सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सुनीता“ – सुश्री मंगला गोडबोले ☆ परिचय – सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆ 

पुस्तक – सुनीताबाई

लेखिका : सुश्री मंगला गोडबोले

श्रेणी : व्यक्तिचित्रण

प्रकाशक : राजहंस प्रकाशन 

पृष्ठ संख्या : 198

मूल्य – 275

सुनीताबाई देशपांडे!  मराठी साहित्यसृष्टीतील एक अढळ तारा, महाराष्ट्राचे सर्वाधिक लाडके अन लोकप्रिय लेखक,  पु. ल. देशपांडे ह्यांच्या अर्धांगिनी!  हे एक सामान्यातलं असामान्य व्यक्तिमत्व! प्रखर, तीक्ष्ण बुद्धीमत्तेचं वरदान लाभलेली ही स्त्री मंगला गोडबोलेंच्या “सुनीताबाई” ह्या पुस्तकातून आपणासमोर विविध मनोज्ञ रूपात उलगडत जाते. पुस्तकाच्या सुरवातीलाच मंगलाताई म्हणतात की हा काही गौरव ग्रंथ किंवा स्मृती ग्रंथ नाही किंवा आरतीसंग्रह नाही तर त्यांना उमगलेल्या ह्या विलक्षण व्यक्तिमत्वाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच हे संस्मरण नुसतेच  रंजक नसून अनेक  वेगवेगळ्या अर्थांनी उदबोधक झाले आहे. 1990 साली  प्रसिद्ध झालेल्या सुनीताबाईंच्या  ‘आहे मनोहर तरी …’ ह्या  परखड आत्मचरित्रपर पुस्तकाने साहित्यविश्वात खळबळ  उडवून दिलेली होती. अगदी मुखपृष्ठापासूनच आगळ्या वेगळ्या ठरलेल्या ह्या पुस्तकावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. सुनीताबाईंवर भरपूर टीकाटिप्पणी ही झाली आणि तरीही त्यावर्षीच ते सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरलं. मंगला गोडबोलेंनी “सुनीताबाई” पुस्तकात “आहे मनोहर तरी..” मधले बरेच संदर्भ वापरले आहेत.

“सुनीताबाई” हे पुस्तक तीन भागांमधे विभागले आहे. “असं जगणं”, “असं लिहिणं” आणि “असं वागणं” !

“असं जगणं” मधे  सुनीताबाईंच्या अगदी बालपणापासूनचे सगळे वर्णन आलेले आहे. सुनीताबाईंचे वडील म्हणजे रत्नागिरीचे प्रसिद्ध फौजदारी व सरकारी वकील  सदानंद महादेव ठाकूर उर्फ अप्पा! त्यांच्याकडून आपण निवृत्ती तथा  निर्मोहीपणा उचलला तर आई सरलादेवींकडून आपणास मोठ्यांदा बोलणं, कुणाचंही तोंडावर कौतुक न करता येणं, स्पष्टवक्तेपणा, फटकळपणा, दीर्घोद्योगीपणा आणि लक्ख गोरा रंग ह्या गोष्टी वारसाहक्काने मिळाल्या असं त्या म्हणत. ही  सारी स्वभाव वैशिष्ट्ये त्या आठही भावंडांमध्ये  थोड्याफार फरकाने आलेली होती. वयाच्या  सोळाव्या वर्षांपर्यंत रत्नागिरीत राहिलेल्या सुनीताबाईंसाठी ‘रत्नागिरी’ हा कायम जिव्हाळ्याचा विषय होता. लहानपणा पासूनच त्या अतिशय बुद्धिमान, मेहनती, ध्येयवादी, कलासक्त आणि जिद्दी होत्या. हातात घेतलेलं कुठलंही काम परफेक्ट करण्याकडे त्यांचा कल असायचा. सोळाव्या वर्षी मॅट्रिक च्या परीक्षेत अतिशय चांगले यश मिळवल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या भावासोबत मुंबईला आल्यात. पण त्याचवेळी ‘चले जावं’ चळवळीला तोंड फुटलं आणि सुनीताबाईंनी  शिक्षणाला रामराम ठोकून स्वतः ला त्यात झोकून दिलं. चळवळीने त्यांच्या  विचारांना आणखी समृद्ध करत जीवनाला एक वेगळी दिशा दिली. स्वतः मधल्या क्षमतेची त्यांना जाणीव झाली. साधेपणातल्या मूल्यांची ओळख पटली. स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी मग माटुंग्याच्या एका शाळेत नोकरी पत्करली. तेथेच त्यांची पुलंशी ओळख झाली आणि हळूहळू ओळखीचे रूपांतर स्नेहबंधात झाले. आणि बघता बघता पुलंमधल्या उमद्या कलावंताच्या प्रेमात सुनीताबाई केव्हा पडल्या त्यांनाही कळले नाही!  त्या काळातही सुनीताबाईंचे  विचार खूप सुधारक होते. लग्न नावाचे कृत्रिम बंधन त्यांना अनावश्यक वाटत होते. परंतु पुलंना कोणत्याही पद्धतीचे का होईना पण लग्न हवेच होते. त्यामुळे मग अतिशय साध्या  नोंदणी पद्धतीने 12 जून 1946 ला त्यांचे लग्न पार पडले. त्यासाठी लागणारा आठ आण्यांचा फॉर्म सुद्धा दुसऱ्याला त्रास किंवा भुर्दंड नको म्हणून सुनीताबाईंनी स्वतःच आणून ठेवला होता!  पुलंनी आपल्या ह्या लग्नाला  “भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासातला अभूतपूर्व विवाह” म्हणून गमतीने गौरवले आहे तर सुनीताबाईंनीही  “आठ आण्यातलं लग्न” ह्या आपल्या लेखात हे सगळं वर्णन खूप खुमासदार केलंय! लग्नानंतर त्यांना अनेक बदलांशी जुळवून घ्यावे लागले. स्वतःच्या तत्वांना मुरड न घालताही त्यांना ते छान जमले. त्यामुळेच सासर आणि माहेर दोन्ही कडे त्याची पत कायम राहिली. “माईआत्या वॉज द फायनल ऑथॉरिटी इन ठाकूर हाऊस” असा अभिप्राय त्यांची भाचरं नेहमी देत.

लग्नानंतरचा काही काळ दोघांसाठीही खूप संघर्षाचा गेला. पण अत्यंत अल्प पैशात आपण जगू शकतो ह्या विचारधारेमुळे त्यांना त्याचे काही वाटले नाही. कष्ट करण्याची त्यांची नेहमी तयारी असायची. मित्रमंडळींच भरपूर पाठबळही होतंच. हळूहळू नाटक, सिनेमा, लेखन अशा सर्वच आघाडींवर पुलं  नावारूपाला यायला लागले आणि नंतर त्या सगळ्याचे नियोजन करण्यात सुनीताबाई आकंठ बुडून गेल्यात. हे सगळं होत असताना ह्या विलक्षण बुद्धिमान स्त्रीने स्वतः च्या करिअर बद्दल कुठली ठोस विचार केला नाही. त्यादृष्टीने बघितलं तर त्या सर्वार्थाने आधुनिक काळातल्या डोळस पतिव्रता होत्या असे म्हणावेसे वाटते. त्यांच्या आयुष्यातला एक  छोटासा प्रसंग हे छानच अधोरेखित करतो.  सुनीताबाईंच्या एका वाढदिवसाला पुलं त्यांना म्हणाले, “सुनीता, तुला उद्या कोणती भेट देऊ सांग?” तर सुनीताबाईंनी काय मागावे? “तुझं आहे तुजपाशी” चा तिसरा अंक पुलंनी अर्धवट लिहून ठेवून दिला होता. सुनीताबाईंनी त्यांना तो अंक पूर्ण करून देण्याची मागणी केली आणि पुलंनी सुद्धा आपल्या पत्नीची ही  मागणी आनंदाने मान्य केली आणि काही तास सलग बसून त्यांची तो अंक पूर्ण केला! वाढदिवसाची अशी अनोखी भेट मागणारी सहचरी मिळणं हे पुलंचं सुद्धा भाग्यच म्हणायचं!  पुलंच्या पुढच्याही सर्व यशस्वी कारकिर्दीचे भरपूरसे श्रेय दर्जा बद्दल कुठलीही तडजोड न करणाऱ्या सुनीताबाईंकडे निश्चितच जाते. ह्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या आयुष्यात आलेले अनेक सुप्रसिद्ध सहृदय, त्यांच्या कारकिर्दीचा चढता आलेख ह्या सगळ्यांबद्दल ह्या पाहिल्या भागात सविस्तर प्रकाश टाकला आहे.

पुस्तकाचा दुसरा भाग आहे “असं लिहणं!”. ह्यात सुनीताबाईंच्या एकूणच लेखनप्रवासाचा एक आढावा घेतला आहे. कुशाग्र बुद्धी, विपुल आणि विविध प्रकारचे वाचन, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, चिंतनशील वृत्ती इत्यादि सगळ्या गुणांमुळे  त्यांना स्वतंत्र लेखन करणे अगदी सहज शक्य होते. परंतु वयाच्या साठीपर्यंत त्यांनी कधी फारसं लिखाण केलं नाही. मात्र त्यांचे पत्रलेखन अव्याहत सुरू होते. जी. ए. शी त्यांचा पत्रव्यवहार तर कित्येक दिवस सुरु होता. तेव्हा जी. ए. नी त्यांना अनेकदा स्वतंत्र लिखाणाबद्दल सुचविले. पण सुनीताबाई तो विषय तेथेच झटकून टाकत असत. बऱ्याच पुढे त्यांचा  आणि जी. ए. चा हा पत्रसंवाद  ‘प्रिय जी. ए..” ह्या पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला. दोन भिन्नलिंगी व्यक्तींमधली  निकोप, निर्मळ मैत्री अशी असावी म्हणून त्याचे वाचकांनी मनापासून स्वागतही केले. काही दिवसांनी 1983 साली त्यांचे  वडील गेले आणि सुनीताबाईंना वयाच्या त्या टप्प्यावर आतापर्यंत काय मिळवलं अन काय गमावलं ह्याचा लेखाजोखा मांडावासा वाटला. आणि गतजीवनातलं  जे जे आठवले ते ते त्या लिहायला लागल्या. पुढे जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर लिहिलेला लेख ‘मौज’ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. आणि त्यांनी लिहिलेल्या  काही आठवणी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये प्रसिद्ध झाल्या त्या वाचकांना इतक्या आवडल्या की त्याचे पुस्तक व्हावे अशी चहुबाजूने मागणी होऊ लागली आणि अखेर  “आहे मनोहर तरी ..” पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीस आले. ह्या पुस्तकाचे बाकी अभूतपूर्व असे स्वागत झाले. आणि सुनीताबाई एक प्रभावी, दखलपात्र लेखिका म्हणून वाचकांच्या समोर आल्या. ह्या पुस्तकावर प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा, टीकाटिप्पण्णी झाली. अनेक बाजूंनी त्याची चिकित्सा झाली. त्याच्या सुमारे अठरा हजार प्रति हातोहात विकल्या गेल्यात. अनेक मानाचे पुरस्कार ह्या पुस्तकाने पटकावले. हिंदी, इंग्रजी, गुजराथी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवादही  झाले. महत्वाचे म्हणजे 1990-91 मध्ये खुद्द पुलंच्या पुस्तकां पेक्षा जास्त विक्री “आहे मनोहर तरी..” ची  झाली!  त्यानंतर ‘समांतर लेख’ , ‘सोयरे सकळ’ , ‘मण्यांची माळ’ वगैरे पुस्तकांबद्दल सविस्तर वर्णन आपल्याला ह्या पुस्तकात वाचायला मिळते.

पुस्तकाचा तिसरा भाग म्हणजे “असं वागणं..” ह्यात सुनीताबाईंच्या एकूणच स्वभाव वैशिष्टांविषयी वर्णन आहे. त्यांची काव्याप्रती असलेली ओढ, त्यांच्यातली कर्तव्यतत्पर पत्नी, कठोर व्यवस्थापिका, आप्तस्वकीय आणि स्नेहीजण ह्याच्याशी त्याचे असलेले संबंध, त्याच्यामधला वात्सल्यभाव, कळवळा, वेदनेबद्दलची ची सहानुभूती, स्त्रीवादाचा पुरस्कार करत असूनही त्यांच्यातली गृहकृत्यदक्षता, संसारदक्षता अशा नानाविध पैलू अधोरेखित करणाऱ्या अनेक  घटना, प्रसंग ह्यात सविस्तर आलेले आहेत. मुख्य म्हणजे पुलंनी  सुनीताबाईंचं हे सार्वभौमत्व जाहीरपणे मान्य केलं होतं. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी तर ‘माणुसकीचे आकाश” मध्ये त्यांचा गौरव करतांना  म्हटलंय की  ‘कलावंताच्या पत्नीला पदराखाली दिवा नेणाऱ्या बाईसारखे दिव्य  करावं लागतं. दिवा विझू द्यायचा नाही, भडकू द्यायचा नाही आणि पदरही पेटू द्यायचा नाही. हे दिव्य  सुनीताबाईंनी अतिशय समंजसपणे आणि आनंदाने केलं आहे.’ पुलंची प्रतिभा आणि प्रतिमा दोन्ही असोशीने जपणाऱ्या सुनीताबाईंसाठी ही महत्वाची पावतीच होती. 

सरतेशेवटी ‘ऐसे कठीण कोवळेपण’ हा अरुणा ढेरेंचा एक स्वतंत्र लेख आहे ज्यात त्यांनी सुनीताबाईंचं एकूणच आयुष्य, त्यांचं  कविताप्रेम, त्यांच्या स्वभावातले विविध कंगोरे, त्यांची प्रगल्भता, पुलंच्या एकूणच यशस्वी कारकिर्दीच्या मागे असलेले त्यांचे अथक परिश्रम, कुठलीही गोष्ट सर्वोत्तम करण्याचा ध्यास, पुलंच्या जाण्यानंतर त्यांनी वरवर तरी सहज स्वीकारलेले एकटेपण, अगदी शेवटी त्यांना आलेलं परालंबीत्व इ. अनेक गोष्टींविषयी विस्ताराने लिहलंय. वाचता वाचता आपल्या डोळ्यासमोर सुनीताबाई नावाचं  लखलखीत  व्यक्तिमत्व साकारत जातं आणि आपण नतमस्तक होतो !

© सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

मो 9890679540

अकोला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments