पावलं मागं येतायेता टाचा उंचावून रथात डोकावायची संधी मात्र मी साधली… पण तिथं जे काही दिसलं त्यानं माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. त्या रथात एक मृत शरीर होतं आणि ती एक अंत्ययात्रा होती. अशाप्रकारे वाजतगाजत जाणारी अंत्ययात्रा मी पहिल्यांदाच पाहिली होती म्हणून तो चांगलाच धक्का होता. आता ह्या गोष्टीची सवय होऊन गेल्यानं काहीच वाटत नाही, मात्र तेव्हां हे पचायला फारच जड गेलं होतं.
नंतर ओळखी होतील तसं आजूबाजूला तोडक्यामोडक्या हिंदी-इंग्रजीतून साधलेल्या संवादातून काही गोष्टी कळल्या. गेलेल्या माणसाला रडत निरोप न देता अशाप्रकारे निरोप दिला कि लोकांना नाचताना पाहून ते आनंदात आहेत अशा समजुतीमुळं जाणाऱ्या आत्म्याला क्लेश होत नाहीत, शेवटचा निरोप रडून-भेकून कशाला द्यायचा आनंदानं द्यावा असंही कुणी म्हणालं, कुणी म्हणालं कि लोक नाचतात तेव्हां माणूस गेल्यानं झालेलं दु:ख आत साठून न राहाता त्याचा आपोआप निचरा व्हायला मदत होते, त्या दु:खानं धक्का बसला असेल तर त्याची तीव्रता आपोआप कमी होऊन मन हलकं व्हायला मदत होते. तसे भाषेच्या अडसरामुळं सगळे संवादही वरवरचेच होते. खरं कारण काहीही असो, मात्र मला त्यावेळी ते पटायला आणि पचायला खूपच कठीण गेलं होतं.
मध्यंतरी माझे कलीग असलेल्या चेन्नईतल्या एका सुप्रसिद्ध आणि अभ्यासू मृदंगवादकांच्या एका लेक्चरला गेले होते. तेव्हां त्यांनी ‘रिदम’ ह्या संकल्पनेविषयी बोलताना विषय अचानक ह्या गोष्टीकडं वळला. माझे कलीग लहानपणापासून अमेरिकेत वाढलेले आणि क्वचित चेन्नईत येऊन-जाऊन असे असायचे. दहा-बारा वर्षांपूर्वी ते चेन्नईला कायमचे स्थायिक झाले त्यावेळी अशी वाजतगाजत अंत्ययात्रा त्यांनीही पहिल्यांदा पाहिली. ते सांगत होते, ‘माझ्या मनात आलं कि हा रिदम आणि इतकं जोशपूर्ण वादन तर आपल्याला पटकन नाचायला प्रवृत्त करणारं आहे. मग ह्या दु:खाच्या क्षणी ह्याचा वापर का केला जात असावा? एका अगदी बुजुर्ग व्यक्तीकडं ह्या परस्परविरोधी वाटणाऱ्या गोष्टीबाबत चौकशी केली असता ती व्यक्ती सहजपणे म्हणाली कि, तो माणूस खरंच मृत झाला आहे कि अजून जिवंत आहे हे पाहाण्यासाठी असं वाद्यवादन केलं जातं!’ पुढं ते म्हणाले, ‘हे ऐकताच मी अवाक् झालो. वाद्यवादनाचा/संगीताचा मन आणि शरीराशी असलेला संबंध एक वाद्यवादक म्हणून मला चांगलाच माहिती आहे. मात्र त्याचा हा असा वापर मला स्तिमित करणारा होता.’
ते ऐकून आपल्या पूर्वीच्या पिढ्यांची बुद्धीमत्ता आणि तर्कशास्त्राच्या आधारे गोष्टींचा वापर करण्याची क्षमता जाणवून त्यांच्याविषयीचा माझा आदर नव्याने कैकपटींनी वाढला. ज्या काळी वैद्यकशास्त्र ही गोष्ट अजून अस्तित्वात यायची असावी, हृदय सुरू आहे कि थांबलं आहे हे दाखवणारं मशीन अस्तित्वात यायचं होतं त्याकाळी हुशार मानवानं माणूस मृत झालाय कि जिवंत आहे, हे पडताळून पाहाण्याची ही नामी शक्कल योजली असावी… तीही अर्थातच उपलब्ध साधनांच्या आधारे! ‘जोशपूर्ण वाद्यवादनातून निर्माण होणाऱ्या ध्वनीमुळं माणसाच्या शरीरामधे उत्पन्न होणरी उत्तेजना’ ह्या गोष्टीचा असा उपयोग खरोखरीच स्तिमित करणारा आहे.
बराचवेळ माणूस उठलं नाही, त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत, त्याच्या नाकासमोर धरलेलं सूत हाललं नाही तर तो मृत झाल्याचं मानण्यात येत असावं. मात्र कुठंतरी अशीही शक्यता असेल कि काही क्षणांसाठी त्या व्यक्तीची शुद्ध हरपली असेल, नाडीचे ठोके अत्यल्प असतील परंतू तो पूर्ण मृतावस्थेत गेला नसेल तर अशा जोशपूर्ण वाद्यवादनाने उत्तेजित होऊन त्याच्यात काहीतरी हालचाल जाणवेल. अशाप्रकारे तो जिवंत असल्याचं लक्षात आल्यावर त्याचा जीव वाचवण्याचे काही प्रयत्न करता येतील. संगीताचा माणसाच्या मन आणि शरीराशी असलेल्या संबंधाचा इतका सूक्ष्म अभ्यास आणि वास्तविकतेमधे ‘मृत्यूच्या खात्रीसाठी’ त्याचा असा चपखल वापर ह्याचं हे अत्यंत नेमकं उदाहरण म्हणता येईल.
क्रमश:…
© आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाशी संगीत जोडलं गेलंय..अंतिम क्षणातही ही सोबत असावी हा आपल्या संस्कृतीचा मोठेपणा !
सुंदर लेखन…
Khar tar ashi antim yatra pahun mi pan surprise zale hote…. Pan asa tarka kharach mahit navta… Khup chaan