सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 ☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१८) – ‘मान अन्‌  भान’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मागच्या लेखात आपण तामिळनाडू प्रांतात प्रचलित असलेल्या अंत्ययात्रेतील जोशपूर्ण तालवाद्यवादनाच्या प्रथेची कारणमीमांसा केली. अर्थातच आज सुशिक्षित समाज ही प्रथा पाळताना दिसत नाही, त्याचं कारणही संयुक्तिक आहेच. आज वैद्यकशात्र प्रचंड विकसित पावलेलं आहे. ईसीजी मशीनमुळं ह्या प्रथेमागचा उद्देशच सफल होत असताना ह्या प्रथेची गरज नाही हे त्यांना समजलं असावं. मात्र तळागाळातले लोक ही प्रथा धर्मिक समजून श्रद्धेनं/अंधश्रद्धेनं अजूनही पाळत असावेत… पण त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे हे तरी समजलं. ज्याला आपण परंपरा म्हणतो त्या गोष्टी का आणि कशा अस्तित्वात येत असाव्यात हे तरी माहीत होऊन आपला ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक व्हायलाही नक्कीच मदत होते. शिवाय ही गोष्ट त्यातल्या उपयुक्ततेसोबत त्याकाळच्या समाजव्यवस्थेचाही भाग असावी असंही वाटून गेलं. वाद्यवादनात पारंगत असणाऱ्या कलाकारांना पोटापाण्यासाठीची ही एक व्यावसायिक संधी म्हणायला हरकत नाही. इतर सांस्कृतिक समारंभांमधे मांगल्यदायी वातावरणनिर्मिती करणे आणि अशा दु:खद क्षणी त्या कलेची ताकद मृत्यूच्या खात्रीसाठी वापरणे ह्या उपयुक्तता झाल्या आणि दोन्ही प्रसंगी कलाकाराला आपलं कसब पणाला लावून अर्थार्जनाची संधी ही झाली समाजव्यवस्था!

मला दक्षिणेकडच्याच केरळ राज्यातील चेंडामेलम्‌  हा प्रकार आठवला.  चेंडामेलम्‌  म्हणजे चेंडा ह्या वाद्याचे अनेक वादकांनी एकत्र येऊन केलेलं समूहवादन म्हणता येईल. आज ही गोष्ट केरळची भावाभिव्यक्ती आणि संस्कृतीचं प्रतीक मानलं जात असलं आणि केरळमधील सर्व सांस्कृतिक उत्सवांमधे चेंडावादन अपरिहार्य असल्याचं सांगितलं जात असलं तरी अचानक वाटून गेलं कि जंगली भाग असलेल्या केरळमधे पूर्वीच्या काळी माणूसप्राणी समूहानं एकत्र येऊन काही धार्मिक उत्सव किंवा काही सणसमारंभ साजरा करत असताना जंगली श्वापदांना दूर ठेवण्याचा हा उत्तम मार्ग असावा. इतक्या धडामधुड आवाजाकडे कोणतंही जंगली श्वापद फिरकण्याची शक्यताच नसल्याने निश्चिंत मनानं माणसाला उत्सव पार पाडता येत असेल ही उपयुक्तता आणि कलाकारासाठी रोजगारनिर्मिती हा समाजव्यवस्थेचा एक भाग! मनात आलं कि अशा उपयुक्ततेच्या कसोटीवर पारखून घेतलेल्या, समाजव्यवस्था भक्कम ठेवणाऱ्या, मात्र सर्वसामान्य माणसासाठी धार्मिक, सांस्कृतिक परंपरेच्या आवरणात सजवून ठेवलेल्या कित्येक गोष्टी आपल्या सर्वार्थाने वैविध्यपूर्ण देशात असतील. आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होताना प्रत्येक नागरिक सुशिक्षित, सुजाण व्हावा, जातीपातींचे निकष संपावेत, मात्र परंपरा जाणीवपूर्वक जपल्या जाव्यात… कला-संस्कृतीचं जतन, मान आणि समाजव्यवस्थेचं भान म्हणून म्हणूनही!

आपल्या मूळ विषयाकडं वळताना आणखी एक प्रथा आठवते. आपल्याकडं बहुधा लिंगायत समाजात (कदाचित इतरही काही समाजात असू शकेल) टाळ-मृदंगाच्या साथीत लोक अंत्ययात्रेत भक्तीपदं म्हणतात… अशी एक अंत्ययात्रा थोडी अंधुकशी माझ्या लहानपणच्या आठवणींच्या कुपीत आहे… आम्ही घरातले कोणत्यातरी कार्यक्रमाहून घरी परतत होतो. अचानक समोरून एक अंत्ययात्रा येऊ लागली. मला आठवतंय अगदी पालखी नव्हे पण साधारण त्याप्रकारचा आकार असलेल्य़ा एका डोलाऱ्यात शव ठेवलं होतं. अर्थातच काही लोकांनी त्या डोलाऱ्याला खांदा दिला होता. अंत्ययात्रेच्या पुढच्या भागात एखाददुसरा आणि मागच्या बाजूला काही लोकांनी दोन तीन छोटे कंदील धरले होते आणि लक्षात राहिलेली मुख्य गोष्ट म्हणजे अगदी नाजूक अशा टाळ आणि मृदंगाच्याही हलक्या आवाजात काहीजण भक्तीपद गात होते. साहजिकच त्या गायन-वादन दोन्हींतही खूप जोश नव्हता. म्हणजे इकडं दक्षिण प्रांतात पाहिलेल्या प्रकाराचा उद्देश काही तिथं लागू होत नाही.

आज ह्या गोष्टीचा विचार करताना वाटतं कि ह्या सर्वोच्च गंभीर क्षणी जीवनाचं सार, सत्य सांगणाऱ्या भक्तिरचना मनाला आधार देत असाव्या. केवळ जगन्नियंत्याच्या हाती असणारी आपल्या आयुष्याची सूत्रं, आपलं फक्त निमित्तमात्र असणं, आयुष्याचं क्षणभंगुरत्व ह्या गोष्टींची मनाला जाणीव करून ह्या क्षणापेक्षा योग्य क्षण कोणता असेल!? ते मंद सूर दु:खी मनावर थोडीशी फुंकर घालत असतील, त्या रचनेच्या शब्दांतून होणारी ‘सगळं ‘त्याच्या’ हाती, आपल्या हाती काही नाही’ ही जाणीव ते दु:ख सहन करायची ताकद देत असेल, शिवाय आपल्या जगण्यात षड्रिपूंमधे आपण किती गुंतून पडायचं ह्या विचाराला चालना देत असेल! विचार करता एकूण सुदृढ समाजमन घडवण्यासाठी अशा गोष्टी केवढी मोलाची भूमिका बजावत असतील!!

‘श्रीराम जयराम जय जय राम’ किंवा ‘राम नाम सत्य है’ चा गंभीर सुरांतला लयबद्ध जप तर अंत्ययात्रेत बहुतेक ठिकाणी केलेला दिसून येतो. अशाक्षणीच्या अतीव दु:खानं गेलेल्यांच्या आप्तेष्टांचं पिळवटणारं काळीज त्या लयबद्धतेत नकळत गुंगून जात असेल आणि मन शांतावायला त्याची मदत होत असेल. मन आणि मेंदूवर होणारा संगीताचा परिणाम प्रत्येकवेळी प्रत्येकाला जाणवतोच असं नाही, मात्र तो होतो नक्कीच! म्हणून अशा छोट्याछोट्या प्रथांमधला तर्कशुद्ध आणि सूक्ष्म विचार पाहिला कि आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेपुढं नतमस्तक व्हावसं वाटतं!!

मध्यंतरी एक इंग्रजी लेख वाचनात आला ज्यात चीनमधील ‘कुसांग्रेन’ म्हणवल्या जाणाऱ्या स्त्रियांविषयी माहिती होती. ह्या स्त्रिया म्हणजे ज्यांना अंत्येष्टीच्या आधी साग्रसंगीत वाद्यवृंदासह गायन-नर्तन करायला बोलावलं जातं. अर्थातच अशावेळची गीतंही विशिष्ट प्रकारचीच असणार जी ऐकताना गेलेल्या व्यक्तीच्या आप्तेष्टांच्या भावना उफाळून येत त्यांना भरपूर रडू येऊन त्यांच्या दु:खी भावनांचा निचरा व्हायला मदत होईल. काहीवेळा अशा अघटिताच्या धक्क्यानं एखादी कुणी व्यक्ती स्तब्ध होऊन जाते आणि तिला रडायलाही येत नाही. मात्र संगीताच्या प्रभावच असा असतो कि अशी व्यक्तीही धक्क्यातून बाहेर पडून तिच्या भावना प्रवाही होत रडू लागते!

ह्या प्रथेविषयी वाचताना मला आपल्या देशातल्या राजस्थान प्रांतातली रुदाली आठवली! प्राचीन रोम, ग्रीस, युरोप, अफ्रिका, एशियामधे अनेक ठिकाणी अशा प्रथा आहेत. प्र्त्येक ठिकाणच्या प्रथेत काही ना काही फरक असणार, मात्र उद्देश एकच असावा कि संगीतासारख्या अत्यंत प्रभावी गोष्टीचा वापर करून दु:खी भावनांचा निचरा व्हायला मदत करणं! आणि… अर्थातच पुन्हा समाजव्यवस्था हा भागही आलाच!

प्रथांचा गैरफायदा घेतला जाऊन काही व्यक्तींचं होणारं शोषण हा वेगळा मुद्दा आहे! मात्र मला असं प्रामाणिकपणे वाटतं कि कोणत्याही प्रथेमागचा मूळ उद्देश हा वाईट नसावा. शेवटी काही ना काही काम मिळून प्रत्येकाच्या पोटपाण्याची व्यवस्था होणं हा उदात्त विचारच त्या ठिकाणी असावा! मात्र हे करत असताना ‘संगीत’ हे ‘अत्यंत प्रभावी’ माध्यम प्रत्येक ठिकाणी वापरण्याची चतुराई मात्र फारच कौतुकास्पद वाटते! संगीतकलेचा, तिच्या आपल्या जाणिवांशी असलेल्या नात्याचा वापर मानवी आयुष्यातल्या जन्मापासून अंतिम क्षणापर्यंत प्रत्येकक्षणी केला गेलेला पाहाताना अक्षरश: थक्क व्हायला होतं.

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments