सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ निशिगंध (भावगीत संग्रह) – कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

कवी:            डॉ. निशिकान्त श्रोत्री

प्रकाशक:      नीलकंठ प्रकाशन (श्री प्रकाश रानडे)

पृष्ठ संख्या:    २१२

किंमत:        Rs. २००

डॉक्टर निशिकान्त श्रोत्री हे नाव साहित्य क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या या भावगीत संग्रहात  भक्तीपासून शृंगारापर्यंत विविध अंगांना आणि विषयांना स्पर्श करणारी गीते असल्यामुळे विषयांनुसार गीतांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. एकूण नऊ भागात ही गीते विखुरली आहेत. भक्ती, देशभक्ती, चिंतन, प्रीती, युगुल, विरह, शृंगार सगे सोयरे आणि नारी जीवन असे हे विभाग आहेत. जवळजवळ २०० हून अधिक गीते यात समाविष्ट आहेत आणि सगळीच गीते एकाहून एक सरस आहेत.

या गीत वाचनात वाचक अगदी सहजपणे रमून जातो ते त्यांतील सुंदर शब्दरचना आणि तितक्याच सुंदर विचारांमुळे. गीतांच्या शब्दांत अडकत असतानाच अगदी सहज प्रत्येक विभागासाठी काढलेली रेखाचित्रेही खूप बोलकी आहेत. या रेखाटनांंमुळे  गीते वाचणारा रसिक त्या वातावरणाशी या चित्रांमुळे पटकन जोडला जातो.

वास्तविक यातली सारीच गीते म्हणजे उत्तम काव्य, अनमोल  विचार, भाषा, भावना यांचा एक समृद्ध झराच आहेत. सर्वच गीतांविषयी लिहिणे केवळ अशक्य आहे. मात्र काही लक्षवेधी भावगीतांबद्दल आपण इथे नक्कीच बोलूयात.

भक्ती विभागातील पहिलेच गीत गणनायका. गणेश प्रार्थना सादर करून या पुस्तकाची सुरुवात एक सुंदर भक्ती पूर्ण आणि “प्रथम वंदना तुजला गणेशा” या पारंपारिक प्रथेप्रमाणे होते.

धन न वांच्छितो संपत्ती हिरे 

दर्शन दे मजला कर ठेवून शिरावरती या.. आशीर्वच दे मला…

संग्रहाची सुरुवातच अशी भक्तीमय, लीन आणि नम्रतेने होते. कलाकार कसा नम्र, समर्पित असावा याची जाणीव  होते. या  विभागात अनंत स्तोत्र, शारदा स्तवन, भूपाळी, प्रार्थना, गवळण, परमेश्वराची, ब्रह्मचैतन्याची केलेली आळवणी आहे.

जनमनाचा अधिनायक 

कोट्यावधीचा तो विधायक

व्यापिले ज्याने  अंतःकरणाला अभिमानाने जगायला 

राज्य राज्यांच्या देशभक्तीला जाती-जातीच्या मिलनाला 

लोक तंत्राने एकवटला 

मान देऊया तिरंग्याला

वंदू या भारत देशाला..

(वंदू या भारत देशाला)

…वरील प्रत्येक ओळीमध्ये देशाप्रती गौरवाची, अभिमानाची भावना जागृत करण्याचं सामर्थ्य जाणवतं.

वैभवात जी नाती जपली.

दैन्ये  ना त्यागली 

नसे अपेक्षा कृतज्ञ प्रीती 

मनात जोपासली…

— ‘ वेध निवृत्तीचे ‘ या कवितेत ते म्हणतात,

कर्मयोग हे दैव जाणिले 

अविरत गतीला नाही रोखले

 चल चक्राची गती थोपवा 

काया शिणली

 कार्य संपवा…

जीवनाविषयी केलेले सखोल चिंतन या काव्यरचनांतून जाणवतं. कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे हा जीवनानुभवातून आलेला अनमोल संदेश कवी सहज जाता जाता देऊन जातात.

अतिशय हळुवार, अलवार, कोमल मोरपिशी, शब्दांतून कवीचे प्रीत काव्य उलगडत जाते.

मुक्त संचार तुझा माझ्या गे स्वप्नात

कधी असतो का रात्री मी तुझ्या ध्यानात 

करितो अर्ज मी मुग्ध तुझ्या नयनाते

एकदा घेई मजला बंद तुझ्या पापणीते

(एक वार हळूच पाहू दे)

…या गीतातल्या या सुंदर प्रेमाचं आर्जव करणाऱ्या ओळी. एखाद्या सुकलेल्या, व रुक्ष मनालाही उमलवतात आणि गतकाळाच्या आठवणीत रमवतात.

युगुल विभागातील गीते तो आणि *ती*चीच आहेत. या गीतांमध्ये इतकं माधुर्य आणि गेयता आहे की वाचता वाचता आपण सहजच मनाचा एक ठेका पकडतो.

 ती:  तुझं जालं मी ल्याले

       मन तुजं मी प्याले

      जीव तुज्यात विरलाय माजा

      लाटं लाटंत झेलिन होरी तुजी मी

     जीवाचा तू तर राजा..

 तो:  का डोल्यात पानी तुज्या

       व्हटात गानी

रानी खरी जीवाची माज्या… या कोळीगीतातला प्रेमाचा हळुवार अविष्कार आणि ठसका, एकमेकात गुंतलेली मनं वाचकांच्या हृदयात आनंदाच्या लाटाच उसळवतात.

पाजुनी दवबिंदू

 मी कलिका मनी जोपासली

 कंटकाची बोच म्हणून 

दूर तिज सारू कशी..

(भैरवी)

 किंवा..

 जगण्याची आशा जात असे सुकून 

साथ नसताना कसे जा जगू जीवन

(खिन्न कातरवेळ)

अबोल्यात जर जगायचे

तर प्रतीक्षा तुझी कशासा गे

पहायचे जर नसेल तुजला 

नेत्र मिटू दे अखेरचे..

(दिवा स्वप्न)

विरहाचे  बोचरे दुःख व्यक्त करणारी ही गीते खरोखरच मन उदासही करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी विराणीचे क्षण येतातच. त्या क्षणांना पुन्हा एकदा भावनांचा झोका या गीतांमुळे दिला जातो. इतक्या सजीवपणे या गीतांचे लेखन झालेलं आहे.

पाकळी चुंबता अंतरी लाजले 

चिंब पदरातुनी वक्ष आसुसले 

दाटली आर्तता नयन पाणावले

 स्पर्श तव जाहला प्रेम अंकुरले 

(चित्त धुंदावले)  

शृंगारातला उन्नतपणा, आतुरता, देहभावना, लज्जा, औत्स्युक्य या साऱ्या प्रणय भावनांचं सुरेख मिश्रण या शब्दांतून ठायी ठायी पाझरतं. पण तरीही या शब्दांमध्ये कुठेही अश्लीलता जाणवत नाही. इथे राखलेलं आहे ते शृंगाराचं पावित्र्य आणि हेच या गीतांचं वैशिष्ट्य.

काही नाती ही जन्मभर आपल्या सोबत राहतातच. त्या व्यक्ती या जगात असोत वा नसोत पण त्यांनी जे दिलेलं आहे ते  आपल्या आयुष्यासोबत अखंड येत असतं. याची जाण देणारी सुंदर गीते  सगे सोयरे या भागात वाचायला मिळतात. ही गीते वाचताना कुठेतरी कवीच्या मनातली सगे सोयऱ्यांविषयीची कृतज्ञता ही जाणवते.

 सुकून जाईल कैसे जीवन 

पाखर धरी ती दृष्टी 

कितीक रुजले किती उमलले 

कृतज्ञतेची वृष्टी 

आज पोरकेपणी वरद हा आहे आधाराला

 उजाड धरतीवरी पसरला पावन पाचोळा

(दोन तरुंची छाया )

निसर्ग नियमाप्रमाणे सोडून गेलेल्या मात्यापित्यांनी पसरवलेल्या अनेक संस्कार पर्णांना ते पावन पाचोळा असं संबोधून त्यांच्या ममतेचा गौरवच करतात.

जीवन सारे शिल्प जाहले 

तुझीच ही किमया

 कवतुक तुझीया नयना मधले 

मोहरली ही काया

(नाही मजला जगायचे) 

अत्यंत प्रिय व्यक्तीच्या प्रोत्साहनने जीवन कसे बहरते हेच यातून व्यक्त होते तसेच त्यांच्याविना जीवन कसे शुष्क होते याही भावना इथे प्रकट होतात. सगे सोयरे कोण असतात, का असतात, त्यांची जीवनातली महत्त्वपूर्ण भूमिका यांचे अर्थ प्रत्येक गीतात वाचायला मिळतात. मातृत्वाची सर्वंकष महती सांगणाऱ्या गीतरचना नारी जीवन विभागात वाचताना धन्य तो नारी जन्म आणि नारी जन्माचा सन्मान व्हायला हवाच असे वाटते आणि  असाच  संदेश देणाऱ्या रचना यात आहेत. या गीतांमधून नारित्व, स्त्रीत्व या संज्ञांचा अतिशय नेमकेपणाने अर्थ उलगडलेला आहे. त्याचबरोबर नारीचा झालेला अनादर, तिच्या देहाची विटंबना याविषयीची चीडही कवीने व्यक्त केलेली आहे.

धुक्यापरीही धूसर झाली 

पावन सारी नाती 

मोल न काही लेकीला ती केवळ पैशापोटी 

विश्वासाचे धामही झाले काटेरी पिंजरा 

छाया ही नच नाही मृगजळ नसे कुठेही थारा..

(बावरलेली जखमी हरणी)

विश्वासाचे धामही झाले काटेरी पिंजरा ही शब्दपंक्ती  मनावर खरोखरच आघात करते. आणि  जगाचा एक कडवट वास्तव अनुभव देते. समाजात घडत असणाऱ्या स्त्री अत्याचारांची कवीने सखेद दखल घेतलेली आहे.

 या सर्वच काव्यातून कवीचे एक सामाजिक, संवेदनशील, विशाल, बांधील मन  जाणवते.

एकंदरच निशिगंध हा सर्व विषय स्पर्शी गीत संग्रह आहे. मानवी जीवन, माणूस टिपणारा आहे. प्रत्येक गीतात मौल्यवान असा विचार मांडलेला आहे. शिवाय या सर्वांतून कवीचा त्या त्या विषयावरील अभ्यास, निरीक्षण, संवेदना, सहअनुभूती आणि भाषेची अत्यंत मजबूत पकड जाणवते. मुख्य म्हणजे कुठेही विचारांचा गोंधळ नाही. स्पष्टता आहे. प्रत्येक ओळ गतीत वहात वहात रसिकांच्या मनात अलगद फुटते. शिवाय या सर्व गीतांमधून एक काव्यधर्मही त्यांनी जपलेला आहे. ऊपमा, उत्प्रेक्षा, लयबद्धता, गेयता, सहज यमके यामुळे  काय वाचू, किती वाचू आणि किती वेळा वाचू अशीच वाचकाची मनस्थिती होते. काही कविता अवघड भासतात, पटकन अर्थ लागत नाही, कवीला नेमके काय म्हणायचे आहे ते समजायला वेळही लागतो. पण तेच काव्य पुन्हा पुन्हा वाचलं की कवीच्या विचारांशी आपण जाऊन पोहोचतो आणि त्या वेळेला जो आनंद होतो तो शब्दातीत आहे.

“डॉक्टर निशिकांत श्रोत्री, इतका सुंदर गीत संग्रह सादर केल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदनही.

(कंसात कवितेची शीर्षके दिली आहेत)

परिचय : राधिका भांडारकर पुणे.

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments