स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’
☆ कवितेचा उत्सव ☆ नवलाख तळपती दीप विजेचे येथ….. ☆ कवी…कुसुमाग्रज ☆
(काव्यानंद मध्ये या कवितेचे रसग्रहण – श्री सुहास रघुनाथ पंडित )
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात !
वार्यावर येथील रातराणी ही धुंद
टाकता उसासे,चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध !
हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट !
बेहोष चढे जलशांना येथील रंग
रूणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणि करतो व्याकुळ केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग !
लावण्यवतींचा लालस येथ विलास
मदिरेत माणकापरि तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातील करूण-विलास !
– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈